पान:निवडक अंतर्नाद.pdf/२११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. अजूनही कोणीतरी कळवतं, 'त्या लेखाच्या प्रती काढून आम्ही पाचपन्नास जणांना वाटल्या!' पण त्याचं खरं कौतुक तुम्हीच केलं असतं - मूल्यमापनही! 'जनांचा प्रवाहो नंतर माझी तीन पुस्तकं आली, त्यांचंही तसंच स्वागत झालं, पण तुम्ही नव्हता ही रुखरुख असतेच. 'निवडक श्री. म. माटे' या माझ्या संपादनाचं मोलही तुम्हीच जाणलं असतं - माझी प्रस्तावना वाचून दाद दिली असती आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा तर आपण ( तुमच्या माफक पद्धतीने ) सेलिब्रेट नक्की केलं असतं. आणि एवढंच नाही - अण्णा हजारे फेनॉमेननचा तुम्ही इतरांच्यापेक्षा वेगळा परामर्श घेतला असता तुम्ही त्यांना संतपदावर विराजमान केलं नसतं! सध्याच्या उन्मादी भाजपला तुम्ही काँग्रेसविरोध आणि काँग्रेसद्वेष यांतली फारकत- रेषा दाखवली असती; कारण १९७७ मध्ये जनता पक्षाचा असाच उन्मादी मूड असताना 'इंदिरा गांधींचं witch-hunting करू नका', असं तुम्ही मांडत होता, आम्हा सगळ्यांची नाराजी पत्करून! आम आदमी पार्टीची 'सॉलोमन ग्रंडी'च्या बालगीतासारखी अचानक सुरू झालेली आणि 'अतिघाई संकटात जाईं या (ट्रकवाल्यांच्या) सुभाषिताप्रमाणे सुरुवातीतच संपलेली घिसाडघाई नीट समजून सांगण्याचं कामही तुम्हाला जमलं असतं, गेल्या वीस वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं लाजिरवाणं दुष्टचक्र थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत आणि एखादा पी. साइनाथसारखा अपवाद वगळता पत्रकार बुद्धिजीवी वर्गाला त्याची काही खंत / खेद वाटत नाही. तुम्ही काही वेगळं भाष्य केलं असतं, कारण भूदान चळवळीपासून ते आमच्या शेतकरी संघटनेपर्यंतच्या सर्व घडामोडी तुम्ही स्वतःचं आद्य कर्तव्य असल्यासारख्या स्वत: प्रवास - अभ्यास करून समजून घेतल्या होत्या आणि शेतीमधल्या आधुनिक प्रयोगांचं पाणीपंचायत, म्हैसाळची दलित सहकारी शेती, निफाडची वनशेती - स्वागतही केलं होतं. ही यादी वाढवत नाही कारण स्वतःचं कौतुक ऐकून घेण्याचा 'सुसंस्कृतपणा' तुमच्यामध्ये कधीच नव्हता! तुम्ही गेल्यानंतर पहिल्या स्मृतिदिनी 'निवडक माणूस चं प्रकाशन करण्याचं ठरलं; त्या संपादक मंडळात पहिलं नाव माझं असणं क्रमप्राप्तच होतं. त्या 'सांस्कृतिक दस्तावेजा' मध्ये तुमच्या काही संपादकीय लेखांची निवड मी केली आणि त्याला छोटी टिपणवजा प्रस्तावना लिहिली तीही आपली एक भेट म्हणता येईल. नॅरो, मीटर आणि ब्रॉड या तिन्ही गेजीसवरच्या तुमच्या वाटचालीची अगदी त्रोटक नोंद त्या टिपणात करताना मी तुमच्या प्रवासाचा शेवट संघपरिवार या स्वगृहाकडे परतण्यात झाला व ते अपरिहार्यच होतं अशी उदास टिपणीही केली होती. त्या मांडणीला कोणी फारशी हरकत घेतली नाही. कदाचित ते टिपण फारसं वाचलं गेलंच नसावं; कारण तुमचं बहुआयामी व्यक्तित्व आणि आयुष्य संपादक म्हणून केलेली कामगिरी, 'माणूस' नावाची सांस्कृतिक श्रीमंती, नवीन विषय आणि तो पेलू शकणारा लेखक शोधण्यातला तुमचा निष्णातपणा यांच्या नोंदींनी ते पुस्तक खचाखच भरलं आहे; ते अपेक्षितच होतं. मात्र कुमार केतकर ची प्रस्तावना, स.