पान:निवडक अंतर्नाद.pdf/२२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पक्षांतले राजकीय कार्यकर्ते व सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने हजर होते. वराचे घर म्हणजे एक खोली व त्यात लग्नाला आलेल्या नातेवाईक मंडळींनी दाटीवाटी केलेली शेवटी एका मित्राने त्यांना आपल्या घरी नेले. पुढे त्यांचा कष्टाचा पण आनंदाचा, एकमेकांना समजून घेण्याचा संसार सुरू झाला. ताराबाईंचा पगार हेच उत्पन्नाचे कलम, त्यात काटकसरीने संसार करीत एस. एम. नी देशाच्या संसाराकडे लक्ष दिले. 'चले जाव' ची घोषणा गांधीजींनी गोवालिया टँक मैदानावरच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात बेचाळीस साली केली आणि आपण लगेच अटक करून घेण्याऐवजी भूमिगत होऊन मनुष्यहानी न करता राज्ययंत्रणा खिळखिळी करणाऱ्या चळवळीचे मार्गदर्शन करण्याची योजना समाजवाद्यांनी आखली. जयप्रकाश, नानासाहेब गोरे, एस. एम. साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन अशी सगळीच मंडळी भूमिगत झाली आणि चळचळीला काही दिवस जोम आला. या काळात पोलिसांनी आपल्याला ओळखू नये म्हणून एस. एम. नी दादी डवून मुस्लिम परिवेश आणि इमामसाहेब हे नाव धारण केले. एस. एम. च्या निर्भय आणि त्यागमय जीवनाला इमाम साहेबांनी एक रोमँटिक अध्याय जोडला. स्वातंत्र्य जवळ आले तेव्हा पुढच्या काळात समाजवादी मंडळी आणि काँग्रेस पक्ष यांचा परस्परसंबंध कसा असावा, याबद्दल चर्चा सुरू झाली. आतापर्यंत काँग्रेसअंतर्गत एक उपपक्ष म्हणून समाजवादी काम करत होते. आता काँग्रेसमध्येच राहून असे काम करता येणार नाही, असे दिसू लागले. समाजवादी आणि काँग्रेस यांनी आपसातील वाद वाढवून कम्युनिस्टांचे फावू देऊ नये, असा अनेकांनी विचार केला. त्या दोघांत काहीतरी सामंजस्य शिल्लक राहावे, अशा सूचनाही करण्यात आल्या. दोन्ही पक्षांतील काही नेत्यांच्या एकत्र बैठकाही झाल्या. स्वत: गांधीजींनी ही मध्यस्थी केली; पण त्याचा उपयोग झाला नाही. अठ्ठेचाळीस साली स्वातंत्र्यानंतर अवघ्या एक वर्षांने समाजवादी काँग्रेसमधून बाहेर पडले. समाजवादी नेत्यांबद्दल लोकांत प्रचंड आदर होता; पण त्यांना कारभार करण्यासाठी निवडून द्यावे, असे मात्र लोकांना वाटत नव्हते. बावन्नच्या निवडणुकीत मोठाच अपेक्षाभंग झाला आणि लोकचळवळ हाच आपल्यासाठी लोकसेवेचा मार्ग आहे, हे त्यांच्या ध्यानात आले. एस. एम. ना तर सत्तेची अभिलाषाच नव्हती. त्यांनी बावन्न सालची निवडणूक लढवलीच नव्हती. चळवळ हेच त्यांच्या मनोभूमिकेला साजेसे काम होते आणि त्यांनी ते मात्र आयुष्यभर केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एस. एम. च्या व्यक्तित्वाचे तेज आणखी उजळून निघाले. पक्षातील अनेकांचा विरोध पत्करून ते संयुक्त महाराष्ट्र समितीत सामील झाले. सर्व कठीण प्रसंगांना तोंड देऊन चळवळ चालवली आणि कम्युनिस्टांनी समितीचा राजकीय पक्ष करण्याची सूचना केल्यानंतर एस. एम. समितीतून बाहेरही पडले कम्युनिस्टांच्या भूमिकेला त्या काळात पाठिंबा देणाऱ्या आचार्य अत्र्यांच्या शाब्दिक शेणमाराला त्यांनी तोंडही दिले. संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा मंगल कलशाच्या श्रेयाच्या भांडणात ते गेलेच नाहीत. तरी 'एस. एम. