पान:निवडक अंतर्नाद.pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माधवराव व्हरांड्यात बाहेर आले. वैभवी गेली त्या दिशेने ते पाहत राहिले. माधवरावांना वाटले, नेहमीप्रमाणे स्वाध्याय पूर्ण झाल्यावरच वैभवी जाणार होती. तिचा स्वाध्याय पूर्ण होत आलाच होता. तेवढ्यात ही विपरीत घटना घडून गेली. ...एका अनिर्वचनीय अशा अपराधीपणाच्या भावनेने आपले मन झाकोळून गेले आहे. खरे तर, आपला तोल सुटला होता असेच म्हणायला हवे. एकंदरीत तिच्या वागण्यातून आपण वेगळेच दुवे जुळवीत गेलो आणि ही आपत्ती ओढवली. 'आपण असे वागाल असे वाटले नव्हते' असे तर वैभवीला सुचवायचे नसेल? आपल्या आईवडिलांना ही घटना तिथे कथन केली, तर आपणाला तोंड लपवायला जागा उरणार नाही! शुद्ध मराठीत आपण वैभवीचा 'हात धरायचा' प्रयत्न केला असाच या घटनेचा अर्थ होतो ना? कदाचित आपली पत्नी चहा घेऊन येत असल्याची चाहूल तिला लागली असावी का? पत्नीच्या दृष्टीस जे पडू नये ते तिच्यासमोर प्रत्यक्ष घडले, तर अनर्थ ओढवेल या भयाने वैभवीने असा पवित्रा घेतला असेल का? या विपरीत घटनेचा ताण न सोसवल्यामुळे ती काहीही न बोलताच तडकाफडकी निघून तर गेली नसेल? गेल्या तीन-चार महिन्यांत आपली म्हणून एक 'इमेज' उभी करण्याचा प्रयास केला, तो असा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला तर! दिल्लीस असलेल्या आपल्या मुलाच्या कानी ही वार्ता गेली तर? खरे तर आपण तसे काहीही केलेले नाही. पत्नीच्या कानी ही गोष्ट गेली तर तिला काय वाटेल? स्त्रीपुरुषसंबंधातील नीतिमत्तेविषयी आपला समाज फाजील संवेदनशील आहे त्याला काय करायचे! पत्नीचा स्वभाव पाहता ती आपणाला याबद्दल काहीही विचारणार नाही हे तर स्पष्टच आहे. बस्स, झाले ते झाले. काळ हेच औषध आहे. आता कानाला खडा. त्यानंतर ती अनेक वर्षे भेटली नाही. सुमारे दहा वर्षे लोटली असतील, माधवराव दारात उभे होते. सकाळी अकराचा सुमार, पोस्टमन टपाल देऊन गेला. त्यात एक लग्नपत्रिका होती, ती साध्या बुकपोस्टने न येता पाकिटातून आली होती. लखोटा उघडल्यावर कुंकममंडित अक्षता टेबलावर घरंगळल्या. वैभवी खानोलकर हिच्या लग्नसमारंभाचे ते निमंत्रण होते. उभयताना आवर्जून उपस्थित राहण्याविषयी ती विनंती होती. डॉ. वैभवी' असा पत्रिकेत उल्लेख होता. माधवरावांच्या मनापुढून जुन्या घटनांची चित्रफीत सरकून गेली, इतके शरमिंदा होण्याचे कारण नाही असे त्यांना वाटले. तरीपण त्यांच्या मनात सल होता. हुरहूर होती. उत्साह नव्हता. उभारी नव्हती. समारंभाच्या निमित्ताने पुण्याला जाणे भाग होते. मुजरीम हाजिर होगा ! पंधरावीस मिनिटे आधी माधवराव सहकुटुंब कार्यालयात पोचले. अशा गर्दीतही पत्नी बायकांच्या गर्दीत मिसळून सामावून गेली. अक्षता, मंगलाष्टके, 'वाजवा रे वाजवा पार पडले. व्यासपीठावर जाऊन पत्नी वधूवरांना भेटून अभीष्टचिंतन करून आली. वधूने तिला अगत्यपूर्वक वाकून नमस्कार केला. 'वैभवी तुमची चौकशी करीत होती असे त्या माधवरावांना म्हणाल्या. मग माधवराव व्यासपीठावर गेले आणि वैभवीसमोर उभे राहिले. आपल्या मेंदीभरल्या ऊबदार हाताने तिने माधवरावांचा हात हातात घेतला. क्षणभर डोळे मिटले आणि उघडले. तिच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास माधवरावांना झाला. मग व्यासपीठावरून खाली उतरून त्यांनी मागे वळून पाहिले, पण कुणालातरी नमस्कार करण्यासाठी वैभवी खाली वाकली होती. मग माधवराव गर्दीत हरवून गेले. (दिवाळी २०१७) सांस्कृतिक समुठी अंतनाद जून २०११ रुपये ३५ जून २०११ (चित्रकार शिवाजी तुपे) निवडक अंतर्नाद १६१