पान:निवडक अंतर्नाद.pdf/१९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असत. डॉ. जोगळेकरांना माणसं पारखण्याची एक दृष्टी होती. स्वार्थी हेतूने आलेली माणसं ते क्षणार्धात ओळखत, एका घावात दोन तुकडे करून अशा लोकांचे मनसुबे उधळून लावत. जोगळेकरांनी हा फटकळपणा जाणूनबुजून स्वीकारला होता, तो संस्थेचे चारित्र्य निष्कलंक ठेवण्यासाठी आपण केवळ पूर्वसुरींच्या परंपरा सांगतो, त्यांच्या कामाचा अभिमानाने उल्लेख करतो, पण हा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी ही आपल्यावरच आहे आणि म्हणून आपली निष्ठा अव्यभिचारीच असली पाहिजे, असं ते सारखं बजावत असत. मी त्यांच्या विरोधी पॅनलमधून निवडून आलो होतो, पण हा विरोधातला, अशी त्यांची भूमिका कधीच राहिली नाही, त्यांच्याकडे व्यक्तीच्या गुणवत्तेला प्राधान्य होते. वयाने लहान असणाऱ्या माझ्यासारख्या सहकाऱ्याला त्यांनी जे प्रेम, मार्गदर्शन दिले ते मला आयुष्यभर पुरणारे आहे आवडत्या माणसांवर ते जिवापाड प्रेम करीत असत. आमच्या म. सा. प.च्या ग्रंथालय विभागाचे कार्यवाह अनंत जोशी हे एक अतिशय उत्साही व्यक्तिमत्त्व, त्यांनी कार्यवाह म्हणून निवडून आल्यानंतर अल्पावधीतच स्वतंत्र कामाची चुणूक दाखविली. ग्रंथालयाचा कायापालट केला. भावी योजनांसाठी देणग्या मिळविल्या. डॉ. जोगळेकर त्यांच्या कामाचे मनापासून कौतुक करीत असत. एके दिवशी अनंत जोशी बाथरूममध्ये पाय घसरून पडले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. डॉ. जोगळेकर त्यांना भेटण्यासाठी दवाखान्यात गेले. विचारपूस झाली. निघायच्या वेळेला डॉ. जोगळेकरांनी पिशवीतून आणलेले पन्नास हजार रुपये अनंत जोशी यांच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, "दवाखान्यात खूप खर्च येतो, असू द्या हे तुमच्याजवळ. नंतर मला परत करा. आणि केले नाही तरी चालतील.” अनंत जोशी यांचे डोळे भरून आले. अनंत जोशी यांची पैशाची व्यवस्था झालेली होतीच, त्यांनी ते पैसे डॉ. जोगळेकरांना परत केले. समाजाच्या दृष्टीने शिष्ट, परखड, हेकट असा शिक्का बसलेल्या सरांचे या प्रसंगातून एक वेगळे रूप दिसले. संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी त्यांच्यातला माणूस असा तत्परतेने धावून जात असे, आणि तोही कोणताही गाजावाजा न करता, जे काम आपण स्वीकारले आहे, त्यासाठी पूर्णपणे वाहून घेणे हा सरांचा स्वभाव होता. म. सा. प.चा हाडाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना त्यांनी केवळ तन आणि मन अर्पण केले असे नाही, तर धनही दिले. स्वतः हजारो रुपयांच्या देणग्या दिल्या. तेवढ्याच मिळविल्या. ह्य 'थँकलेस जॉब' करताना परिषदेकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. सर तीस वर्षे परिषदेसाठी काम करीत होते. पूर्वी दुचाकीवर येत असत, गेल्या काही वर्षांत रिक्षाने येत होते. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनही वेळेला स्वखर्चाने रिक्षाने येत असत. गेल्या तीस वर्षांतल्या या फक्त प्रवासखर्चाचा जरी हिशोब मांडला तरी तो काही लाखांमध्ये जाईल. आर्थिक पदरमोड करून संस्थेसाठी झिजणारा असा व्रतस्थ कार्यकर्ता शोधूनही सापडणार नाही. जोगळेकरांवर टीकास्त्र उगारणाऱ्यांना साहित्यसंस्थेसाठीचे त्यांचे हे दातृत्व कधी समजलेच नाही. आज जोगळेकरसर आपल्यात नाहीत, पण त्यांनी उभा केलेला कामाचा डोंगर आपल्यासमोर आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी दिलेली पालखी निर्धाराने पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. नमस्कार करावा अशी पावले आज दिसत नाहीत. संस्थात्मक पातळीवर तर अभावानेच नि:स्पृह माणसे भेटतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कातडीबचाऊ धोरण अवलंबिणाऱ्या माणसांचा गजबजाट सभोवती दिसतो. अशा परिस्थितीत संस्थेचे चारित्र्य सांभाळण्यासाठी वाईटपणा विकत घेणाऱ्या जोगळेकरसरांचे स्मरण करणे निश्चितच बळ देणारे ठरेल. (जानेवारी २००८) कादंबरीलेखकांना सूचना! उत्तम कादंबरी लिहू इच्छिणाऱ्या लेखकांना विख्यात कादंबरीकार मारिओ पुझो ('गॉडफादर' चा लेखक ) याने काही सूचना केल्या आहेत. त्या अशा - १) कादंबरीचे निवेदन कधीही प्रथमपुरुषी करू नका. २) आपले लेखन दुसऱ्या कोणालाही दाखवू नका. त्यामुळे तुमच्या मनात काही पूर्वग्रह, भये निर्माण होतात. ३) पुन्हा पुन्हा, न थकता लिहीत राहणे, लिहिलेल्या मजकुरावर संस्कार करत राहणे हे उत्तम लेखनाचे आद्य रहस्य आहे. ४) लोकांना जो तुमचा लहरीपणा वाटतो ती खरे तर तुमची चिंतनशील एकाग्रता असते. ही तन्मयताच लेखकाच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. ५) टीका, समीक्षा वगैरे सुरुवातीला वाचणे ठीक आहे पण नंतर टीकेपेक्षा इतर लेखकांच्या कादंबऱ्या वाचत राहा. त्यातून कादंबरीलेखनाचे कसब तुम्हाला आत्मसात करता येईल. (शान्ता ज. शेळके यांच्याकडून प्राप्त) (मे २००६ ) निवडक अंतर्नाद १९३