पान:निवडक अंतर्नाद.pdf/१८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साहित्य निर्माण केलं. तो त्यांचा निर्णय होता, पण खिडकीबाहेर हळूहळू चढत जाणाऱ्या त्या शुष्क दिवसांत त्या दिवाणखान्यात माझ्यासमोर बसून आपल्या पाणीदार डोळ्यांनी, थरथरत्या आवाजात, सरदेशमुख मला सहोदर समजून जे काही बोलत होते त्यावरून सरदेशमुखांना 'एकाकीपणाचा शिल्पकार' म्हणण्याचं धाडस मला झालं नाही. एकाकीपणाचं शिल्प त्यांना नकोसं वाटत असावं. आयुष्यात एकाकीपणाची निवड त्यांनी जाणीवपूर्वक केली नसावी बहुधा एकाकीपणा त्यांच्यावरचं संकट होतं. शिल्पकार हा स्वतःच्या मनातली प्रतिमा कोरत कोरत तिच्याशी तादात्म्य पावतो. सरदेशमुख आपल्या लेखनातून खलत्वाच्या समस्येला भिडले. या चिरंतन समस्येवर उपाय नाही, असं काहीतरी प्रौढ, अस्वस्थ करणारं सत्य त्यांनी सांगितलं. माणसाला माणूस म्हणून जगण्यात नैतिक हताशा येते हे त्यांनी रघुवीरसिंह राजाच्या संवेदनशील रूपकातून, देसाईंच्या निष्ठावान सेवेतून आणि राजस नावाच्या प्रेयसीच्या हताशेतून सांगितलं. कुणाला आवडो, न आवडो, पण इतिहासाचे अनुसर्जन करणारी त्यांची प्रखर नैतिक लेखणी ही सुईसारखी टोकदार आहे. त्यांच्या कादंबऱ्यांतून मानवी जीवनाचे अतार्किक विभ्रम आपल्या अंगावर मारेकऱ्यांसारखे धावून येतात. गारठवून यकतात. अंतर्मुख करतात. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यानंतर चौथी मूलभूत मानवी गरज म्हणजे 'हिरवा निळा द्वेष तर नसेल? हा प्रश्न सरदेशमुखांच्या कादंबऱ्या वाचून मला पडतो, हा हिरवा-निळा, काहीसा वेडसर भासणारा द्वेष त्यांच्या तिन्ही कादंबऱ्यांचा जणू स्थायिभाव आहे द्वेष व असूया, खुळचट निरर्थक, हिंसक द्वेष आणि त्याला बळी पडणारी सत्त्वशील, मनात पासयदान पुटपुटणारी, निर्विष माणसं रंगवताना सरदेशमुखांना किती वेदना झाल्या असतील? पण त्या सुसह्य व्हाव्यात म्हणून त्यांनी कधी आपल्या जीवनदृष्टीशी, नैतिक धारणेशी, कलात्मक भानाशी आदर्शवादी तडजोड केलेली दिसत नाही. राजकीय सत्ता, मानवी चरित्र व नैतिकता, परिघावरच्या उपेक्षितांचे अंतरंग, स्त्री-पुरुषांचे भावुक व लैंगिक संबंध हे स्वतःच्या आस्थेचे विषय मानणाऱ्या सरदेशमुखांनी स्वतःला आणि वाचकांना केवळ बरं वाटावं म्हणून स्वतःच्या अभिव्यक्तीशी आदर्शवादी तह केलेले नाहीत, तर मग सरदेशमुखांच्या अवघ्या लेखनाचं प्रयोजन काय ? कुठली जीवनमूल्यं त्यांना खुणावत असावीत? मला वाटतं, अभिजात संवेदनशीलता, चिंतनशील आत्मानुभूती व प्रखर वास्तववादी दृष्टी या तीन गोष्टी म्हणजे त्यांच्या मूल्यांचा गाभा होता. या मूल्यभानाला पितृप्रेमाची बैठक आहेच. हे सारं मला त्यांना सांगायचं होतं, पण हे काही मला त्या भेटीत बोलता आलं नाही. त्यांच्या वाणीचा ओघ थांबवणं मला अप्रस्तुत वाटलं, ते करंटेपणाचंही ठरलं असतं. मी त्यांना अखंड बोलू दिलं. अंतर्मुख माणूस जेव्हा बोलतो, उमाळ्याने बोलतो, तेव्हा त्याच्याइतकं सुंदर चालतं बोलतं शिल्प कुठलंच नसतं. तरीही मला त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटत होता. कारण त्या प्रश्नाच्या उत्तरात कदाचित, मला माझ्या मनातले प्रतिध्वनी १८८ निवडक अंतर्नाद ऐकायला मिळाले असते. ते ऐकायला माझं मन आतुर होतं. मला त्यांना जो प्रश्न विचारायचा होता, तो खरं तर, माझ्या पाठीमागे देणेकऱ्यासारखा दहा-वीस वर्षांनी लागणारच होता. