पान:निवडक अंतर्नाद.pdf/१९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घरात तुमच्या डोळ्यासमोर कोणतं महाभारत घडलं आहे, ते मला काय माहीत?” दादा शांत आवाजात म्हणाले, "या द्रौपदीशी सर्वाधिक संबंध तुझाच आहे " - मला आता घाम फुटायला लागला होता. तेवढ्यात दादा मिस्कीलपणे म्हणाले, "अरे! द्रौपदी म्हणजे तुझी मोटारगाडी! आम्ही सर्व भाऊ ती वापरत असतो!” - आता आमच्या 'गेटटुगेदर' मध्ये हा फिशपॉड विचारल्यावर एक तास काय सन्नाटा पसरला असेल आणि काय धमाल उडाली असेल, जरा मनासमोर आणून बघा. दादांच्या समोर असलेला हा 'शिकारखाना' केवढा वेगळा होता हे समजावे म्हणून अनेक 'भारी' संवादांतील एक संवाद सांगतो. नरेंद्र आणि नरसिंह दोन ध्रुवावर दोघे आपण म्हणत एकमेकांजवळ उभे असतात, गुण्यागोविंदाने असतात, आता नरेंद्र आणि नरसिंह यांची विज्ञान, धर्म, समाज, श्रद्धा, अंधश्रद्धा यांबाबत अगदी विरुद्ध टोकाची मते आहेत - त्या दोघांना एकत्र जोडणारी एकमेव गोष्ट म्हणजे दारू! मी त्यांना दोघांनाही सांगतो की तुम्हां दोघांना 'दारू न पिण्याचं व्यसन आहे! दारू पिण्याचे व्यसन वाईट व न पिण्याचेपण वाईट! आनंद म्हणून कधीमधी एकदोन घोट घेणे चांगले. कुठल्याच व्यसनात माणसाने सापडू नये! पण हे सांगूनही काही उपयोग नाही. कारण नरसिंहला चहा, कॉफी असले घातक पदार्थ न पिण्याचेपण व्यसन आहे! त्याने अजून आयुष्यात चहा आणि कॉफी याची चव घेतलेली नाही. नरेंद्र आणि नरसिंह एका मुद्द्यावर एकत्र येतात. दारू वाईट, दारूमुळे माणूस रसातळाला जातोय. येथवर ठीक आहे. पण मानव समाजाला दारूपासून मुक्त करण्याचे यांचे मार्ग परस्परविरोधी नरेंद्र 'परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. नरसिंह त्याला एकदा समजावून सांगत होता - "समाज व्यसनमुक्त करण्याचा प्रमुख उपाय म्हणजे, मुलांना घरी आणि शाळेत धर्मग्रंथ शिकवले पाहिजेत. तुझ्या 'अंनिस मुळे समाज धर्मग्रंथांच्यापासून दूर जातो आणि मग त्यातील काही जण व्यसनाधीन होण्याचा धोका संभवतो. म्हणजेच, तुझ्या 'परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राला गिन्हाईक मिळवून घेण्याचं काम तू अंनिसमधून करतोस!” माझी बहीण वेणू पळशीकर, इकॉनॉमिक्समधील गोखले इन्स्टिट्यूटची डॉक्टरेट वसंतराव पळशीकरांची अर्धांगिनी. अर्थातच कायम खादी वापरणारी! आता आजन्म खादी वापरणाऱ्या दादांशी तिचे जरा अधिक जमावयास हवे होते की नाही? पण नाही! संघाच्या सत्याग्रहात गेलेला दीनानाथ चुकला म्हणून तिने उपास केलेला! आणि अशा वेळीही दिनूबरोबर राहिलेले दादा 'दांभिक गांधीवादी' आहेत असे ती आम्हांला पटवून द्यायची! हे असले वाद ऐकून माझी धाकटी बहीण डॉ. अमरजा नेरूरकर, जी अर्थशास्त्राची प्राध्यापक आहे, एकदा दादांना म्हणाली, "तुम्ही तुमच्या बंगल्याचं नाव 'समन्वय' ठेवलंय. तुम्हांला 'समन्वय विद्यापीठाचे कुलगुरू' म्हणतात. मेधा पाटकर, माधवराव चितळे आणि गुजरातचे मुख्यमंत्री यांचं चर्चासत्र आयोजित करून तुम्ही तो तिढा सोडवण्याचापण प्रयत्न केलाच, मात्र समन्वयाशिवाय काही खरं नाही हे तुम्ही आम्हां भावंडांच्याकडून शिकलात! आमचं हे ऋण मान्य करा!” पत्नीसमवेत देवदत्त दाभोळकर दादांच्या आयुष्यातील हा शेवटचा महिना आहे हे त्यांनी व आम्ही सर्वांनीच ओळखले होते. दिवसभर दीनानाथ त्यांच्या जवळ असे. त्यांना वाचून दाखवत असे. त्याने दादांना विचारले, "दादा, परमेश्वर आहे की नाही याबाबत आज तुम्हांला काय वाटतं?” दादांचा चेहरा एकदम फुलला. म्हणाले, "तू प्रथम तुझं मत सांग. तुझं जे मत असेल त्याच्या विरुद्ध माझं मत. मग त्यावर आपण एक छान चर्चासत्र करू या. घरात जे आहेत त्यांना बोलाव!” • यगोर हे देवदतांचे सर्वांत आवडते कवी. त्यांच्या देवदत्तांनी स्वतःच अनुवादिलेल्या या चार ओळी ते नेहमी गुणगुणायचे खुले प्रकाशसागरी सहस्रपद्म शोभन मधुप मुब्ध मी असे धन्य धन्य जीवन... या क्षणीच व्हायचा असेल अंत होऊ दे हेच गीत गात गात मज इथून जाऊ दे - मरणाबद्दलचे हे सजग भान त्यांनी आयुष्यभर आणि अगदी शेवटच्या क्षणातसुद्धा सहजपणे जपले. मृत्यू हे या आयुष्यातील एकमेव सत्य आहे आणि मृत्यू ही या आयुष्यातील सर्वांत सुंदर गोष्ट आहे हे त्यांनी आम्हां सर्व भावंडांना उघडपणे न सांगता, आपल्या वृत्तीमधून समजावून दिले. दादांनी आईप्रमाणेच शरीरदान केले होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या मृत्यूनंतर ८-१० दिवसांनी येणाऱ्या सर्वांच्या सोयीच्या, पहिल्या रविवारी, आपापल्या नव्या कुटुंबांसह, त्यांच्या आठवणी एकमेकांना सांगण्यासाठी आम्ही सगळे जमलो होतो. त्यांच्या इच्छेप्रमाणे हसत-खेळत, आठवणींना उजाळा देत, चाकॉफीचे कप संपवत वेळ कसा गेला कळलेच नाही. त्या प्रसन्न संध्याकाळचा निरोप घेऊन परत जाताना, इरावती कर्वेच्याप्रमाणे मी मनात म्हटले, "केवढं मोठं माझं भाग्य, की हा असला थोरला भाऊ मला मिळाला. आणि त्याहूनही केवढं मोठं माझं महत्भाग्य, की मी थोरला भाऊ होऊन, असली भावंडं मला मिळाली नाहीत!” - आणि माझी अगदी खात्री आहे, परत जाताजाता आम्हां सर्व भावंडांच्या मनात नेमकी हीच भावना असणार! (मार्च २०११) निवडक अंतर्नाद १९७