पान:निवडक अंतर्नाद.pdf/२१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'माणूस'मागचा माणूस : श्री. ग. माजगावकर विनय हर्डीकर १९६१ ते १९८६ अशी साधारण पंचवीस वर्षे चोखंदळ मराठी वाचकांना 'माणूस' ने विपुल खाद्य पुरवले. टीव्ही आणि मोबाइलपूर्वीच्या त्या कालखंडात वाचकांची मोठी गरज उत्तम प्रकारे भागवली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या पाव शतकातील बहुतेक सर्वच महत्त्वाच्या राजकीय व सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब 'माणूस' मध्ये उमटत होते. 'माणूस' चे शिल्पकार श्री. ग. माजगावकर यांचा २० फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्यानिमित्त - प्रिय माजगावकर, कित्येक वर्षांत आपली भेट नाही, गप्पा नाहीत, वादविवाद नाहीत; एकमेकांना नव्या कल्पना ऐकवणं नाही, नवे उपक्रम हातात घेणं नाही; आसपासच्या राजकीय सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींवर ('मोडीं' च जास्त) चर्चा करणं नाही, संध्याकाळी ५ ॥ ते ७ या वेळात फिरायला जाणं नाही; तुमच्याबरोबर ( अर्धा ) साधा डोसा खाणं आणि (अर्धाच) चहा पिणं नाही, 'गड्या, तुला एक सांगतो' किंवा 'गड्या, तुझं एक बरं आहे हे शब्द कानावर पडून आनंद होणंही नाही. तशी तुमची-माझी शेवटची भेट काही फार उत्कट झाली नव्हती, राजेंद्रनगरमधल्या तुमच्या घरी आलो होतो कॉटवर पडून होता. आधी फोन करून आलो होतो तरी तुमचा काही गप्पा मारायचा – निदान ऐकायचा - मूड दिसेना; काही वेळानंतर तर तुम्ही स्पष्टच सांगितलंत, 'आता मला अस्वस्थ वाटायला लागलंय, त्रास होतोय; तू आता जा!' तोपर्यंत आपल्या मैत्रीला वीस वर्षे उलटून गेली होती. मात्र अर्ध्या भेटीतून तुम्ही मला कधीच असं काढून लावलं नव्हतं. कधी तुम्हांला दुसरीकडे जायचं असेल किंवा आधी ठरवून तुमच्याकडे कोणी येणार असेल तर गप्पा आवरत्या घ्याव्या लागल्या तरी 'आता इथे थांबू या, दोनचार दिवसांनी तू पुन्हा ये' अशी तहकुबी केली जायची; 'तू जा' हे शब्द मी पहिल्यांदाच ऐकत होतो. अंथरुणाला खिळलेल्या मित्रावर राग धरू नये हे सभ्य तत्त्वही मी विसरून गेलो इतका तो धक्का मोठा होता. वैतागून मी तुमच्या घरातून बाहेर पडलो ते पुन्हा न यायचं ठरवूनच! अर्थात ते काही जमणार नव्हतंच. ऑक्टोबर १९९६ मध्ये तुम्हांला नाशिकला वनशेतीविषयीचा सन्मान मिळाला तेव्हा पुण्याहून गेलेल्या १५-२० जणांत मी होतोच. तो सगळा दिवस आमच्या 'ग्रामायन' ग्रुपच्या गाडीमध्ये हास्यविनोदाची कारंजी उडत होती. तुम्ही त्या गाडीत नव्हता पण 'ग्रामायन' च्या गप्पांत तुम्ही नसणं अशक्यच होतं. त्या कार्यक्रमात तुम्हांला शेवटचं सार्वजनिक भूमिकेत पाहिलं - शरदराव पवारांनी तुमच्या आणीबाणीमधल्या निर्भयतेचा उल्लेख केलेला ऐकला - आणि खूप बरं वाटलं! जुना राग मावळला आणि पुन्हा तुम्हांला भेटायचं ठरवलं. काही दिवस 'आज जाऊ उद्या जाऊ' करण्यात जातातच! मात्र तुमच्या आजारपणाच्या शेवटच्या टप्प्यात माजगावकर / श्रीभाऊ स्वतः फार त्रास करून घेताहेत आणि त्याचा इतरांनाही फार त्रास होतो आहे' हे कानावर आलं होतं; म्हणूनही तुम्हांला भेटायचं, थोडी समजूत घालायची, थोडं मैत्रीच्या हक्काने रागवायचं, पार्किन्सनच्या पेशंटने स्वत:ला न्यूनगंड येऊ देऊ नये असा सल्ला द्यायचा असं ठरवत होतो. तुमचे माझे मित्र विद्याधर पुंडलिक यांनाही असा सल्ला दिला होता आणि तो वायाच गेला होता, तरीही! पण मला ती संधी तुम्ही दिलीच नाहीत, तुमची - माझी भेट २० फेब्रुवारी १९९७ ला वैकुंठ स्मशानभूमीतच झाली, तुम्ही त्या दिवशी 'तू जा' म्हटल्यानंतर तुमच्याशी नंतर कधी बोलता आलंच नाही! माजगावकर, तरीही तुम्ही माझ्या आयुष्यातून गेला नाहीतच, प्रत्यक्ष भेटी गेल्या १७ वर्षांत झाल्या नाहीत एवढंच माझ्या सामाजिक-राजकीय अनुभवांवर मी लिहितो-बोलतो तेव्हा तुमचं नाव पूर्वीच्या मिरज जंक्शनसारखं घ्यावंच लागतं, जिथे ब्रॉडगेज, मीटरगेज आणि नॅरोगेज असे तिन्ही रेल्वेमार्ग होते. पत्रकारिता, ग्रामविकसन आणि नवीन राष्ट्रवादाची मांडणी हीच आपली तीन गेजेस होती ना! मात्र वरचा क्रम उलटा करून आपण त्यावरून धावत होतो; आणि केवळ एवढंच नाही - 'कारुण्योपनिषद' हे माझं मर्ढेकरांच्या कवितेवरचं पुस्तक आलं तेव्हाही तुमचा उल्लेख अपरिहार्य होता; कारण ज्या 'मर्ढेकरांच्या शोधात' या लेखापासून ते पुस्तक सुरू झालं तो 'माणूस'च्या १९७८ च्या दिवाळी अंकात आला होता. एवढंच नव्हे, सतीश (कामत) बरोबर तुम्ही स्वतः अंक आणि १०० रु. ( अबब!) मानधनाचं पाकीट घेऊन माझ्याकडे आला होता. 'गड्या, हा लेख जमला आहे!' - हे तर तुम्ही छापायच्या आधीच सांगितलं होतं, 'सुमारांची सद्दी' नावाचा माझा लेख २००३ मध्ये 'कालनिर्णय' दिवाळी अंकात आला तो केवळ 'माणूस' आणि तुम्ही दोघेही नव्हता म्हणूनच, माजगावकर, १२ वर्षे झाली तरी त्या लेखाची मिरास आणि मिजास कायम निवडक अंतर्नाद २०९