पान:निवडक अंतर्नाद.pdf/२०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( पुढे १९८८ नंतर मेहता प्रकाशनाने माझे तीन- चार कथासंग्रह काढले.) मला वाटते, आरंभीच्या काळातील पुस्तके रसिकांपर्यंत नीट पोचली नाहीत, तर त्या लेखकाची लेखक म्हणून प्रतिमा उभी राहण्यामध्ये अडचणी येतात. त्या दृष्टीने लेखकाने सजग राहिले पाहिजे. एवढेच नाही, तर लेखकाने आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माझा मित्र असणाऱ्या एका ज्येष्ठ समीक्षकाने असे म्हटले होते, की समीक्षा आणि ललितलेखन करणाऱ्या लेखकांची लेखक म्हणून प्रतिमा नीट निर्माण होत नाही. काहीतरी एकच लिहावे. म्हणजे समीक्षा तरी किंवा ललितलेखन तरी, मला मात्र असे वाटते, की लेखकाला जे जे लिहावेसे वाटते, ते ते त्याने लिहिले पाहिजे. अर्थात त्यासाठी कुठल्या तडजोडी कराव्यात, असे मी म्हणणार नाही. परंतु पुस्तके महाराष्ट्रात सर्वदूर पोचली पाहिजेत, त्यावर बरी वाईट चर्चा झाली पाहिजे, यासाठी तरी लेखकाने प्रयत्न केले पाहिजेत. हे मी आज सांगतो आहे, परंतु हे मला मात्र जमले नाही. मला वाटायचे, आपले साहित्य चांगले असेल, तर त्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे, हे तत्त्वतः बरोबर असले, तरी असे होईलच असे मात्र नाही. मह्यविद्यालयीन जीवनात मी केलेले लेखन बाजूला ठेवले, तरी साधारणत: १९७० पासून माझा उमेदवारीचा कालखंड सुरू होतो. उमेदवारीचा कालखंड किती असावा, याचे काही गणित नाही. काही लेखकांना एका पुस्तकातच इतकी प्रसिद्धी मिळते, की त्यांची उमेदवारीच संपून जाते. मी मात्र साधारणतः दहा वर्षे तरी उमेदवारीच करीत होतो, असे वाटते. या दहा वर्षांत कवी म्हणून चांगली प्रतिमा उभी राहिली होती. कथाकार म्हणूनही चर्चा होत होती. परंतु दोन संग्रह येऊनही ते लोकांपर्यंत मात्र पोचले नव्हते, कथासंग्रहांचे जसे झाले, त्याप्रमाणेच समीक्षालेखनाचेही झाले. कादंबरीकार आणि विनोदी लेखक असणारे मित्र त्र्यंबक असरडोहकर यांनी अचानक २५ वर्षांची बँकेतील नोकरी सोडून दिली. लेखनावर जगायचे, असा त्यांनी ध्यास घेतला. परंतु लेखनावर जगता येत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी 'रिमझिम प्रकाशन' या नावाने व्यवसाय सुरू केला. मी समीक्षेचे 'पापुद्रे' हे पुस्तक त्यांना दिले. त्याचे वितरण त्यांनी चांगले केले. परंतु प्रकाशन नवे होते. पुस्तक प्रकाशित झाले एवढेच. या उमेदवारीच्या कालखंडात कोणी फारसे मार्गदर्शन केले, असे आठवत नाही. महाविद्यालयात असताना प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, प्रा. जाजू आणि प्राचार्य धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन असायचे. पुढे डॉ. रसाळ, डॉ. पवार हे माझे शिक्षक असले, तरी माझ्या साहित्याबद्दल त्यांच्याशी क्वचितच चर्चा झाली. 'चला, एक कुत्रा तर संपला' ही कथा वाचून डॉ. गो. मा. पवार यांनी आवडल्याचे सांगितले होते. डॉ. रसाळ 'प्रतिष्ठान' साठी माझे कोणते साहित्य निवडतात, ते मी बारकाईने पाहत होतो. एका प्रकारे त्यांच्याशी घडणारा हा मूक संवाद होता. माझी एक कविता एका लघू अनियतकालिकात प्रकाशित झालेली होती. ती पाहून प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु मी उत्तम दीर्घ कविता लिहू शकेन, असेही मत पुढे त्यांनी व्यक्त केले होते. तेव्हा लेखन वाचून चर्चा करणे, त्या लेखनात काही सुधारणा सुचविणे असे प्रकार माझ्या बाबतीत झाले