पान:निवडक अंतर्नाद.pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एका राजाचे निर्गमन विश्राम शरच्चंद्र गुप्ते “त्यांच्या कादंबऱ्यांतून मानवी जीवनाचे अतार्किक विभ्रम आपल्या अंगावर मारेकऱ्यांसारखे धावून येतात. गारठवून टाकतात. अंतर्मुख करतात. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यानंतर चौथी मूलभूत मानवी गरज म्हणजे 'हिरवा-निळा द्वेष तर नसेल? हा प्रश्न सरदेशमुखांच्या कादंबऱ्या वाचून मला पडतो. हा हिरवा-निळा, काहीसा वेडसर भासणारा द्वेष त्यांच्या तिन्ही कादंबऱ्यांचा जणू स्थायिभाव आहे. " डिसेंबर २००५ मध्ये त्र्यं. वि. सरदेशमुख गेले, बातमी अनपेक्षित नव्हती. म्हणजे तसं वय झालं होतं. त्यांना सन्माननीय मृत्यू आला. तो सगळ्यांनाच तसा येतो असं नाही, पण त्यांचा मृत्यू त्यांची आब राखून आला. मृत्यूपूर्वी काही तास अगोदरच त्यांनी आपल्या भावी लिखाणाची यचणं काढल्याचं वाचलं. आपल्या विहित कर्मात शेवटच्या श्वासापर्यंत बुडालेला हा गंभीर प्रवृत्तीचा मराठी कादंबरीकार, अनुवादक आणि समीक्षक कधीही परतून न येण्यासाठी आपल्यातून निघून गेला. बातमी ऐकून मन व्याकूळ झालं. सुमारे एका वर्षापूर्वी नेमकेपणे सांगायचं तर, १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांना भेटायला मी त्यांच्या सोलापूरच्या घरी गेलो होतो. माझ्या पहिल्याच कादंबरीला 'अल् तमीर' ला, भैरूरतन दमाणी पुरस्कार जाहीर झाला होता. तो स्वीकारण्यासाठी मी माझ्या पत्नीसोबत सोलापूरला पोहोचलो होतो. सोलापूरच्याच डॉ. गो. मा. पवारांनासुद्धा हा पुरस्कार जाहीर झाला होता. डॉ. पवारांना मी म्हटलं, 'सरदेशमुखांना भेटायची खूप इच्छा आहे, ते भेटतील का?' पवारांनी लगेच त्यांना फोन केला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊला आमची भेट ठरली. दुसऱ्या दिवशी सकाळीच सरदेशमुखांनी मला माझ्या मोबाइलवर फोन केला. आपल्या घरचा पत्ता समजावून सांगितला. रस्त्यावर कडक उन्हें पडलं होतं. मी त्यांच्या घरी नेमक्या वेळेस पोहोचलो, ते शुचिर्भूत होऊन माझी वाटच पाहत बसले होते. मी त्यांना वाकून नमस्कार केला. भारावल्यासारखा त्यांनी मला आशीर्वाद दिला, पुरस्कार त्या संध्याकाळी मिळणार होता, पण त्यापूर्वीच त्यांचा आशीर्वाद मिळाला. सरदेशमुखांची आणि माझी ओळख ही त्यांच्या कादंबऱ्यांतूनच झाली होती. तिच्यावर सारी भिस्त ठेवून मी त्यांच्या दारी गेलो होतो. मराठीतल्या एका गंभीर वृत्तीच्या लेखकाला भेटतानाचं दडपण आणि आनंद दोन्हींच्या संमिश्र भावना मनात दाटलेल्या होत्या. त्या दिवसांमध्ये मी त्यांची 'डांगोरा : एका नगरीचा' ही साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकृती वाचत होतो. त्या कादंबरीतलं साइखेड संस्थान आणि १८६ निवडक अंतर्नाद त्याचा उमदा तरुण राजा रघुवीरसिंह मनात रेंगाळतच होता. कादंबरीची भयसूचक नैतिकता अस्वस्थ करत होती. सरदेशमुखांची पहिली कादंबरी 'बखर एका राजाची' किंवा नंतरची दुसरी 'उच्छाद' वाचताना ज्ञानेश्वरीतली एक ओळ मला सारखी सारखी आठवे : जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रति वाढो. सरदेशमुखांनी या 'खळाच्या व्यंकटी' बद्दल दुष्टांच्या वाकडेपणाबद्दल काहीतरी भयसूचक लिहून ठेवलं आहे. ते अस्वस्थ करणारं आहे. सुखाची झोप लागू न देणारं आहे. निरभ्र प्रेमाचे, मैत्रीचे विश्वात्मक 'पसायदान' आणि जमिनीवरचे निर्घृण वास्तव या दोहोंमधल्या घेरी आणणाऱ्या दरीची ती अथांग खोली सरदेशमुख वाचकांना दाखवतात. एक गंभीर, नैतिक अंतर्दृष्टी जोपासणारा हा कादंबरीकार आहे असं मला नेहमीच वाटलं. त्यांनीच दार उघडलं. मला बघून त्यांना आनंद झालेला दिसला. 'तुमच्या पिढीतल्या लेखकाने माझ्याबद्दल आस्था दाखवणं मला तरी अपेक्षित नव्हतं,' अशा अर्थाचं काहीतरी ते मला बघताच बोलून गेले. मी म्हटलं, "तुमची पुस्तकं माझ्या पुढच्याही पिढ्या वाचणार आहेत." त्यांनी माझ्या खांद्याला स्पर्श करून मला खुर्चीवर बसतं केलं. सरदेशमुखांच्या घरातलं फर्निचर अगदी साधं, कुठलाही बडेजाव मिरवणारं नव्हतं. मात्र लहानशा आलमारीत, टी-पॉयवर, इकडे तिकडे पुस्तकं ठेवलेली होती. भिंतीवर त्यांच्या वडलांची तसवीर होती. त्या पहिल्याच भेटीत सरदेशमुखांमध्ये आणि माझ्यात एक अपूर्व आणि अनपेक्षित जवळीक निर्माण झाली. आम्ही एकमेकांशी खूप बोललो. खरं सांगायचं तर तेच आपल्या थरथरत्या आवाजात भरभरून बोलले. मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. त्यांच्या त्या लहानश्या दिवाणखान्यात आम्ही सुमारे एक-दीड तास एकत्र होतो, त्यांच्या मुलीने अगत्याने चहा आणून दिला आणि कामानिमित्ताने ती बाहेर गेली. मग घरी आम्ही दोघंच उरलो. सकाळचे साडेनऊ- पावणेदहा झाले असावेत, खिडकीबाहेर लख्ख सूर्यप्रकाश फाकला होता. हवेत हलका गारवा होता. समोरच्या गॅलरीतून येणाऱ्या लख्ख प्रकाशात सरदेशमुखांना मी