पान:निवडक अंतर्नाद.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि तीही त्यांची वाट बघत दारातच उभी असते. मुले तिच्या अंगावर झेप घेतात. तिच्या कमरेला घट्ट मिठी मारतात. दिवसभराचा वियोगसुद्धा आई मुलांना सहन होत नाही. म्हणून ही भेट उभयतांनाही अगदी अपूर्वाईची वाटते, मुलांचे निरागस शैशव, त्यांचा हवाहवासा सहवास, त्यांच्या संगतीत पतिवियोगाच्या दुःखाचा झालेला उपशम - भूतकाळातला हा सर्व चित्रपट कवयित्रीच्या डोळ्यासमोरून झरझर सरकून जातो. पण काळाच्या ओघात ते सारे वाहून गेलेले आहे. पिल्ले दिवसामाशी वाढू लागली. त्यांच्या वाढत्या देहमनांना घराचे चिमणे घरटे अपुरे पडू लागले आणि निसर्गक्रमानुसार आपले नवे पंख पालवीत त्याच दारातून ती निघूनही गेली. आता पुन्हा कवयित्री घरात एकटीच आहे. घराचे ते रितेपण तिला खायला उठते, तसे आपले एकाकीपण तिने धीराने पत्करले आहे. पण एखादा दिवस असा येतो, की तिच्या संयमाचा बांध फुटतो. ते जुने जीवन तिला पुन्हा saसे | वाटू लागते. मुलांच्या वियोगाने तिचे काळीज व्यथित होते. खरे तर आता पुन्हा तशीच सांजवेळ दाटून आली आहे. पण तिच्या कातर, व्याकुल मनाला आज दार लावून आत जावेसे वाटत नाही. तिचा जीव हुरहुरतो आणि डोळ्यांत प्रतीक्षा उभी राहते. त्या वाटेवरून कुणी परत येणार नाही, हे तिला ठाऊक असते. तरीही वाट बघणारी वाट आज संपता संपत नाही. सांज टळली तरीही, दार लावावे वाटे ना 'वळेल का कुणी मागे?' डोळा वाटुली संपेना.... या अगदी साध्या शब्दांत 'वळेल का कुणी मागे?' या आर्त प्रश्नात कवयित्रीची मनः स्थिती किती उत्कटपणे व्यक्त झाली आहे आणि मग अधीरपणे डोळ्यांतून वाट बघणारे तिथे मन हताशपणे म्हणते - डोळा वाटुली संपेना.... वाटेसाठी 'वाटुली' हा शब्द कवयित्रीने योजिला आहे. तो थेट संतकवींच्या भावार्तं मनोवृत्तीपर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवतो. 'पाहता वाटुली, शिणले डोळुले' या तुकारामांच्या उद्गारांचे स्मरण आपल्या मनात जागे करतो. तुकारामांचे आर्त विठ्ठलाच्या भेटीचे आहे कवयित्रीच्या प्रापंचिक मनाला आपल्या दुरावलेल्या मुला- बाळांच्या भेटीची आस लागली आहे पण दोन्हीकडे तीच तळमळ, भेटीची तीच तीव्र असोशी आहे. खरे तर दुसऱ्या एखाद्या कवीने वा कवयित्रीने कविता इथेच संपवली असती. पण इंदिराबाई तसे करत नाहीत. त्या आणखी चार ओळी लिहितात आणि समोर आलेल्या वास्तवाचा कवयित्रीने केलेला समजूतदार स्वीकार त्यातून स्पष्टपणे व्यक्त होतो. हृदयाला जाऊन भिडतो. कवयित्री म्हणते - संपायला हवी वाट, लावायला हवा दिवा पोटासाठी मुकाट्याने, हवा टाकायला तवा! कितीही वाट पाहिली तरी 'डोळ्यांतल्या वाटुली' चा काही उपयोग नाही, हे कटू पण अटळ वास्तव कवयित्री स्वीकारते, जीवन अर्थशून्य वाटू लागले तरी रोजची कर्तव्ये संपत नाहीत. संसारचक्राचे ठराविक फेरे फिरतच राहतात. कवयित्री स्वतःचीच समजूत घालत म्हणते, 'ही वाट आता संपवली पाहिजे. रित्या अंधारलेल्या घरात दिवा लावला पाहिजे. इतकेच