पान:निवडक अंतर्नाद.pdf/१६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तटस्थपणे मणिमय म्हणाले, "आता प्रदर्शन तीन दिवसांवर आलंय. उद्यापासून पाहुणे येऊ लागतील. नेमक्या या मोक्याच्या वेळी आर. थ्री मध्ये बिघाड कसा झाला?" "तेच समजत नाहीए, नेमकं काय बिघडलंय, हे शोधून काढायचा माझा प्रयत्न चालू आहे. " तरीही या बोलण्यामुळे मणिमय सामंतांचं समाधान झालं नाही. मान हलवत ते म्हणू लागले, "व्हेरी बॅड डॉक्टर सरकार, किती आधीपासून आपण तयारी सुरू केली होती आणि तरीही आपल्यावर अशी नामुष्कीची वेळ यावी! बाकीच्यांचं काय ? त्यांच्यात नाही ना बिघाड झाला?" "नो नो सर ! बाकीची मॉडेल्स अगदी परफेक्ट आहेत. 'एक्स फाइव' या रोबोच्या हायड्रॉलिक पिस्टनमध्ये थोडीशी समस्या होती, मान वळवताना रोबोला थोडा हिसका बसत होता. पण डॉक्टर भादुडींनी तो कालच दुरुस्त केलाय.” भुवया उंचावीत मणिमय म्हणाले, "त्याचं काम... "खेळातला साथीदार होणं, म्हणजे समजा, माणूस मॉर्निंग वॉकला निघाला, तर त्याच्याबरोबर चालणं किंवा जॉगिंग करणं, काही खेळांमध्ये तो खेळणाऱ्या माणसाचा पार्टनरही होऊ शकतो,” डोळ्यांवरचा चष्मा काढत मणिमय सामंत म्हणाले, "हं. आत्ता आठवलं. खेळामध्ये तुम्ही बॅडमिंटन आणि पोलो असे दोन खेळ घेतलेयत ना ? मी आधीच बजावलं होतं. पोलो हा जगातला पॉप्युलर गेम आहे आणि बॅडमिंटन असायलाच हवं. नाहीतर महिला या मॉडेलमध्ये रस घेणार नाहीत. एन. टू रोबो? त्याची काय खबर ? त्याने नाही ना घोटाळा केला?" "या रोबोला 'डोमेस्टिक हेल्पर' ही भूमिका बजावण्यासाठी सज्ज केलंय, सर, स्वयंपाकापासून सुरुवात करून पाहुण्यांची सरबराई करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी हा रोबो करू शकतो. " मणिमय सामंतांनी एक निःश्वास यकला, "त्याने तसं केलं म्हणजे झालं. डॉक्टर सरकार, त्या 'मॅनेजर' मॉडेलचा कोड काय आहे?" "सर, तो आहे 'झेड फोर', अकाउंट्स, को-ऑर्डनेशन, प्रॉडक्शन, मार्केटिंग या सगळ्या कामात हे मॉडेल मदत करू शकतं. सगळ्यात महत्त्वाची कामगिरी म्हणजे 'झेड. फोर' मीटिंगमध्ये हजेरी लावून सगळ्यांबरोबर संवाद साधू शकतो. त्याच्या बाबतीत एकच त्रुटी होती. या मॅनेजर बाबांचा चेहरा वाजवीपेक्षा जरा जास्तच हसरा दिसत होता. " अस्वस्थ होत मणिमय सामंत म्हणाले, "हसतो? मॅनेजर हसतो? कंपनीच्या गंभीर मीटिंगमध्ये मॅनेजर हसायला लागला, तर ते किती हास्यास्पद ठरेल, याचा विचार केलायत का तुम्ही? मग हे मॉडेल त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामुळे बाद होईल.” डॉक्टर सरकार घाईघाईने म्हणाले, "ती त्रुटी आता दूर झालीय, सर फेशियल एक्सप्रेशन म्हणजे फायबरच्या कामात काहीतरी चूक झाली