पान:निवडक अंतर्नाद.pdf/१८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतर्बाह्य न्याहाळण्याचा प्रयत्न करत होतो. ब्याऐंशी-त्र्याऐंशी वर्षांच्या सरदेशमुखांची प्रकृती बरी नसल्याचं जाणवलं. त्यांची हालचाल संथ होत होती. सांधेदुखीचा त्रास असावा बहुधा, डोळेही नीट काम करत नसावेत. वाचताना त्रास होई. इतरही काही त्रास होते. मी त्यांना सप्रेम भेट दिलेल्या माझ्या कादंबरीची प्रत त्यांनी उघडून बघितली आस्थेने तिला न्याहाळलं आणि "मला वाचताना जरी त्रास होत असला तरी ही कादंबरी मी कोणाकडून तरी खास वाचून घेईन' असं त्यांनी मला आश्वासन दिलं. मग त्या प्रतीच्या आत माझ्या घरचा फोन नंबर लिहायला त्यांनी मला सांगितलं. "वाचली की तुमच्याशी बोलेन' असं म्हणाले, "तुम्ही काय काय वाचता?” त्यांनी विचारलं. मी सांगू लागलो, व्हिक्टर ह्यूगो, डोस्टोव्हस्की, टॉलस्टॉय, हर्मन हेसे ही आमची समान दैवतं निघाली आणि ते एकदम खुलले. ह्यूगो, हर्मन हेसे, डोस्टोव्हस्कीबद्दल बोलताना त्यांचा थरथरणारा स्वर उत्तेजित झाला आणि चष्म्याच्या आड दडलेल्या त्यांच्या स्निग्ध नजरेत या लेखकांबद्दल वाटत असलेला प्रेमादर अगदी ओतप्रत भरला होता. स्वत:ला विसरून दुसऱ्या कुठल्याही लेखकाबद्दल आत्मीयतेने बोलणारा कुठलाही लेखक मला मोठा माणूस वाटतो. सरदेशमुख हर्मन हेसे, ह्यूगोबद्दल भान विसरून बोलू लागले. ते सारंच बोलणं या विचारवंत कादंबरीकाराच्या जीवनाचा अर्क होता. साच्या दिग्गजांनी त्यांच्या लिखाणाबद्दल किती प्रचंड निष्ठा दाखवली, हे सांगताना त्यांच्या स्वरात मला कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या साहित्यिक निष्ठेचेही प्रतिध्वनी ऐकू येत होते. "मी तसा खूप बोलणारा नाही, पण काय कोण जाणे, तुम्हांला बघितलं आणि खूप बोलावसं वाटू लागलं," ते म्हणाले. तेव्हा त्यांचा आवाज भावाकुल आणि डोळे किंचित पाणावलेले वाटले. "माझा मुलगा जर असता तर तो आज तुमच्या एवढा असता, ” ते अगदी सहजपणे बोलून गेले. त्यांच्या दिवंगत पत्नीबद्दल आणि कौटुंबिक समस्येबद्दलही ते थोडं बोलले. "माझ्या साइखेड संस्थानावरच्या कादंबऱ्यांबद्दल वाचकांना कमालीची उत्सुकता वाटत असते आणि रघुवीरसिंह नावाचा असा कुठला राजा, त्याचा देसाई नावाचा कारभारी हे खरोखरच होऊन गेले का ? हा त्यांचा प्रश्न असतो. या कादंबऱ्यांच्या पात्रांची वाचक नेहमीच उत्सुकतेने विचारपूस करत असतात. ही पात्रं खरी असावीत असा सगळ्यांचा संशय आहे. पण मी याबद्दल कुठलंही विधान करत नाही. माझ्या कादंबऱ्या या साहित्यिक कलाकृती म्हणूनच समजाव्यात असं मी वाचकांना सांगतो,” ते सांगू लागले. मात्र त्या कादंबऱ्यांमधली आत्मचरित्रात्मकता कुठे आहे हे त्यांनी मला मोकळेपणे सांगितलं. तशा अर्थाचं त्यांचं विवेचन 'बखर : एका राजाची'च्या प्रस्तावनेत आलंच आहे, पण माझ्याशी बोलताना त्यांनी आपल्या वडलांबद्दल फार उमाळ्याने सांगितलं. सच्छील प्रवृत्तीच्या, नेकदार चारित्र्याच्या आपल्या वडलांचा संस्थानदरबारी कसा आणि किती छळ झाला, हे सांगताना त्यांच्या चेहेऱ्यावरची व्यथा ताजी वाटत होती. दुष्टांची