पान:निवडक अंतर्नाद.pdf/२०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकाशाआडचा दिनकर कृ. ज. दिवेकर 'ग्रंथाली' या अभिनव वाचकचळवळीचे व 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या सामाजिक बांधिलकी जागवणाऱ्या उपक्रमाचे एक प्रवर्तक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक दिनकर गांगल यांनी अलीकडेच पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त ही एक स्मरणांजली. दिनकर गांगल अल्पकाळ एस. टी. त कामाला होते हे अनेकांना माहीत नाही. कारण तशी ती रेग्युलर नोकरी नव्हती. एस.टी. चे जे 'एस. टी. समाचार' नावाचे हाऊस मॅगेझिन होते त्याचा संपूर्ण कायापालट करून व आकर्षक स्वरूपात सादर करून अधिकारीवर्गात, कर्मचाऱ्यांमध्ये आणि एस. टी. प्रवाशांमध्ये ते लोकप्रिय करावे या हेतूने एस. टी. च्या संचालकांनी दिनकर गांगल यांना साकडे घातले. त्यांचा वृत्तपत्रांतील सखोल अनुभव व 'ग्रंथाली' या ध्येयवादी व नावीन्यपूर्ण प्रकाशनाचे एक संस्थापक, संचालक व संवर्धक या नात्याने त्यांनी केलेली भरीव कामगिरी सर्वश्रुत होती. त्यामुळे दिनकर गांगल यांनी 'एस. टी. समाचार' चे संपादक म्हणून काम पाहावे असा आग्रह धरण्यात आला. 'महाराष्ट्र टाइम्स' सोडल्यानंतर त्यावेळी गांगलांना खास अशी दुसरी असाइनमेंट नव्हती. चांगले मासिक मानधन, सुसज्ज केबिन व मुख्य म्हणजे या विषयातील सर्वाधिकारी अशी ऑफर असल्यामुळे गांगल 'समाचार' चे संपादक म्हणून एस.टी. त रुजू झाले. त्यांची व माझी आधीची ओळख होतीच. त्यांच्या कुर्ला स्टेशनजवळ असलेल्या नेहरूनगरमधील '३४/९०२' या घरी मी दोन-चारदा गेलो होतो, त्यांची मुलगी अपर्णा हिच्यासह ठाण्याला गांगलही आमच्या घरी येऊन गेले होते. ते 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये रविवार पुरवणीचे संपादक असताना मी त्यांच्यावर कथा व लेखांचा मारा केला होता (व त्यांनी शिताफीने त्याला अनेकदा यशस्वी बगल दिली होती!). पण ही ओळख घट्ट व नित्यनैमित्तिक नव्हती. ते एस. टी. त आल्यावर ती तशी झाली, कारण त्यावेळी मी एस. टी. महामंडळात केंद्र सरकारतर्फे निवासी लेखापरीक्षा अधिकारी (रेसिडेन्ट ऑडिट ऑफिसर) होतो. एस. टी. च्या मुखपत्राला सक्षम व वेगवान बनविण्यासाठी वेळेचे बंधन नसूनही गांगल दररोज नियमितपणे तेथे येऊ लागले. त्यामुळे कधी त्यांच्या तर कधी माझ्या केबिनमध्ये दुपारच्या लंचब्रेकच्या वेळी आमची बैठक जमायची. रेसिडेंट ऑडिट म्हणजे एस. टी. तल्या सगळ्या आतल्या गोष्टीची उकल करणारा विभाग, गांगल त्या गोष्टींत रस घेत, पण त्यांचा त्यांनी कधीही दुरुपयोग केला नाही, त्यांची कधी इतरत्र वाच्यताही केली नाही. त्यांनी 'एस. टी. समाचार' च्या संपादकपदाची ऑफर गरजेपोटी स्वीकारल्याचे ते सांगत. वृत्तपत्रे व प्रकाशनव्यवसाय यांतील कित्येक रंजक किस्से ते ऐकवीत. बरेचसे आतल्या गाठीचे व विजय तेंडुलकरांप्रमाणे स्वतः कमी बोलून दुसऱ्याला बोलते ठेवत आणि भेदक नजरेने समोरच्याचा अंतर्वेध घेण्याचा व त्याच्यातील अंतर्नाद ऐकण्याचा गांगलांचा जो स्वभाव, तो आमच्या या त्यावेळच्या दैनंदिन गप्पाटप्पांत खूपच सैल व मनमोकळा व्हायचा. नव्या स्वरूपातील 'एस. टी. समाचार' चा पहिला अंक खूप थाटामाटात व 'पथिक' या नवीन नामकरणाने प्रसिद्ध करण्यात आला. त्याला व त्यानंतरच्या काही अंकांना एस. टी. प्रवाशांसकट सर्वांचाच उत्तम प्रतिसाद मिळाला. 'किर्लोस्कर' मासिक हेही मूळात किर्लोस्कर कारखान्यांचे हाउस जर्नल, पण ज्या खुबीने त्याचा प्रसार सातत्याने वर्धिष्णू होत राहिला तसे 'पथिक' चे झाले नाही. गांगल आपली युक्ती, बुद्धी, शक्ती वापरून खूप परिश्रमपूर्वक अंक अधिकाधिक आकर्षकपणे सादर करत होते. त्यासाठी चित्रकार कमल शेडगे या 'अक्षर लेखकां' ची व अन्य कल्पक मित्रांची, त्यांना योग्य ते मानधन देऊन ते मदत घेत, त्यामुळे अर्थातच जास्त व्यय होणे अपरिहार्यच होते. सुरुवातीला अशा वाढीव खर्चाला मंजुरी सहजपणे मिळाली. पण पुढेपुढे हात आखडता घेतला जाऊ लागला. गांगलांना नवनव्या कल्पना प्रत्यक्षात आणणे जड जाऊ लागले. काही नव्याने पुश-अप करायचे तर थोडा काळ जावा लागतो, नफा-नुकसानीची गणिते बाजूला ठेवावी लागतात. पण झापडबंद सरकारी महामंडळांना तेवढा पोच नसतो व धीरही धरता येत नाही. त्यामुळे जेमतेम वर्षभर गांगल एस. टी. त राहिले व मग नाउमेद होऊन बाहेर पडले, एस. टी. तील सेवाकार्याला त्यांनी कायमचा ब्रेक लावला. एस. टी. समाचार' चे आधीचे संपादक व जनसंपर्क अधिकारी शशिकांत गुप्ते यांनी आखून दिलेल्या पठडीप्रमाणे व त्यांच्याच नेतृत्वाखाली नंतर 'पथिक' याच नावाने एस. टी. चे हाऊस मॅगेझिन पूर्ववत प्रसिद्ध होत राहिले. गांगल पुन्हा तिकडे फिरकले नाहीत, गांगलांच्या व माझ्या भेटीगाठी, ज्या 'पथिक' च्या निवडक अंतर्नाद २०७