होती. " घाम आला नव्हता, तरीपण मणिमय सामंतांनी खिशातून रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसला. मंद स्मित करत सुफल सरकार म्हणाले, "इतकी काळजी करू नका, सर प्रदर्शन, सेमिनार सगळं छान पार पडेल. एम. फाइव आणि के. सिक्स ही आपली मॉडेल्स अप्रतिम आहेत. के. सिक्स सर्वोत्तम काम करतो, हे आपल्याला माहीत आहे ना? डॉक्टर शकुंतला मित्र यांनी सर्व कल्पनाशक्ती पणाला लावून याची निर्मिती केलीय." "आता बिनचूक आहे, असं म्हणताय, उद्या येऊन सांगाल, त्यात दोष निर्माण झालाय. काही कनेक्शन्स बिघडल्यामुळे ती मुलगी फटाफट शिंकू लागलीय किंवा अचानक मोठ्याने हसू लागलीय!" सुफल सरकारना हसू आलं. पण त्यांनी ते जाणवू दिलं नाही. डॉक्टर सामंतांचं टेन्शन प्रमाणाबाहेर वाढलंय. नाहीतर रोबो शिंकू लागलाय, असली भन्नाट कल्पना त्यांच्या डोक्यात आली नसती. "नाही सर, आपण बघाल' डॉक्टर सरकार सांगू लागले. "के. सिक्स हे नुसतं सर्वोत्तम मॉडेल आहे असं नाही, त्याचा अॅपिअरन्ससुद्धा अफलातून झालाय. 'साडी नेसलेली बंगाली तरुणी' असं इम्प्रेशन दिलंय तिला डॉक्टर मित्र यांनी तिच्यासाठी शांतिनिकेतनला जाऊन खास दागिने आणलेयत. हायड्रॉलिक सिस्टिमचा प्रोग्रॅम अशा विशिष्ट पद्धतीने तयार केलाय, की •ठरावीक वेळाने ती तरुणी कपाळावरची बटही मागे सारते, ती रोबो आहे, हे कोणालाही खरं वाटणार नाही. सर्वांना वाटेल, ही कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी आहे. आम्ही सगळ्यांनी डॉक्टर मित्र यांचं अभिनंदन केलंय. आपणही होतात त्यावेळी.” "मीपण केलंय का? लक्षात नाही. केलं असेल कदाचित, म्हटलं ना तुम्हाला, मला सगळ्याचा विसर पडत चाललाय. के. सिक्सचं काम काय आहे? तिचं नटणं कशासाठी? ती फॅशन शोमध्ये चालणारेय का?" यावेळी मात्र सुफल सरकारना हसू आलं नाही, "सर, के. सिक्स ही फक्त मैत्रीण आहे ती 'कंपनी' देऊ शकते. तरुणांबरोबर गप्पागोष्टी करू शकते. इंटरअॅक्ट करू शकते, अनेक देशांत एक सीरियस प्रॉब्लेम जाणवू लागलाय. मित्र नाहीत, हितगुज करायला जिवाभावाची माणसं नाहीत. हे काम अवघड होतं. डॉक्टर मित्र यांनी ते आव्हान स्वीकारलं, असं मॉडेल करण्यात त्या यशस्वी झाल्यात. तरुणीचं दिसणं जितकं आकर्षक, तितकंच तिचं व्यक्तिमत्त्वही नजरेत भरेल असं आहे गमतीची आणि इंटरेस्टिंग अशी आणखी एक बाब इतर कोणत्याही मॉडेलला आपण विशेषनाम दिलेलं नाही, पण के. सिक्सला दिलंय " "विशेषनाम? म्हणजे रोबोचं नामकरण केलंय?" " हो सर, डॉक्टर शकुंतला मित्र यांनीच नाव दिलंय. बंगाली नाव - 'कृष्णचूडा'. आम्ही या रोबोचा उल्लेख 'कृष्णचूडा' या नावाने करतो.” सुफल सरकार निघून गेल्यावर मणिमय सामंतना वाटलं, निवडक अंतर्नाद १६३