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर वीस वर्षांनंतर काय राहील हे मला सांगता येत नव्हतं. सरदेशमुखांकडे या प्रश्नाचं उत्तर तयार असेल असं वाटल्याने मी त्यांना दबकतच विचारलं, "एक कादंबरीकार म्हणून, एक लेखक म्हणून तुम्ही समाधानी आहात काय?" त्यांनी माझ्याकडे रोखून बघितलं. मी संकोचलो अदृष्टाची भीती एका झटक्यात मनाला स्पर्शन गेली. “विश्राम, मी देवाला एकच मागणं मागतो, पुढच्या जन्मी तरी मला युरोपमध्ये एक लेखक म्हणून जन्माला घाल, " सरदेशमुख बोलून गेले. हे बोल त्यांनी त्यांच्या अंतर्यामी खूप घोळवलेले वाटले. मनात खूप साचून राहिलेली ही सल असावी. ती उच्चारताना त्यांच्या चर्चेवर एक निर्मम वेदना तरळत होती आणि स्वरात अमिट कारुण्य. त्यादिवशी तरी मला त्यांच्याकडून नेमकं हे उत्तर ऐकायचं नव्हतं. त्यादिवशी मनाची उभारी वाढेल असं काहीतरी चांगलंचुंगलं मला त्यांच्याकडून हवं होतं. (माझ्या कादंबरीला त्या संध्याकाळी पुरस्कार मिळणार होता!) पण सरदेशमुखांनी देवाकडलं हे मागणं माझ्या पुढ्यात उच्चारलं, तेव्हा मला खिन्न वाटलं. संभ्रमित वाटलं. ज्या लेखकाला मी प्रगल्भ जीवनदृष्टीचा शिल्पकार समजत आलो होतो त्याच्या काळजात उपेक्षेचं हे शल्य केव्हा आणि कोणी खुपसलं? त्यांच्या समोर बसल्याबसल्याच मी अंतर्मुख झालो, हताश झालो. निरुत्तर झालो. याबद्दल पुढे काही छेडून मी त्यांना आणि स्वतःला अधिक त्रास करून घेणार नव्हतो. पण गंभीर निष्ठेने लिखाण करणाऱ्या आमच्यातल्या एका सशक्त कादंबरीकाराला आम्ही असं कसं एकाकी टाकलं? खरंच वाचकांनी त्यांची उपेक्षा केली, की त्यांना स्वतःच्या उपेक्षेचा भास झाला? किती कठीण प्रश्न होता हा ! साक्ष तरी कोणाची काढायची? याबाबतीत त्यांचीच साक्ष मला पुरेशी वाटली. देशमुखांना पुढच्या जन्मी लेखक म्हणूनच, पण युरोपमध्ये जन्माला यायचं होतं. त्यांचा आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास असावा, कर्मविपाक सिद्धान्तावर श्रद्धा असावी, हर्मन हेसेच्या आधिभौतिक आशय असलेल्या दोन अप्रतिम, अर्थगर्भ कादंबऱ्या, 'सिद्धार्थ' आणि 'जर्नी टू इस्ट' सरदेशमुखांनी आपल्या अभिजात मराठी शैलीत अनुवादित केल्या आहेत. त्यावेळी हेसे जिवंत होता आणि सरदेशमुखांचा व त्याचा प्रत्यक्ष पत्रव्यवहार झाला होता. तो त्यांनी मला सविस्तर वर्णन सांगितला, मग कसेबसे उठून, कपाटातून या दोन कादंबऱ्यांच्या मराठी अनुवादाची नवी प्रत त्यांनी काढून मला भेट दिली. मुखपृष्ठावर हर्मन हेसेचं छायाचित्र छापलेलं आहे ते आम्ही दोघांनी एकत्र बसून कौतुकानं न्याहाळलं. त्या अनुवादावर सरदेशमुखांची स्वाक्षरी मला हवी होती, पण बोलण्यात ते राहूनच गेलं. माझी वेळ संपत आली होती. त्यांचा निरोप घेण्यासाठी मी उठलो. त्यांनी माझ्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला आणि मेजावर