नाहीत. खरे म्हणजे, मीही कोणाकडे जाणे, वाचून दाखविणे, मत घेणे, चर्चा करणे असल्या गोष्टी करीत नव्हतो. हे चूक का बरोबर हे मला सांगता यायचे नाही. परंतु आजही मी स्वतःच्या साहित्याबद्दल क्वचितच बोलतो. त्यामुळे 'आपुलाचि वाद आपुल्याशी' करीत मी पुढे जात राहिलो. पुस्तकप्रकाशनाबाबतीत मात्र टवकेटोणपे सोसत राहिलो. याचा परिणाम माझ्या कथेसंबंधी चर्चा न होण्यात झाला, असे वाटते. वस्तुत: १९७० ते ८० या काळात मी ज्या कथा लिहिल्या त्यांतील अनेक कथांमध्ये मी विविध प्रयोग केलेले होते. अनेक कथांमधून लोकसाहित्यातील बंध वापरले आहेत. निवेदनाच्या संदर्भात प्रयोग केलेले आहेत. विशेष म्हणजे माणसाच्या अंतरंगाचा सूक्ष्म शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे पुढे माझ्या साहित्यावर ज्यांनी पीएच. डी. चे प्रबंध लिहिले, त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केला आहे. परंतु प्रारंभी मात्र काही चर्चा झाली नाही, याची रुखरुख अजूनही लागलेलीच आहे १९८० नंतर मी अधिक जाणीवपूर्वक कथालेखन करू लागलो. विशेषत: बदललेले समाज-वास्तव आणि टिकून असलेल्या सरंजामी परंपरा यांच्या ताणातून संवेदनशील मनाची होणारी घुसमट मी अनेक कथांमधून व्यक्त केली आहे. धर्म आणि परंपरा व बदललेले राजकारण यांच्यातील ताण मुखर करण्याचाही मी प्रयत्न केला आहे. राजकारण आणि राजकारणातील स्वार्थ, साहित्यकारण यांसारख्या गोष्टीही मी माझ्या कथांमधून व्यक्त केल्या आहेत. मुख्यतः मूल्यविहीन जीवनातील विद्रूपता माझ्या पुढच्या कथांमधून व्यक्त होताना दिसते. माझी कथा दीर्घही होत गेली. मला वाटते, १९८५ नंतर मराठीत दीर्घकथा अधिक मोठ्या प्रमाणात लिहिली जाऊ लागली. जी. ए. कुलकर्णी हे तर होतेच, पण इतर अनेक लेखक दीर्घकथा लिहीत होते. आनंद विनायक जातेगावकर आणि भारत सासणे अशी दोन प्रातिनिधिक नावे सांगता येतील. 'राजधानी', 'कवीची गोष्ट', 'सावित्रीचा निर्णय' आणि 'रक्त आणि पाऊस' या संग्रहांमधून माझ्या दीर्घकथा आल्या आहेत. अनुभवाचा पट मोठा असेल, तर त्यातून दीर्घकथा जन्माला येणे स्वाभाविक आहे. छोट्या आकारात मोठ्या आशयाचा प्राण कासावीस होतो. म्हणून दीर्घकथा लिहिणे आवश्यक ठरते. माझे समीक्षालेखन अधिक गतीने चालू होते. विशेषतः ग्रामीण साहित्याची सैद्धांतिक मांडणी करणारा माझा ग्रंथ 'ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध' हा १९८५ला प्रकाशित झाला. त्याची चांगली चर्चा झाली. आज या ग्रंथाच्या पाच-सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. क्रमाने 'साहित्याचा अन्वयार्थ' (चार आवृत्त्या), 'साहित्याचा अवकाश' आणि 'मराठी कविता : एक दृष्टिक्षेप' (चार आवृत्त्या), 'नवकथाकार शंकर पाटील' ही समीक्षेची पुस्तके प्रकाशित झाली. १९८५ मध्ये मी तीन कादंबऱ्या लिहिल्या, त्यांतील एक म्हणजे 'मध्यरात्र' (या कादंबरीची पहिली आवृत्ती 'उलट चालिला प्रवाह्ये' या नावाने प्रकाशित झाली). ग्रामीण भागात दलितांवर कसा बहिष्कार टाकला जातो व हा बहिष्कारही राजकारण्यांसाठी राजकारणाचा विषय कसा ठरतो, याचे चित्रण त्यात आहे. या अनुभवावरची मराठीतील ही एकमेव कादंबरी आहे. म्हटली, तर तिला दलित कादंबरी म्हणता येईल म्हटली, तर ग्रामीण म्हणता येईल. राजकारण हा तर या कादंबरीचा प्राणच आहे. 'गांधारीचे डोळे' ही माझी दुसरी कादंबरी. हीसुद्धा मराठीतील वेगळी कादंबरी आहे. तृतीयपंथीय व्यक्ती निवडक अंतर्नाद २०५