हं. नी घेतलेली तुमच्या वैचारिक परिभ्रमणाची दखल, २१० निवडक अंतर्नाद यशवंत सुमंतने तुमच्या राजकीय विचारधारेला दिलेलं 'व्यावहारिक हिंदुत्ववाद' हे नाव इकडे फार लक्ष गेलेलं नाही. तुम्ही तसं केलं नसतं - आमच्या प्रत्येकाच्या अभिप्रायावर तुम्ही चर्चा केली असती. कदाचित स.ह. आणि तुम्ही या क्षणी तेच करत असाल, कारण स. हं. नी तो ग्रंथ वाचला होता! गेल्या मे महिन्यातली घटना आहे. मुंबईला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये वैचारिक नियतकालिकांवर एक चर्चासत्र झालं; त्यात 'माणूस साप्ताहिकाचे दिवस असा एक विषय दिला होता. अरुण साधू, वीणा गवाणकर, मी अशांनी बोलायचं होतं. सतीश कामत सूत्रसंचालन करणार होता. काही कारणानं सतीश येऊ शकला नाही. साधू आणि गवाणकर दोघेही लेखणीचे जबरे पण भाषणात मितभाषी, मला बऱ्यापैकी वेळ मिळाला. एरवी 'नोस्टॅल्जिया'ला व्याधी विकृती समजणारा मी 'माणूस च्या दिवसांबद्दल बोलता बोलता त्या सत्तरच्या दशकात जाऊन पोचलो. सगळ्या आठवणी केवळ जाग्या झाल्या नाहीत, ती चित्रं दिसायला लागली. तुमचं ऑफिस, तिथला ओकाबोका वाटणारा साधेपणा, ते दोन हतोत्साह वाटायला लावणारे कारकून, मोजकी कपाटं, टेबलं खुर्च्या, मजकूर वाचताना बदलत जाणारा तुमचा चेहरा, मधेच फोन आला तर कमीत कमी शब्दांत कॉल संपवण्याची शिस्त, कलती मान करून समोरच्याकडे पाहण्याची स्टाइल, चष्मा काढल्यावर दुप्पट मोठे दिसणारे डोळे, पँट- हाफ मॅनिला, थंडी असल्यास हाफ जॅकेट असा नीटनेटका पेहराव आणि काही वेगळं चमकदार ऐकल्या/वाचल्यावर खुलणारी कली! मी बोलत गेलो. ऐकणारे माझ्याबरोबर त्या काळात पोचले होते हे जाणवत होतं. खरं म्हणजे मी कठोर/परखड बोलायचं, तुमच्या मर्यादा स्पष्टपणे मांडायच्या असं ठरवून गेलो होतो. ते सगळं मी बोललोही पण शब्द कठोर नव्हते, तुमच्या मर्यादा माझ्याही आहेत अशी भावनाही डोकावत होती. शेवटी मी म्हणालो, 'पुन्हा 'माणूस' सुरू झालं आणि 'माणूस प्रतिनिधी' ठिकठिकाणी जायला लागले तर त्यात मी नक्की असेन.' असं बोललो आणि मलाच फार बरं वाटलं, कदाचित मी आता अस्तित्वात नसलेल्या 'स्वगृही' पोचलो होतो का? पुण्याला परत आल्यावर मी सरळ दिलीपरावांना 'राजहंस प्रकाशन' च्या ऑफिसात भेटलो आणि माझ्या तीन संकल्पित पुस्तकांची माहिती त्यांना दिली; त्यातलं एक त्यांनी स्वीकारावं असा प्रस्तावही मांडला. तो त्यांनी स्वीकारल्यावर पुन्हा एकदा खूप बरं आणि मोकळं वाटलं! डिसेंबर २०१४मध्ये वंदना आणि सतीश ( जकातदार ) भेटायला आले; 'श्रीगमा आणि त्यांचा काळ' या विषयावर पुस्तक तयार करण्याची कल्पना घेऊन या पुस्तकामध्ये तुमच्या काही समकालीन संपादकांच्या कामगिरी (?) चा वेध घेऊन तुमचं वेगळेपण मांडावं अशी त्यांची योजना दिसली. मी एवढंच म्हणालो, 'इतरांना मोठं ठरवण्यासाठी माजगावकरांना खर्ची घालू नका, मात्र श्रीगमांवरती स्वतंत्र पुस्तक कदाचित त्यांचं चरित्र करता येईल; नव्हे करावंच!' हे पुस्तक तयार करताना पुन्हा आपण वारंवार भेटणारच आहोत. त्यासाठीच मी त्यात असणार आहे