पान:निवडक अंतर्नाद.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कविता कशी वाचावी, नव्हे अनुभवावी; हे दाखवणारे सदर ज्यावेळी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या, त्यावेळी रसिकांनी त्यांचे वेगळेपण जाणले होते आणि वाचकांच्या त्या ध्यानातही राहिल्या होत्या. त्यांच्या प्रारंभाच्या काही कवितांवर ना. घ. देशपांडे यांच्या शैलीचा पुसट ठसा उमटलेला दिसतो. पण पुढे सर्व कवितांवर स्वतः म. म. देशपांडे यांचीच स्पष्ट छाप आहे, याची आपल्याला खात्री पटल्यावाचून राहात नाही. 'आम्ही स्वान्तः सुखाय म्हणजे केवळ आपल्या स्वतःच्या समाधानासाठी कविता लिहितो,' असा बहुतेक सर्व कवींचा दावा असतो, तो काही अंशी खराही असतो. सर्वच कवी केवळ प्रसिद्धीसाठी, लोकप्रियतेसाठी, लोकानुरंजनासाठी कविता लिहिताना असे म्हणणे बरोबर नाही. ते त्या कवींवर अन्याय करणारे ठरेल. परतु कवी जसजसा नामवंत होऊ लागतो, तसतसे त्याच्या दृष्टीने वाचकांना कमी जास्त प्रमाणात महत्त्व येऊ लागते, यात शंका नाही. दिवाळी अंक असतात, कविसंमेलने असतात, कवितेवरचे परिसंवाद असतात किंवा अन्य काही साहित्यविषयक कार्यक्रम असतात. नाही म्हटले तरी कवी या सायांत कळत-नकळत गुंतत जातो. आपल्या लोकप्रियतेचे काही मोल त्याला द्यावे लागते. ह्य अनुभव सुखद असला तरी कवीच्या एकान्त आत्मसंवादात त्यामुळे काही प्रमाणात तरी विक्षेप येतो. काही कवी मात्र अशा कसल्याही कार्यक्रमात स्वत:ला गुंतवून घेत नाहीत. या प्रलोभनांपासून ते कटाक्षाने दूर राहतात. त्यांची कविता आणि ते स्वत: यांचेच एक दृढ नाते जमलेले असते आणि आश्चर्य असे की या आत्मरत कवींची कविताही लोकांचे मन आकर्षून घेतल्याखेरीज राहात नाही. म. म. देशपांडे हे या दुसऱ्या जातीचे कवी आहेत. पासष्ट साली वनफूल प्रकाशित झाल्यावर मधल्या काळात देशपांडे यांनी जवळजवळ काही लिहिले नाही म्हटले तरी चालेल. अधूनमधून त्यांची एखादी कविता 'सत्यकथे' त वाचल्याचे आठवते. पण एकूण देशपांडे कवितेपासून दूर गेले, असेच म्हणायला हवे. त्याला काही बाह्य कारणेही होती. ग्वाल्हेरसारख्या महाराष्ट्रापासून दूर असलेल्या ठिकाणी वास्तव्य, समानशील कविमित्रांच्या संगतीचा अभाव, पुढे दुर्धर आजाराने केलेला पाठपुरावा यामुळे देशपांडे यांची कविता अगदीच संपुष्टात आली. त्यांच्या काही जिव्हाळ्याच्या मित्रांनी गतवर्षी अंतर्देही या नावाने त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आणि मधल्या काळात इतस्तत: विखुरलेल्या त्यांच्या कविता रसिकांना एकत्रित वाचण्यासाठी उपलब्ध करून दिल्या ही एक चांगली घटना घडली. तरीदेखील म. म. देशपांडे आणि वनफूल यांची जी सांगड मोजक्या व चोखंदळ रसिकांच्या मनात बसली आहे, ती अद्याप तशीच कायम आहे. वनफूल कवितासंग्रहातल्या कवितांना त्यांची स्वत:ची अशी पृथगात्मता आहे अत्यंत साधी पण आतून विलक्षण कसदार अशी त्या कवितांची निवेदनशैली प्रथमदर्शनी आपणाला काहीशी चकवते. तिच्या साधेपणामुळे तिच्यातून वाहणाऱ्या काव्यात्मतेचा स्रोत एकदम जाणवणे अवघड होते. या कवितांत निसर्ग आहे, प्रणयाचे विविध रंग आहेत, समाज, जीवन, परमेश्वर या संबंधीचे काही खोल चिंतन आहे. मुख्य म्हणजे या साऱ्यांना कवीच्या खास त्याच्याच अशा शब्दकळेची जोड लाभली आहे त्यामुळे वरकरणी साध्या, सहज, अल्पाक्षरी असणाऱ्या या कवितेने आपल्याला किती खोलवर हलवून टाकले आहे, अस्वस्थ केले आहे आणि किती दीर्घकाळ ती आपल्याला साथ देत आली आहे, याचा आजही प्रत्यय येतो आणि देशपांडे यांच्या कवितेची शक्ती कळते. सहज सहज आठवणाऱ्या वनफूलमधल्या या काही कवितापंक्ती बघाव्यात - हे रस्ते सुंदर कुठे तरी जाणारे अन् पक्षी सुंदर काहीतरी गाणारे हे पक्षी गाती निरर्थ काही गाणे मी निरर्थकातिल भुलतो सौंदर्याने संध्येचा श्यामल हात कोवळा पकडू पाहतो नदीकाठचा उडता बगळा! तळ्यात चांदणी न्हाते आहे पाहू नकोस! अशा ओळी इतक्या वर्षांनंतरही आपल्याला आठवतात. मराठी कवितेने नंतर कितीही वळणे घेतली तरी देशपांडे यांची कविता रसिकांना खुणावत, मुग्ध करत तशीच आपल्या जागी स्थिर आहे, जिवंत आणि चैतन्यमय आहे, याचा सुखद प्रत्यय येतो. या बाबतीत म. म. देशपांडे यांचे दुसऱ्या एका देशपांड्यांशी ना. घ. देशपांड्यांशी - जवळचे नाते आहे, असे जाणवते. अंतरिक्ष फिरलो पण... ही वनफूलमधली एक सुंदर कविता. या कवितेत कवीने आपली स्वतःची एक व्यथा निवेदन केली आहे पण खरे म्हटले तर साऱ्या मानवजातीचेच ते एक सनातन दुःख आहे मानवप्राणी हा या जड भूमीशी, इथल्या ठाम वास्तवाशी खिळलेला आहे कायमचा बांधलेला आहे परंतु तरीही आकाशाचे, आकाशापलीकडे असणाऱ्या एका अगम्य शक्तींचे त्याचे आकर्षण कधीही सुटत नाही, सुटलेले नाही. शरीर जड पार्थिवाला खिळलेले आणि मन मात्र अपार्थिवाकडे सतत झेप घेऊ बघणारे असे एक विलक्षण द्वंद्व माणसाच्या वाट्याला कायमचे आलेले आहे. त्या द्वंद्वाचा उल्लेख अनेक कवींच्या काव्यात आलेला आढळतो. बालकवी म्हणतात जीव धावतो वरवर जाया चैतन्यापाठी परी सुटेना जड भूमीशी दृढ बसली गाठी ! कुसुमाग्रजांच्या कवितेतही भूमी आणि आकाश यांच्यामधले कवीला परस्परविरुद्ध दिशेला खेचणारे बंध अनेकदा आढळून निवडक अंतर्नाद १९