पान:निवडक अंतर्नाद.pdf/१४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गर्भगृहाच्या उंबरठ्याजवळ देवीसन्मुख आली. भरजरी तोरणाखाली, पुजाऱ्याकडे ओटीचे तबक सरकवताना, देवीपुढे नतमस्तक होताना तिच्या सोनपावलांवर खिळलेली दृष्टी वर घेताना, तिच्या राजस, मनोहारी, आश्वासक रूपाची जशी तिच्यावर मोहिनी पडली! 'चला, चला, पुढे सरका, बसून घ्या, पूजा सुरू होते आहे!' वगैरे शब्दांच्या तालावर ती कासवमंडपात कधी जाऊन बसली तिला कळलेच नाही. अवतीभवती गुळगुळीत काळ्या पाषाणाचे, असंख्य घडीव नक्षीदार खांब - हाताच्या कवेत न मावणारे, कोरीव घुमटाचा डोलारा सांभाळणारे! धूप, दीप, फुलांच्या गंधाने, मंद प्रकाशाने, घुमणाऱ्या घंटानादाने आणि कुजबुजत्या स्वरांच्या जादूने भारलेले वातावरण आईच्या महापूजेसाठी सज्ज झालेले, सोवळ्यातले पुरुष आणि जरीवस्त्रे, दागदागिने, फुलांचे गजरे ल्यालेल्या त्यांच्या अर्धांगीनी आपल्या अपत्यांसहित ! एका खांबाच्या आधारे ती बसली होती. तिच्या मागेच बसलेले एक दक्षिणी कुटुंब सुरेल, भाविक आवाजात देवीची स्तोत्रे म्हणत होते. समोर पुजाऱ्यांनी देवीच्या महापूजेला सुरुवात केली - वर्षानुवर्षे घरी पाहिलेल्या शारदीय नवरात्रीतील देवीच्या प्रतिष्ठापनेच्या पूजा तिच्या डोळ्यांपुढे तरळून गेल्या. मंत्रोच्चारांचे स्वर कानांत गुंजारव करू लागले - श्री महागणपती, इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, नवग्रहदेवता आणि मातृपितृदेवता... सर्वांना प्रार्थन, आळवून आळवून पाचारण केलेल्या श्रीदेवीच्या रूपाची किती भक्तीने केलेली षोडषोपचार आतिथ्यपूजा ! सर्वांगपरिपूर्ण, विनम्र आणि समर्पित! त्या पूजेत चालू होता तिचा स्नानसोहळा, अभ्यंगस्नान ! पंचामृतांचे दूध, दही, तूप, मध, साखर आणि गंधोदकाचे! अभिषेक होत आहेत श्रीच्या मस्तकावर - कामधेनोः समुद्भूतं देवर्षिपितृतृप्तिदम् यो ददामि हे स्नानार्थं प्रतिगृह्यताम् दूध कसे? कामधेनूपासून निर्माण झालेले देव, ऋषी आणि पितरांची तृप्ती करणारे तुझ्या स्नानासाठी हे देवी अर्पण करीत आहे. त्याचा स्वीकार कर. .... चंद्रमंडल संकाशं सर्व देवप्रियं दधी स्नानार्थं प्रतिगृह्यताम् दुधापासून तयार केलेले, चंद्राप्रमाणे शुभ्र, शीतल असणारे दही आपण स्वीकारावे. आज्यं सुराणामाहार, आज्यं यज्ञेप्रतिष्ठितम्........ तसेच लोण्यापासून बनवलेले, यज्ञकर्मात लागणारे, अत्यंत पवित्र असे हे तूप.... त्याचा स्वीकार करावा. आपल्या मंगलस्नानासाठी. ..... सर्वोषधी समुत्पन्नं पीयूष सदृशं मधु मधुस्नानार्थं प्रतिगृह्यताम्..... फुलांच्या परागापासून प्राप्त केलेला, औषधी गुण असलेला अमृततुल्य असा... हा मध स्नानासाठी अर्पण करीत आहे. इक्षुदंड समुद्भूत दिव्यशर्करया शिवे स्नापयामि महाभक्त्या... प्रसन्ना भवचंडिके शर्करास्नानम् समर्पयामि .... उसापासून बनवलेल्या दिव्य शर्कराने मोठ्या भक्तिभावाने स्नान घालतो कर्पूरैलासमायुक्तं सुगंधद्रव्यम् संयुतम् तामिहोपव्हये गंधोदकं महादेवी स्नानार्थं समर्पयामि। साखरेने तुला स्वीकार व्हावा. कर्पूर आणि इतर सुगंधद्रव्यांनी युक्त असे गंधोदक, हे महादेवी, तुझ्या स्नानासाठी समर्पित करतो. त्या काळ्याभोर पाषाणमूर्तीवरून, चारी बाजूंनी पंचामृताचे, गंधोदकाचे ओघळ झुळझुळताहेत. प्रत्येक अमृतस्नानानंतर होत आहे अभिषेक शुद्ध जलाचा - शर्करास्नानानंतरम् शुद्धोदकस्नानम् समर्पयामि । उदक तरी कसे उष्णेन विमलेनैव स्वर्णकुंभ स्थितेनच... स्वर्णकुंभात ठेवलेले, उष्ण आणि निर्मल.... आणि नंतर.... - अमृताभिषेकोस्तु.... सुवर्णाभिषेकोऽस्तु स्नानान्ते आचमनीयम् समर्पयामि। वस्त्र - उपवस्त्रार्थे अक्षताम् समर्पयामि। वस्त्र, उपवस्त्रे, दिव्य मौक्तिक कंचुकी... अनेक रत्नखचित भूषणे किरीटहार, केयूर, रत्नकुंडले, कौस्तुभहार, रत्नकंकणे, नुपूर, कंठसूत्र - - हरिद्रा, कुंकुम, सिंदूर कण्णल आदी सौभाग्यलेणी; चंदन, देवंतिका, बकुल, चंपक, पुभाग अशी परिमलद्रव्ये... बिल्व, प्रवाल, तुलसीपत्रे.... समर्पित होत आहेत – देवीची, शंकराची स्तुती होत आहे.... गंधाक्षता, धूप, दीप, नैवेद्य, ताम्बूल अर्पण होत आहे आरती, प्रदक्षिणा, पुष्पांजली..... महापूजा संपूर्ण आणि संपन्न झाली! पंचारती गाभाऱ्याबाहेरील देवतामूर्तीपुढे फिरून येते.... आणि शेवटी .... शंखस्नान ! सर्व जण उभे, नतमस्तक! तीही त्यातली एक. मस्तकावर पडणाऱ्या तीर्थजलाच्या थेंबाच्या अमृत शिडकाव्यात अंतर्बाह्य कृतकृत्य झालेली ! गर्दी ओसरू लागली. निघावेसे वाटत नव्हते. ती खांबाला टेकून, डोळे मिटून बसली. तिच्या मागेच, एक प्रौढा आपल्या निवडक अंतर्नाद १४५