पान:निवडक अंतर्नाद.pdf/२१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'या विषयावरची चर्चा 'माणूस' मधून थांबवत आहोत. वाचकांनी कॉ. पाटील यांच्याशी थेट पत्रव्यवहार करावा असं संपादकीय निवेदनही छापू.' तुम्हांला माझा सल्ला पटला लेखमाला येत राहिली. पुढच्या 'खऱ्या गहन चर्चेमुळे कोण वाचक किती दमले या भानगडीत आपण पडलो नव्हतोच पण कॉ. पाटलांना तुम्ही कोणताही सल्ला दिला नव्हता. रिस्क घ्यायला तुम्ही तयार होता कारण लेखक विषय दोन्ही महत्त्वाचे होते. मात्र असे प्रसंग अपवादात्मक असत! तुमच्या सूचना मोजक्या शब्दांत असत. काही वेळा एका विचारसरणीचा लेखक (स्वत:च्या व्यक्तित्वाला पैलू पाडण्यासाठी) दुसऱ्या विचारसरणीत घुसायला बघत असे; तुम्ही अशा एक-दोन सीनियर लेखकांना 'तो तुमचा विषय नाही' असं स्पष्ट सुनवायला कमी केलं नव्हतं. आणि काही वेळा अचानक एखादी कल्पना सुचली, की तुम्ही ताबडतोब ती कागदावर उतरवायच्या खटपटीला लागायचा. जोशी- अभ्यंकर खून खटला ही पुण्यातली थरारक घटना होती, वरुण भिडे दैनिक सकाळसाठी रोज कोर्टात जात होता. त्या तरुण मुलांना फाशी झाली तेव्हा हिस्टेरिकल पुणेकरांनी पेढे वाटायचे तेवढे शिल्लक ठेवले होते; वरुण मात्र प्रचंड उदास होता. तुमच्याकडे येऊन त्याने आपलं मन मोकळं केलं आणि चार दीर्घ लेख 'माणूस साठी लिहिले - त्या घटनेचे सांस्कृतिक, सामाजिक आयाम आपोआपच अधोरेखित झाले. आपले दोघांचेही जिवलग विद्याधर पुंडलिक यांची शोकांतिका सगळ्यांनाच हलवून टाकणारी होती. एक दिवस तुम्ही सकाळी 'माणूस' मधली कामं उरकून सरळ पुंडलिकांचं घर गाठलंत आणि रागिणी वहिनींना त्या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी लिहायला सांगितलंत; वहिनी चाटच पडल्या होत्या. त्यातच तुम्ही पुंडलिकमधला लेखक पकडा' असं नेमकं बोलून तुम्ही उठून गेलात, वहिनी दिवसभर विचार करत बसल्या संध्याकाळी माझ्याकडे आल्या; आमचं बोलणं झालं; 'पुंडलिकाचे भेटी' हे नाव मी ठरवलं; एक वाचनीय दीर्घ लेख प्रथम तयार झाला. त्याचं स्वागत झालं म्हणून मग त्याचा विस्तार करून 'साथसंगत' हे वहिनींचं पुस्तक 'मौज'ने प्रकाशित केलं. इतक्या कमी वेळात मौजनं फार थोडी पुस्तकं काढली असतील. ह्यतभार अनेकांचा लागला, पण मूळ कल्पना तुमची होती. गहन गंभीर विषयांसाठी तुम्ही वेगळे लेखक हेरले होते. वार्तापत्रांसाठी अनिल बर्वे, निळू दामले, विजय परुळकर, स्वतःच्या अनुभवांचा अर्थ लावू शकणाऱ्यांमध्ये अनिल अवचट (पूर्णिया), मी, नंतर अविनाश, दत्तप्रसाद दाभोळकर वगैरे, ग्रंथ, नाट्य, सिनेमावर लिहिणारी वेगळी मंडळी, इंग्रजी वाचन करून विषय सुचवणारे समवयस्क मित्र तुम्ही स्वतः फिनिक्स लायब्ररीच्या पोंडांना 'माणूस' मध्ये इंग्रजी पुस्तक परिचयासाठी जागा करून दिली होती. गावोगावचे लहानमोठ्या घटनांची नोंद घेऊन बऱ्यापैकी लिहू शकणारे वाचक कार्यकर्ते असं तुमचं नेटवर्क होतं. शिवाय श्री. ज. जोशी येऊन गेले, की एकूण मराठी साहित्यात काय चाललं आहे त्याची बित्तंबातमी कळत असे. विनायकराव पाटील भेटून गेले, की काँग्रेस आणि शरद पवार, डॉ. लेले भेटले