पान:निवडक अंतर्नाद.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपला 'इम्पोर्टेड' उपास प्रभाकर सोवनी साबुदाणा, बटाटा आणि भुईमुगाचे दाणे हे पदार्थ उपासाला चालणाऱ्या पदार्थांतील सर्वांत लोकप्रिय घटक पदार्थ आहेत. पण मौजेची गोष्ट ही, की हे सारे पदार्थ आपल्या ऋषी-मुनींनी कधी डोळ्यांनी तर पाहिले नव्हतेच, पण त्यांचे नावही कधी ऐकले नव्हते! हे पदार्थ अगदी अलीकडे, म्हणजे सोळाव्या शतकात, पोर्तुगीजांनी भारतात आणले. गेल्या महिन्यातली गोष्ट. खूप वर्षांनी एक जुना दोस्त भेटला. त्यावेळी आम्ही दोघेही कामाच्या गडबडीत असल्यामुळे 'एकदा निवांतपणे घरीच ये ना गप्पा मारायला' म्हणून त्याला आग्रह केला. दुसरे दिवशी संध्याकाळी त्याने माझ्याकडे यायचे कबूल केले. घरी येताच मी तसे पत्नीला सांगितले "अग, उद्या संध्याकाळी माझा एक जुना दोस्त यायचा आहे. खूप वर्षांनी भेटतोय तो. तेव्हा खायला काहीतरी चमचमीत कांदेपोहे, शिरा असं कर!" ती म्हणाली, "अहो, उद्या संकष्टी आहे! आपण करीत नसलो तरी हल्ली खूपजण संकष्टीचा उपास करायला लागले आहेत. तुमच्या या मित्रालाही संकष्टी असली म्हणजे पंचाईत व्हायची. त्यापेक्षा मी असं करते - झकासपैकी खोबरे वगैरे घालून खिचडी करते. कालच आणलेले वेफर्स आहेत. थोड्या साबुदाण्याच्या पापड्या तळते. शेवटी कॉफी आहेच!” पत्नीचे म्हणणे अगदी बरोबर होते. माझ्या मित्राला खरोखरच संकष्टीचा उपास निघाला. अर्थात गरमागरम खमंग खिचडी, वेफर्स अन् स्ट्राँग कॉफीवर तो खूष झाला. आमच्या गप्पा खूप रंगल्या. मित्र निघून गेल्यावर मात्र या निमित्ताने माझे विचारचक्र सुरू झाले. उपास हे काय प्रकरण आहे? त्याचा मूळ उद्देश काय? आज त्याला कसले स्वरूप आले आहे? उपास या शब्दाचे मूळ रूप 'उपवास म्हणजे सन्निध राहाणे.' सन्निध कुणाच्या? तर अर्थातच ईश्वराच्या, आपल्या रोजच्या रामरगाड्यातल्या कटकटी जरा बाजूला ठेवून एखादा दिवस तरी केवळ आपल्या इष्ट देवतेची उपासना करीत काळ घालवायचा आणि त्यामुळे मनाला शांतता मिळवायची व या काळात खाण्यापिण्याचा फारसा व्याप न ठेवता साधा दुध-फळे असा आहार घ्यायचा, हा उपवासाचा मूळ हेतू असला पाहिजे, आपल्या धर्मात एकादशी, महाशिवरात्र, संकष्टी असे उपास तर सांगितलेले आहेतच, पण त्याशिवाय इष्ट देवतेसाठी सोमवार, गुरुवार, शनिवार क्वचित मंगळवार, शुक्रवार अशा वारांचे उपासही अनेकजण करतात. १६ निवडक अंतर्नाद आपल्या धर्माप्रमाणेच इतरही बहुतेक सर्व धर्मांत, म्हणजे ख्रिश्चन, ज्यू, मुसलमान, शीख, जैन, बुद्ध अशा धर्मपंथांत उपासाचा अंतर्भाव आहे. मुसलमानांचे रमजान, महिनाभर चालणारे रोजे सर्वांच्या परिचयाचे आहेत. उपासाला काय चालते आणि काय चालत नाही याची भली मोठी लांबलचक यादी ऐकायला मिळते. चुकून भलता पदार्थ • नकळतही खाण्यात आला तरी उपास मोडला, उपासाचे सारे पुण्य वाया गेले, या विचाराने उपास करणाऱ्याच्या मनाला चुटपुट लागते. पण काय खावे यावर निर्बंध असले तरी 'किती खावे' यावर मात्र निर्बंध असलेले आढळत नाहीत! उपास करायचा तो पापनाशनासाठी आणि पुण्य जोडण्यासाठी. यामागे अर्थातच धर्माचा आदेश आहे हे उघडच आहे. पण धर्माने उपासाला चालणाऱ्या आणि न चालणाऱ्या पदार्थांची दिलेली यादी पाहिली म्हणजे मात्र कोणत्या ऋषीमुनींनी, कुठल्या काळात व कोणत्या निकषांवर ही यादी तयार केली असावी याचे आश्चर्य वाटू लागते! आषाढी-कार्तिकी एकादशी आणि महाशिवरात्र या दिवशी सार्वत्रिक उपास असतो. एरवी कधी उपास न करणारेही या दिवशी उपास करतात. घरात सर्वांनाच उपास असतो. या उपासाच्या फराळाचा मेन्यू काय असतो? तर वऱ्याचे तांदूळ (म्हणजे भात), भुईमुगाच्या दाण्याच्या कुटाची आमटी, साबुदाण्याची लापशी, रताळ्याचा कीस, राजगिन्याच्या लाह्याचे लाडू किंवा वड्या, केळी इत्यादी. दुधाचे सर्व पदार्थ म्हणजे श्रीखंड, बासुंदी, पेढे, बर्फी हे उपासांना चालतात. चहा, कॉफी, कोको ही पेयेही उपासाला चालतात. या यादीकडे नजर टाकली म्हणजे एक ध्यानात येईल की साबुदाणा, बटाटा आणि भुईमुगाचे दाणे हे पदार्थ उपासाला चालणाऱ्या पदार्थांतील सर्वांत लोकप्रिय घटक पदार्थ आहेत. पण सर्वांत मौजेची गोष्ट ही की हे सारे पदार्थ आपल्या ऋषीमुनींनी कधी डोळ्यांनी तर पाहिले नव्हतेच, पण त्यांचे नावही कधी ऐकले नव्हते! हे पदार्थ अगदी अलीकडे, म्हणजे सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात आणले आणि गेल्या शंभर-दीडशे वर्षातच त्यांचा भारतात इतका सार्वजनिक वापर होऊ लागला आहे.