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र' हे समीकरण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायमचे बसले आहे निवडणुकीच्या काळात समाजाच्या मनात खोल असलेले जातवास्तव वर येते आणि त्याचे चटकेही बसतात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ भरात असताना विधानसभेची निवडणूक झाली. त्यात 'समिती निवडून आली तर एस. एम. मुख्यमंत्री होतील' असे सूचक जातीय अर्थाचे विधान प्रचारात करण्याचा मार्ग भल्याभल्या काँग्रेस नेत्यांनी वापरला. पण समितीला बहुमत मिळाले नाही आणि मिळाले असते तरी एस. एम. मुख्यमंत्री झाले नसते, जेव्हा एस. एम. ज्या राजकीय पक्षात होते तो राजकीय पक्ष पुढे सत्तेत भागीदार झाला तेव्हाही एस. एम. नी कोणतेही सत्तापद स्वीकारले नाही. दंगल जातीय असो अगर इतर कारणाने पेटलेली, त्यात आत घुसून दंगलखोरांना आवरणारी माणसे आता उरली नाहीत. क्रुद्ध झालेल्या आणि सुडाने पेटलेल्या माणसांच्या डोळ्यांनाही ज्याचे व्यक्तित्व थांबवू शकते, अशी काही माणसे त्या काळी होती. दिल्लीतल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत जवाहरलाल नेहरू एकदोन वेळा घुसले व त्यांनी दंगल थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पुण्यामध्ये १९६५ साली हिंदू-मुस्लिम दंगल झाली. या दंगलीच्या वेळी मुस्लिम वस्ती असलेल्या इस्लामपुरा नावाच्या भागात जाळपोळ चालू आहे, हे कळताच एस. एम. तिकडे धावले व त्यांनी दंगलखोरांना आवरून तो भाग वाचवला. १९७३ सालीसुद्धा नानापेठेत एस. एम. दंगलखोरांना सामोरे गेले आणि त्यांनी शांतता प्रस्थापित केली. दंगल थांबवणे हे जिवावर उदार होऊ शकणाऱ्या माणसाचेच काम असते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत २८ जानेवारी १९५६ रोजी घडलेला प्रसंग आहे दादर भागातल्या फुलबाजारात जाळपोळ थांबवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाच जमावाने घेरले. आडवाणी नावाचे इन्स्पेक्टर पोलिसांचे नेतृत्व करत होते. त्यांना मारण्यासाठी जमाव पुढे सरकू लागला तेव्हा एस. एम. पुढे झाले आणि आपले दोन्ही हात बाजूला पसरवून त्यांनी आडवाणींना पाठीशी घातले. एस. एम. नी सांगितले 'मला ठार केल्यानंतरच तुम्ही यांच्या अंगाला हात लावू शकाल.' बोलत बोलत एस. एम. नी पाठीमागे रेटत रेत लॉरीपर्यंत आडवणींना पोहोचवले आणि त्यांना वाचवले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गुजरात्यांवर अत्याचार होत आहे, अशी खोटीच आवई विरोधकांनी उठवली. त्यावेळी एस. एम. आणि भाऊसाहेब रानडे काही दिवस गुजरात्यांच्या चाळीमध्ये त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी रात्री झोपायला जात. एस. एम. बद्दल जी जवळीक जयप्रकाशांसारख्या ज्येष्ठ नेत्यापासून अगदी तळाच्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत वाटे तिचे कारण एस. एम. चे निःस्वार्थ व कोणत्याही त्यागाला तयार असलेले व्यक्तिमत्त्व हेच होते. ही पारदर्शकता आणि नितळपणा केवळ व्यक्ती म्हणूनच नव्हे तर एक राजकारणी म्हणूनसुद्धा एस. एम. जवळ होता. एखाद्या प्रश्नासंबंधी त्यांच्या होणाऱ्या प्रतिक्रिया अतिशय स्वाभाविक असत आणि त्याला ते अगदी उघड वाट करून देत. राजकारणाच्या सोयीसाठी हा माणूस एखादी भूमिका मुद्दाम घेतो आहे असे कधीही वाटत नसे. कारण तसे ते होतच नव्हते, अन्यायाविषयी आणि अत्याचाराविषयी चीड हा निवडक अंतर्नाद २२५