पान:निवडक अंतर्नाद.pdf/२३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संध्याकाळी चार वाजता लेखन सुरू, लिहून झालं की पत्रोत्तरं लिहायचे. आलेल्या प्रत्येक पत्राला व्यवस्थित उत्तर जायचं. नामवंत व्यक्तींइतकंच ते आवर्जून सर्वसामान्य वाचकांच्या पत्रांना उत्तर द्यायचे. नवीन काही वाचलं आणि आवडलं तर त्या लेखकाला पत्र लिहून कळवायचे, प्रत्येक पत्राखाली स्नेहांकित ना. सी. फडके अशी डौलदार सही करायचे. आमच्या घरात आम्हां मुलांवर फारसे निर्बंध असल्याचं मला आठवत नाही. मुलग-मुलगी असे भेदभाव कधीच केले गेले नाहीत. दोघांचाही आम्हां मुलांवर पूर्ण विश्वास होता. माझ्या नाटकाच्या तालमी रात्री असत, 'सातच्या आत घरात चा तो जमाना होता, पण आमच्या सुरक्षिततेची काळजी घेताना आमच्यावर नको ती बंधनं कधीच घातली गेली नाहीत. रोहिणी आणि विजय स्वभावाने शांत होते. मी मात्र फारच बडबडी होते. माझा प्रचंड मित्रपरिवार होता. शाळा कॉलेजातल्या मैत्रिणी, नाटकातले सहकारी, शेजारीपाजारी सगळेच मला जवळचे, ताईला न विचारता मित्रमैत्रिणींना घरी जेवायला बोलावून मी तिची अनेकदा पंचाईत केली आहे. मैत्रिणीपेक्षा माझे मित्रच जास्त होते आणि त्यातल्या कुणाला मी लग्नमंडपात उभं करणार आहे अशा धास्तीतच आप्पा-ताई असावेत ! मी अकरावीत असताना अगदी धपकन पहिल्या प्रेमात पडले. पपी लव्ह म्हणतात तसा तो प्रकार होता, जितक्या त्वरेनं प्रेमात पडले, तितक्याच लवकर प्रेमाबाहेरही पडले. पण आप्पांनी कधीही माझ्या त्या अबोध, अपरिपक्व प्रेमाचा अनादर केला नाही. 'थोडी वाट बघ आणि ठरवं' असा सुज्ञ सल्ला त्यांनी मला दिला. एक गोष्ट मात्र मला समजली. मी माझ्या आईवडलांना काहीही सांगू शकते. तेवढा मोकळेपणा आमच्या नात्यात होता. त्यानंतर मी अविनाशच्या प्रेमात पडले. तेव्हाही मी १९ वर्षांचीच होते. पण ह्यावेळी मामला सिरियस होता. आमच्यात खूप फरक होते. अविनाश भारतीय वायुसेनेत फायटर पायलट होता. त्याला मराठीचा गंधही नव्हता, संगीत, नाटक, साहित्य, ह्यांपासून दूर असलेला हा माझा मित्र पण आमची एकमेकांबद्दलची प्रेमभावना खरी आहे असं कळल्यावर आप्पा-ताईंनी थाटामाटानं आमचं लग्न लावून दिलं. रोहिणीचे पती चंदू खरेदेखील सैन्यातच होते. आप्पा विनोदानं म्हणत, 'माझ्या दोन्ही मुली लष्करच्या भाकऱ्या भाजतात !' लग्नानंतर मी पंजाबला गेले. खरं तर प्रत्येक आई - बाप आपल्या अपत्याच्या भविष्याची स्वप्नं बघतात, मी नाट्यक्षेत्रात कर्तृत्व दाखवावं, खूप लिहावं अशी त्यांची इच्छा होती, ती सगळी स्वप्नं मी मोडली होती. त्याचं वैषम्य त्यांना वाटलंच असणार. पण त्यांनी आमच्यावर आपल्या इच्छा- आकांक्षा कधीच लादल्या नाहीत. हा त्यांचा केवा मोठेपणा होता! मी घरापासून दूर होते. त्यामुळे मला मराठी वाचायला मिळत नाही ह्याचं त्यांना वाईट वाटत असे. पुण्या-मुंबईच्या सांस्कृतिक बातम्या मला कळाव्यात अशी त्यांची धडपड असे. त्यासाठी आप्पा मला सकाळ, केसरी, महाराष्ट्र यइम्सच्या रविवार पुरवण्या पोस्टानं पाठवीत असत. त्यासाठी घरातल्या लोकांना वर्तमानपत्र फाडू नका, वेडीवाकडी दुमडू नका अशी ताकीद ते देत. वर्तमानपत्राच्या घडीत कधी परसातल्या आंब्याचा पहिला मोहर