वक्रता, खलत्व, अन्याय याबद्दलची व्यथा त्यांच्या शब्दांमधून पाझरत होती. संस्थानच्या चाकरीत त्यांच्या वडलांची जबरदस्त मानखंडना झाली होती, भयंकर मानसिक छळ झाला होता. सरदेशमुखांचं काळीज त्यांनी आपल्या वडलांच्या स्मृतिकोषात अलगद ठेवून दिलेलं होतं. वडलांची ओली आठवण त्यांच्या शुष्क वृद्धापकाळाचा आसरा असावा. वडलांबद्दल बोलताना त्यांच्या आवाजाची कंपनं मला स्पर्शन गेली. त्यांच्या लेखनाची प्रेरणा मला त्यांच्या वडलांच्या जीवनातून त्यांच्यापर्यंत संक्रमित झालेली वाटली. ब्याऐंशी-त्र्याऐंशी वर्षांच्या पक्व आणि व्यामिश्र जीवनानुभवाने समृद्ध झालेले सरदेशमुख बोलता बोलता वडलांबद्दल इतके कोवळे झाले, की ते ऐकून कुणाही व्यक्तीच्या काळजात पितृप्रेमाचे कोवळे कोंभ फुटले असते, हर्मन हेसेची 'स्टिपनवुल्फ कादंबरी माझी आवडती त्यांचीही ती आवडती कादंबरीतला एकाकी नायक हॅरी जेव्हा सायंकाळी आपल्या एकाकी घरी परतून येतो तेव्हा शेल्फवर विराजमान झालेले डोस्टोवस्की, टॉलस्टॉय, शेक्सपीयर हे साहित्यिक व मोझार्ट, बिथोवन हे संगीतकार त्याची कशी आतुरतेने वाट बघत असतात, हे हेसे वाचकांना सांगतो. हेसेचा 'स्टिपनवुल्फ' एकाकी नव्हता. त्याची मैत्री अशा अभिजात कलाकारांसोबत होती आणि हे फार भाग्याचं आहे, असं मी म्हटलं. यावर सरदेशमुखांनी मान डोलावली, पण त्यांच्या चेहेऱ्यावर एक मुरलेली व्यथा झाकोळून गेली. ती बघून मी व्यथित झालो आणि त्या भयंकर शक्यतेने दचकलो. “मी फार एकटा आहे ह्ये,” ज्या वेदनेने ते हे बोलून गेले त्या स्वरांचं शब्दांकन मला कधीही करता येणार नाही. आपलं एकटेपण आपल्यापाशीच जपून ठेवणारी लहान-मोठी माणसं भोवताली असतातच, सरदेशमुख हे तर नक्कीच त्या कुळातले वाटत होते. पण आम्हा दोघांच्या त्या संवादात असं काही तरी दडलेलं असावं, की त्यांना आपल्या एकटेपणाबद्दल उमाळा आला. मी ते कानकोंडं होत ऐकून घेतलं, ऐकून मला सूक्ष्म अपराधी टोचणी लागली. मी खिडकीबाहेर बघितलं. तिथला सूर्य रखरखीत वाटत होता. गेल्या पन्नास-साठ वर्षांतलं किंवा न जाणो, संपूर्ण ऐंशी वर्षांतलं, त्यांचं अवघं एकटेपण त्यांच्या स्वरांतून नकळतपणे पाझरून गेलं होतं. एकटेपणा हा त्यांचा आत्मप्रत्यय असावा का? तसा तो असेल तर दुसरी एखादी व्यक्ती त्यावर काय बोलणार ? सरदेशमुख, तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासोबत सारे आहेत हे सांगणं सोपं, पण सोपं बोलणं, वागणं, विचार करणं हे साइखेड कादंबऱ्यांच्या लेखकाला माहीत असेल का? त्यांच्या कादंबऱ्यांवर एकवार नजर फिरवली तरी त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांचं जीवन किती अनघड, व्यामिश्र आणि शोकात्म आहे हे जाणवतं, अशी सृष्टी निर्माण करणाऱ्या कादंबरीकाराला तो एकटा नाही हे कुठल्या तोंडाने सांगायचं? निरुत्तर होऊन मी त्यांच्याकडे बघत बसलो होतो. विलास सारंगांच्या अलीकडच्या एका प्रदीर्घ मुलाखतीत मुलाखतकारांनी सारंगांना 'एकाकीपणाचा शिल्पकार' म्हटल्याचं आठवलं. याचा अर्थ सारंगांनी आपल्या या एकाकीपणाला घडवलं, जाणीवपूर्वक कोरून काढत आपलं जीवन आणि निवडक अंतर्नाद १८७