की जनसंघ-भाजप, अशोक मनोहर येऊन गेला की कम्युनिस्ट आदिवासी – या आघाड्यांवर काय चालू आहे, त्याचा अंदाज येई! बसल्या जागी महाराष्ट्रभरची माहिती आणि कळीच्या प्रश्नांची जाणीव होत असे. त्यातच 'ग्रामायन' चं नेटवर्क मिळाल्यानंतर शेतीविषयक विषयांची भर पडली. लिहितो म्हणून एखाद्या लेखकानं आयत्या वेळी दगा दिला की तुमची फार चिडचिड व्हायची, मी तसा अनुभव दोनदा दिला होता. १९७८ मध्ये इंदिरा गांधींनी चिकमगळूर या कर्नाटकमधल्या लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली व त्या पुन्हा संसदेत आल्या, तेव्हा मी पंधरा दिवस 'माणूस' प्रतिनिधी म्हणून गेलो होतो. मात्र जनता पक्षाचा पराभव झाला आणि माझा मूड गेला. मी काहीतरी खुसपट काढून लेखमाला लिहिलीच नव्हती. तुम्ही भयंकर वैतागलात, आदळआपट केलीत पण मी दाद दिली नाही. पुढे १९७९च्या दिवाळी अंकासाठी मी तो विषय आणि एकूण जनता पक्षाच्या अडीच वर्षांवर मोठा लेख लिहिला तेव्हाही तुम्ही तोंड वाकडं करूनच तो छापलात एकही कौतुकाचा शब्द माझ्या वाट्याला आला नाही. मात्र माजगावकर, तेव्हा झालेल्या त्या लेखाचं आता बऱ्यापैकी कौतुक होत आहे; कारण जनता पक्षाचा असा सविस्तर परामर्श फारसा कुणी घेतलेला नाही. दुसरा प्रसंग १९८०च्या दिवाळी अंकाच्या वेळचा. त्यावेळेपर्यंत मी शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात करून १५ वर्षं झाली होती. सवाई गंधर्व पुण्यतिथीसारख्या लोकप्रिय महोत्सवी संगीतापासून सुरुवात करून मी कुमार गंधर्व-मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या विचक्षण आणि विलक्षण गायकीपर्यंतचा प्रवास कसा केला, यावर 'सवाई गंधर्व ते कुमार गंधर्व असा विषय मी सुचवला आणि तुम्ही खूष झालात. मी अभ्यासाला लागलो आणि गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, कृ. द. दीक्षित या पूर्वसुरींच्या पुढे एक पाऊलही मला टाकता येणार नाही हे लक्षात आलं. मी लेख रद्द केला. 'तू माझ्या दिवाळी अंकाचा सगळा समतोल बिघडवून टाकलास!' हे तुम्ही मला महिनाभर तरी ऐकवत होता. कारण दिवाळी अंकामध्ये सामाजिक-राजकीय गंभीर चर्चेपेक्षा साहित्य- संगीत कला या क्षेत्रातल्या दर्जेदार मजकुरावर तुमचा भर असायचा. शिवाय शास्त्रीय संगीत हा तुमच्या जिव्हाळ्याचा छंद, 'मी संपादक झालो नसतो तर बुवा (गाणारा) झालो असतो,' असं तुमचं म्हणणं असायचं. मास्टर कृष्णरावांच्या मागे तंबोऱ्यावर बसल्याची आठवणही तुम्ही मला सांगितली होती. 'माणूस' चे सगळे दिवाळी अंक ओळीने पाहिले तर भारदस्तपणाचं भान ठेवून सांस्कृतिक विषयांवर जाणीवपूर्वक भर जाणवतोच! एक गमतीचा विरोधही माझ्या लक्षात आला होता. 'माणूस' चे संपादक माजगावकर कायम उत्साहात असत; मात्र 'माणूस'चे आणि राजहंस प्रकाशनाचे व्यवस्थापक माजगावकर कायम चिंताक्रांत कधीकधी वैतागलेलेसुद्धा दिसायचे! कारण स्पष्ट होतं संपादन हा तुमचा स्वभाव होता. साप्ताहिकाचं मार्केटिंग आणि प्रकाशनाची विक्री हा मात्र व्यवसाय असणार होता आणि १०० टक्के व्यावहारिक भूमिका घेणं तुमच्या स्वभावात बसतच नव्हतं! निवडक अंतर्नाद २१५