पान:निवडक अंतर्नाद.pdf/१९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाईटपणा विकत घेणारा माणूस मिलिंद जोशी 'नमस्कार करावा अशी पावलं आज दिसत नाहीत. संस्थात्मक पातळीवर तर अभावानेच निःस्पृह माणसे भेटतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कातडीबचाऊ धोरण अवलंबिणाऱ्या माणसांचा गजबजाट सभोवती दिसतो. अशा परिस्थितीत संस्थेचे चारित्र्य सांभाळण्यासाठी वाईटपणा विकत घेणाऱ्या डॉ. गं. ना. जोगळेकरसरांचे स्मरण करणे ही गोष्ट निश्चितच बळ देणारी ठरेल." १४ ऑगस्ट २००७ या दिवशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. गं. ना. जोगळेकर काळाच्या पडद्याआड गेले. १३ ऑगस्टला सासवड येथे आचार्य अत्रे साहित्यसंमेलनासाठी मी त्यांच्याबरोबर गेलो होतो. सोबत म. सा. प. च्या कार्यवाह नंदा सुर्वे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे म सा. प. चे प्रतिनिधी राजन मुठाणे होते. प्रवासात जोगळेकरसरांना उलटी झाली होती, "सर, आपली तब्येत बरी नसेल तर परत जाऊ या का?" असं मी त्यांना विचारलं. पित्तामुळे उलटी झाली असेल, असं कारण सांगत त्यांनी गाडी सासवडच्या दिशेने न्यायला सांगितली. तिथे त्यांनी संमेलनात भाषण केले. उद्घाटनाच्या सत्रानंतर ना. धों. महानोर, जब्बार पटेल यांच्याबरोबर आम्ही जेवण केले. छान गप्पा झाल्या. परतीच्या प्रवासातही ते आमच्याशी मनापासून बोलत होते.. त्याच दिवशी संध्याकाळी पुण्याला परिषदेमध्ये श्याम भुर्के आणि गीता भुर्के यांचा 'खुमासदार अत्रे' हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता. सासवडहून पुण्यात आलो, तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. परिषदेतला कार्यक्रम साडेसहा वाजता होता. मी सरांना म्हणालो, "सर, आज प्रवासाची दगदग झालेली आहे. त्यामुळे विश्रांती घ्या. संध्याकाळच्या कार्यक्रमाला आला नाहीत तरी चालू शकेल.” त्यावर मंद स्मित करीत नेहमीच्या शैलीत ते म्हणाले, "बघतो," सर घरी गेले. पण बरोबर साडेसहा वाजता हातात पिशवी आणि काठी घेऊन त्यांची मूर्ती परिषदेच्या दारात उभी. मला आश्चर्याचा धक्काच बसला. तो कार्यक्रम संपेपर्यंत सर परिषदेत उपस्थित होते. साडे आठला कार्यक्रम संपला ते आणि मी दोघेही रिक्षाने प्रवास करणारे. मी त्यांच्यासाठी रिक्षा आणून दिली. "उद्या लवकर या. आपल्याला काही पत्र पाठवायची आहेत. " असे म्हणत ते रिक्षात बसले. मीही माझ्या घरी आलो. पहाटे पाच वाजता माझा दूरध्वनी वाजला परिषदेतला सेवक महेंद्र मुंजाळ बोलत होता, 'सर गेले' असा निरोप होता. माझा विश्वासच बसत नव्हता. काल दिवसभर मी ज्यांच्या बरोबर होतो ते आज हयात नाहीत? माणूस पराक्रमी असला तरी १९० निवडक अंतर्नाद नियती क्रूर असते, असेच म्हणावे लागेल. मला अजूनही तो प्रसंग स्पष्टपणे आठवतो, अंतर्नादच्या २००५ सालच्या दिवाळी अंकात जोगळेकर सरांचा 'साहित्यसंस्था : काल, आज आणि उद्या' हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात सरांनी साहित्यसंस्थांचे जरा जास्तच कौतुक केले होते. त्यांचे काही विचार मला पटले नाहीत, त्या लेखावरची प्रतिक्रिया व्यक्त करणारे माझे पत्र मी अंतर्नादकडे पाठविले. 'डॉ. जोगळेकरांचा लेख एकांगी' अशा शीर्षकाचे ते पत्र संपादकांनी पुढच्या अंकात प्रसिद्ध केले. साहित्यसंस्था, तिथले राजकारण, साहित्याशी सुतराम संबंध नसलेली तिथली माणसे यांवरती टीका करीत मी माझा मोर्चा म. सा. प.कडे वळविला होता. मसापच्या ग्रंथालयाच्या दुरवस्थेबद्दल लिहिले होते. हे पत्र प्रसिद्ध झाले, त्याच महिन्यात मसापच्या ग्रंथालयातून पुस्तक बदलून मी येत होतो. सरही नेमके त्याचवेळी परिषदेच्या फाटकातून आत येत होते. पत्र मोठ्या धाडसाने लिहिलेले असले तरी मी चपापलो. सरांना चुकवून जावे म्हटले तर सरांनी मला पाहिले होते. माझ्याजवळ येऊन थांबत त्यांनी त्यांची ती कडक नजर माझ्यावरच रोखली आणि आपल्या नेहमीच्या धीरगंभीर आवाजात म्हणाले, "अंतर्नादमधली तुमची प्रतिक्रिया वाचली. लिहिता चांगलं, पण वस्तुस्थितीचा विचार करा. साहित्यसंस्थांच्या बाहेर राहून संस्थांवर टीका करणं सोपं आहे. इथे या, काम करा, अनुभव घ्या, मगच आपली मतं बनवा." ते बोलत असताना मी शांत होतो. त्यांच्या पाठोपाठ मी त्यांच्या खोलीत आलो. त्यांनी बेल दाबली. तिथल्या सेवकाला म्हणाले, "जोशींना चहा सांगा, माझ्या वाटणीची साखर त्यांच्याच कपात घालायला सांगा.” स्वतःचा चष्मा कपाळावर घेत खिशातल्या रुमालाने अलगद डोळे पुसत माझ्याकडे पाहत ते म्हणाले, "सध्या काय लिहिता आहात ? माझी एक तक्रार आहे, तुम्ही व्याख्यानात फार वेळ वाया घालवता लिहिलेलं तेवढंच मागे उरतं हे लक्षात ठेवा." त्या दिवशी जर माझी आणि सरांची भेट झाली नसती, तर कदाचित मी साहित्यपरिषदेच्या निवडणुकीत भागही घेतला नसता.