तर २३६ • निवडक अंतर्नाद कधी गुलमोहराचं लालचुटुक फूल ठेवत. मी निदान चांगली इंग्रजी पुस्तकं तरी वाचावीत म्हणून लेखकांची, पुस्तकांची नावं मला कळवत. लग्नानंतर मी फारच कमी लिहिलं. पण जेव्हा केव्हा लिहिलं, तेव्हा मी त्यांना ते पाठवून देत असे. त्याचा त्यांना फार आनंद होत असे. मी शाळेत नोकरी धरली तेव्हा माझ्या धाकट्या मुलीकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना अशी हलकेच चौकशी करणारं पत्र त्यांनी १९ ऑक्टोबर १९७८ला लिहिलं, ते मला मिळालं तेव्हा २२ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला होता. माझं लग्न झालं आणि नवराबायकोमधलं नातं वास्तवात किती नाजूक आणि कमकुवत असतं हे मला समजलं, एखाद्या नाजूक रोपट्यासारखी ह्या नात्याची जपणूक करायला लागते. आणि दोघांनी एकमेकांना वाढायला 'अवसर' किंवा स्पेस देणं किती गरजेचं आहे हेही मला समजलं. हे नातं कसं संपुष्टात येऊ शकतं, ह्याची अनेक उदाहरणं मी आमच्या मित्रपरिवारात पाहिली, तोपर्यंत माझ्या वैवाहिक जीवनाच्या कल्पना अतिशय 'फिल्मी' होत्या. वास्तव नजरेसमोर आलं आणि माझ्या माझ्याही नकळत तुंबून राहिलेला एक प्रवाह खळखळून मोकळा झाला. माझ्या आईवडिलांच्या विशेषत: वडिलांच्या - आयुष्यातल्या एका पर्वाबद्दल माझ्या मनात समज-गैरसमजांचा जो गुंता होता, तो आपोआपच सुटत गेला. कारण नवराबायकोच्या नात्याला समर्थ किंवा दुबळं करणं त्या दोघांवरच अवलंबून असतं हे माझ्या लक्षात आलं. हे सगळं लगेच घडलं नाही आणि ते घडेपर्यंत माझ्या मनात आप्पांविषयी काही प्रश्न घोंगावतच राहिले. प्रत्येक मुलीला आपले आईवडील अगदी परफेक्ट वाटतात तसेच मलाही वाटायचे. पण मी मोठी होऊ लागले आणि कदाचित तसं नाहीय हे लक्षात यायला लागलं. मला नवल वाटतं ते हे, की एरवी आमच्याशी इतक्या मोकळेपणानं, अगदी मैत्रीच्या नात्यानं वागणाऱ्या आप्पांनीही त्यांचा पहिला विवाह, त्यांचा पहिला संसार, त्यांची मुलं ह्याबाबत आम्हां मुलांना पूर्णपणे अंधारात का ठेवलं होतं? आम्ही लहान होतो, तेव्हा ह्या गोष्टी आमच्या आकलनाच्या बाहेर आहेत असं त्यांना वाटणं शक्य आहे. पण आम्ही समजुतदार झालो, तेव्हा तरी त्यांनी आम्हांला मोकळेपणानं सर्व सांगायला हवं होतं. आम्हांला (निदान मला तरी ) काहीसं अस्पष्ट, अंधुक कळत गेलं ते लोकांच्या कुत्सित प्रश्नांतून कानावर पडलेल्या कुजबुजीतून, मी चौथी - पाचवीत असताना एका मैत्रिणीनं 'हिला दोन आया आहेत' असं जाहीर केल्यावर मी तिच्याशी भांडले होते. असं काही झालं, की मी भांबावून जाई. पण आप्पा-ताईंशी ह्या विषयावर बोलण्याचं धाडस मला कधीच झालं नाही. १९६८ मध्ये आप्पा फार आजारी होते. डॉ. भाव्यांच्या दवाखान्यात दाखल होते. त्यांना भेटायला गोऱ्यापान, बुटक्या नऊवारी साडी नेसलेल्या एक बाई आल्या. ताईनं सांगितल्याप्रमाणे मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि खोलीच्या बाहेर आले. तेव्हा चंदूची पत्नी सुप्रिया आणि माझी थोरली बहीण रोहिणी ह्यांच्यातलं संभाषण माझ्या कानावर पडलं, सुप्रियानं रोहिणीला विचारलं, 'ह्या बाई कोण?' तेव्हा रोहिणीनं सांगितलं 'एक्स मिसेस फडके.' माझ्या मनातली शंका पक्की करणारे हे शब्द होते. पण