पान:निवडक अंतर्नाद.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येतात. एका कवितेत ते म्हणतात - आकाशपण हटता हटत नाही मातीपण मिटता मिटत नाही आकाशमातीच्या या संघर्षात माझ्या जखमांचे देणे फिटता फिटत नाही! माणसाच्या जड देहाचे मातीशी म्हणजेच या भूमीवरच्या विविध व्यवहारांशी नाते जडलेले असते. पण तो पूर्णपणे या मातीचा कधी होऊ शकत नाही. इथल्या साया सुखोपभोगात वासनाविकारात, ऐहिक विलासात तो मग्न असतानाही अचानक एक उदासीनता त्याला जाणवू लागते. ती आकाशाची, अपार्थिवाची ओढ असते. या ओढीचे आणि तिच्यामुळे मनाला सतत जाणवणाऱ्या व्याकुळतेचे फार प्रत्ययकारी वर्णन देशपांडे यांनी या कवितेत केले आहे. कवितेचा प्रारंभ या दृष्टीने एका उत्कट उदासीचा छेदणारा आहे. कवी म्हणतो - अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी गेली न उदासी लागले न हाताला काही अविनाशी काही अविनाशी! मानवाने विशिष्ट अर्थाने आकाश जिंकले आहे. साऱ्या अंतरिक्षातून तो भ्रमण करून आला आहे. पण तरीही त्याच्या मनाची उदासीनता नाहीशी झालेली नाही. सारे विश्व फिरूनही हाताला अविनाशी, शाश्वत असे काही आले नाही. तो पृथ्वीचा आहे. तिथे तो वावरतो. सारे व्यवहार करतो. सारी सुखे मिळवतो. मोठमोठ्या महत्त्वाकांक्षा बाळगतो आणि एका अर्थाने तो अत्यंत यशस्वीही होतो. पण हे सारे अनुभवताना व्यर्थतेची एक जाणीव सतत त्याच्या मनात सलत असते. पार्थिवापलीकडचे अगम्य असे काही त्याला हवे असते. आणि ते तर त्याच्या आटोक्यात येत नाही, काय असते ते? कवी म्हणतो - क्षितिज तुझ्या चरणांचे दिसते रे दूर दिसते रे दूर! घेऊन मी चालू कसा भरलेला ऊर भरलेला ऊ! या मानवाला 'त्याच्या चरणांचे क्षितिज दूर दिसते आहे. ते त्याला खुणावते आहे. साद घालते आहे. पण पार्थिव वासनाविकारांनी, व्यवहाराच्या अनेकविध ताणांनी त्यांचे हृदय व्यथित झाले आहे. 'तो' दुरावला आहे त्याच्यापाशी जावे तर हा 'भरलेला ऊर' घेऊन तिथपर्यंत जाता येत नाही. म्हणून कवी परमेश्वराला म्हणतो, 'तुझ्या पावलांचे क्षितिज मला नेहेमी दिसते. पण हे भरलेले, जड झालेले हृदय घेऊन तिथपर्यंत मी २० • निवडक अंतर्नाद कसा येऊ ?' इथे 'तो' म्हणजे एक दुर्लभ चैतन्य, ते दिसते पण ह्यती येत नाही. ओढ लावते पण दूर दूर सरकत राहते. या दृष्टीने 'क्षितिज तुझ्या चरणांचे' ही प्रतिमा किती सुंदर, अर्थपूर्ण आहे, ते सहज ध्यानात येईल. साया सुखात, समाधानात ही अतृप्ती माणसाला का जाणवत असेल? अगदी साधुसंतांपासून तो कवी तत्त्ववेत्त्यांपर्यंत सर्वांना या अतृप्तीचे फणकारे सातत्याने सोसावे लागतात. माणूस जितका संवेदनशील तितकी ही अपार्थिवाची ओढ अधिक उत्कट असते. कवी म्हणतो जरि वाटे जड कळले तळ कळला नाही जड म्हणते 'माझा तू' क्षितिज म्हणे 'नाही!' इथे माणसाच्या या अतृप्तीची काही मीमांसा कवी करतो. साऱ्या भौतिक गोष्टी आपल्या आटोक्यात आल्यावर 'जड सृष्टीचे कोडे आपल्याला उलगडले, तिच्यावर आपण विजय मिळवला,' असे क्षणिक समाधान त्याला वाटतेही. पण त्याबरोबर आपल्या या विजयाला मर्यादा आहेत, हे त्याला उमगते. 'जडाचा उलगडा झाला पण त्याच्या तळाशी ● असलेल्या चैतन्याला आपण जिंकू शकलो नाही'; 'जरि वाटे जड कळले, तळ कळला नाही' ही हूरहूर त्याला जाणवत असते. कारण तो एका विचित्र द्वंद्दात सापडलेला आहे. ही जड सृष्टी त्याच्यावर सत्ता गाजवते. 'तू माझा आहेस' असे ती त्याला बजावून सांगते. परंतु त्याच वेळी क्षितिज त्याला म्हणते, 'नाही, तू केवळ या भूमीचा नाहीस. माझीही तुझ्यावर सत्ता आहे. मला तू संपूर्णपणे विसरू शकणार नाहीस.' 'देह मातीशी बांधलेला पण आत्मा मात्र सतत या आकाशस्थ चैतन्यतत्त्वाकडे ओढ घेत असलेला' अशी दारुण अवस्था माणसाच्या वाट्याला आलेली आहे ऐहिक आणि पारलौकिक, पार्थिव आणि अपार्थिव यांच्यातील हा संघर्ष सतत चालू आहे आणि मानवाचे हृदय हे त्या संघर्षाचे स्थान आहे. इंद्रियांचे चोचले कितीही पुरवले तरी अतींद्रियाचे गूढ आकर्षण माणसावर सतत सत्ता गाजवत असते. त्या आकर्षणातून त्याची सुटका नाही म्हणून देह भूमीला खिळावा आणि ओढ आकाशाची असावी, हे भागधेय माणसाच्या वाट्याला आलेले आहे 'जड म्हणते 'माझा तू', क्षितीज म्हणे 'नाही' हे खरे दुःख आहे. ते दुःख, ती उदासी म. म. देशपांडे यांनी या लहानशा कवितेत अतिशय उत्कटपणे व्यक्त केली आहे. म्हणूनच कविता वाचून प्रत्येक संवेदनशील रसिक मनातून अस्वस्थ होतो आणि 'अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी' ही ओळ एखाद्या गीताच्या करुण सुरासारखी त्याच्या हृदयात सतत गुंजत राहते. (मे १९९७)