पान:निवडक अंतर्नाद.pdf/१६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

...लाडिक, भ्रामक, वेल्हाळ आविर्भाव, प्रणयचंचल भ्रूलीलाच अधिक. "मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी?” माधवराव गंभीर होत म्हणाले. "इंग्रजीमधील वेगवेगळ्या फ्रेजिस आणि त्यांचा वापर कसा करावा हे शिकायचंय मला. त्याने निबंध चांगला लिहिता येईल का हो? फ्रेज हा भाषेचा अविभाज्य घटक असतो असं आमचे इंग्रजीचे सर म्हणतात. " "बरोबर, फ्रेजिसच्या वापरामुळे वाक्यरचना सुरेख व्हायला मदत होते. " चहाचा कप वैभवीसमोर ठेवत काकू म्हणाल्या, "अग, आमच्या भिशीमंडळात खानोलकरवहिनी आहेत ना, त्यांची तू मुलगी का?" "कसं ओळखलंत हो ?” "अगदी तुझ्या वयातील खानोलकरवहिनीसारखीच असावीस बघ. तू त्यांची प्रतिमाच वाटतेस; आणि प्रतिमा नेहमीच प्रत्यक्षाहून अधिक उत्कट असते!” "काय हो, तुम्हीपण काकू! मात्र चहा सुरेख झालाय हो !” "इतकी फिटंफाट नको हा करायला." असे म्हणत हसत हसत काकू किचनकडे वळल्या. बशीतला शेवटचा घोट पीत असताना वैभवीचे डोळे माधवरावांकडे वळले. त्यांची नजर तिच्यावर खिळली होती. ती तशीच ठेवून ते म्हणाले, "तुमचा संवाद म्हणजे खूप जुनी ओळख असल्यासारखा. " "आम्हा बायकांचं असंच असतं हो काका!” वैभवी हसत म्हणाली. रिकामा कप आत ठेवायला ती वळली. जणू आपली सावली ठेवूनच ती गेलीय असे समजून ते पाहत राहिले. ती पुन्हा आपल्या जागी येऊन बसत म्हणाली, "दोन मिनिटांत माझ्यात कोणता बदल झालाय, ओळखाल?" "त्यात काय अवघड आहे? तिनं तुला सोनचाफ्याचं फूल दिलं आणि तू ते तुझ्या केसात माळलंस !" "पन्नास गुण फक्त ! काकूंनी सोनचाफा माझ्या अगदी मानेवर केसात खोचलाय, मी मानेच्या जरा उजव्या बाजूला तो माळला असता." मान थोडी नकळत कलती करीत वैभवी म्हणाली. ... सूर्यफूलदेखील असेच नकळत वळत असावे असे माधवरावांना वाटून गेले. खरंच वैभवीचे चालणे राजहंसीचे आहे, बोलण्यात सतारीचा झंकार आहे, तिच्या साध्या पाहण्यातदेखील उमलत्या फुलाचा डौल आहे. तिचे एकूण असणे म्हणजेच मध्यमातील कविता आहे. बाहेर ऊन अधिकच रेशमी झाले होते. ते थोडे हलतही होते. टेलिफोनच्या तारेवरून खाली उतरलेल्या चिमण्या रस्त्यात साठलेल्या पाण्यात मनसोक्त खेळत होत्या. अजूनही इंद्रधनुष्यातील सप्तरंग आहे तसेच होते. "वैभवी, जूनमधे तुझी शाळा सुरू होईल. वेळापत्रक निश्चित होईल. मगच आपणाला तपशील ठरविता येईल. पण साधारणपणे एवढे लक्षात ठेव. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस तास दीड तास आपण इंग्रजी घेऊ. तीनचार महिने तुला यावे लागेल. तोवर एक लक्षात ठेव. इंग्रजीतले किमान पाच नवे शब्द तुला दररोज पाठ करावे लागतील. आता एवढंच सांग फ्रेज म्हणजे काय ?" वैभवी सावध होऊन बसली. ती संथपणे म्हणाली, "जनरली, अ फ्रेज ईज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच ड्झ नॉट मेक कंप्लिट सेन्स." “अहो, टीव्ही कशाला लावताय?” काकू किचनमधून म्हणाल्या. " "टीव्ही बंदच आहे हो." काकू बाहेर येत म्हणाल्या, "फसवलेस ग वैभवी छानच आहेत तुझे उच्चार, हिदम आहे हो बोलण्यात!” “काहीतरीच हं काकू." मग वैभवी उठली, ईषत् थबकली आणि निघून गेली, बार इंद्रधनुष्य अजून उमललेलेच होते. त्या रंगीबेरंगी कमानीखालून पांढरे शुभ्र बगळे झेपावत होते. त्यांचे फॉर्मेशन लक्ष वेधून घेत होते. वैभवीला वाटले, ते कुठे चालले असावेत? त्यांचे झाड चुकत नाही का? उशीर झालेला एखादा बगळा अंधार पडल्यावर चांदण्यांच्या धूसर प्रकाशात कसा जात असेल ? त्याच्या घरी कोण असेल? घरटे नसेल तर त्याच फांदीवर त्याला झोपायचे असेल का? झोपेत त्यालाही स्वप्न पडत असेल? जुन्या घराचे, गावाचे, आईचे की वडिलांचे? इतक्यात तिला हाक ऐकू आली. "इकडे कुठे वैभवी?" समोर एक जुनी मैत्रीण उभी, "सरपोतदार काकांकडे आले होते, इंग्रजीसाठी." "ग्रेट आहेस. त्यांचा मुलगा बोर्डात आला होता. " मग दोघीही विरुद्ध दिशेने निघून गेल्या. वैभवीच्या मनात आले; पर्यायाने मघाशी मैत्रीण काकांनाच ग्रेट म्हणाली, नाही का? .... त्यांचं व्यक्तिमत्त्वही तसेच प्रभावी आहे. गोरापान वर्ण, डोळे, धारदार नाक, लक्ष वेधून घेणारी उंची आणि अॅथॉरिटेटिव्ह व्हॉईस, सफाईदार इंग्रजी उच्चार त्यांनी उच्चारलेला साधा 'फ्रेझ' हा शब्ददेखील अजूनही मनात निनादत आहे रोज पाच नवे शब्द या प्रमाणे चार महिन्यांत सहाशे नव्या शब्दांची भर पडावी यात त्यांची योजकता दिसते. चार महिन्यात मी 'फ्रेझरिच' होणार यात शंकाच नाही. काकूंनी माझ्या केसात माळलेल्या सोनचाफ्याच्या फुलासंदर्भात आपण थोडे अधिक बोल्ड होऊन तर नाही ना बोललो ? निवडक अंतर्नाद १५९