नव्हे तर पोटपूजेसाठी मुकाट्याने चुलीवर तवा टाकून भाकरही भाजली पाहिजे!' आजकाल घरोघरी प्रत्ययाला येणारे हे एक दृश्य, ते इथे कवयित्रीच्या स्वतःच्या अनुभवविश्वातून प्रकट झाल्यामुळे त्याला विलक्षण तीव्रता, हृदयस्पर्शित्व प्राप्त झाले आहे. इतर ठिकाणी मुले- बाळे आपापल्या मार्गाने गेली तरी मागे वृद्ध पतिपत्नी राहतात, ती एकमेकांच्या संगतीत आपले आयुष्य व्यतीत करतात. पण इथे जोडीदार आधीच निघून गेला आहे आणि आता मुलेही दुरावली आहेत. कवयित्री एकाकी अवस्थेत जुन्या आठवणी मनात घोळवत आहे. त्यामुळे ते एकाकीपण अधिक तीक्ष्ण, धारदार झाले आहे. या कवितेचे सारे सौंदर्य तिच्या साधेपणात, संयमशील निवेदनात आहे इथे मुलांचा प्रत्यक्ष उल्लेख कुठेही नाही. पण • जेवताना त्यांनी मारलेल्या मिटक्या, भुरके, मुलांचे पतंग, भोवरे, मुलींची भातुकली, हदगा आणि कधीमधी त्यांनी हौसेने माळलेल्या मोगऱ्याच्या कळ्या, त्यांच्या गप्पागोष्टी, गाणी, मस्करी आणि शाळेतून घरी आल्यावर दारातच त्यांनी आईच्या कमरेला घातलेली घट्ट मिठी या लहान लहान तपशिलांतून मुलाबाळांनी गजबजलेले एक सुखी घर डोळ्यांसमोर उभे राहाते. इथे घरधनी नाही. म्हणून मुलांचे सारे प्रेम एका आईच्याच ठायी एकवटले आहे. पण हे सारे कवयित्री कुठेच स्पष्ट शब्दांत बोलत नाही. ते सारे सुचवले जाते. त्यामुळेच कवितेची उत्कटता अधिक वाढली आहे. साधे शब्द, त्यांचा अत्यंत संयत वापर आणि क्वचित वापरलेल्या समर्पक प्रतिमा यांमुळे ही कविता जेवढे सांगते त्यापेक्षा कितीतरी अधिक ती आपल्या मनात जागे करते. 'डोळा वाटुली संपेना' किंवा 'पोटासाठी मुकाट्याने, हवा टाकायला तवा' अशा जवळजवळ गद्यसदृश शब्दांतून अर्थाचे ब्रह्मांड आपल्या डोळ्यांसमोर उभे राह्यते इथे आक्रस्ताळे उद्गार नाहीत. दुःखाचे तपशीलवार भडक चित्रण नाही. उरात खोल साठवलेली, गिळलेली व्यथा एखाद्या उसाशाने केवळ व्यक्त व्हावी तशी ही कविता. या कवितेतील शब्दांचा वापरही अगदी मोजका पण तितकाच सूचक आहे. कवयित्रीचा हात 'साधासुधा' आहे, पण मुलांची बाळजीभ 'अमृताची' आहे म्हणून ताटातले साधे अन्नही ती मिटक्या मारत, भुरके घेत खातात. आता कवयित्री सांजवेळी एकटीच दारात उभी आहे. जिथे पंगत रंगली होती तिथे आता एकटीनेच जेवायचे आहे हे सत्य तिला जाणवते. आणि • डोळ्यांतली प्रतिक्षेची वाटुली संपवली पाहिजे हेही तिला उमगते. पण तेही ती अगदी साधेपणानेच सांगते - पोटासाठी मुकाट्याने, हवा टाकायला तवा! हा तवादेखील कवयित्रीच्या मनाचेच एक प्रतीक आहे. रोजची भाकर आपणच भाजली पाहिजे, तापलेल्या देहमनाला आपणच शांत केले पाहिजे, नित्यक्रम चालू ठेवला पाहिजे - हे सारे या दोन ओळी आपल्याला सांगतात. एरव्ही निसर्गाची रम्य चित्रे रेखाटणाऱ्या विलक्षण प्रतिमांनी आपला दु:खभोग परोपरीने परिणामकारक करणाऱ्या इंदिराबाईंनी इथे एक साधी कविता लिहिली आहे. पण या साधेपणातच तिचे सर्व सौंदर्य, सारी उत्कटता आणि सारे हृदयस्पर्शित्व भरून राहिले आहे. (ऑगस्ट १९९७) निवडक अंतर्नाद २३