पान:निवडक अंतर्नाद.pdf/२४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शोकांतिका जगलेला न-नायक : आनंद यादव रवींद्र शोभणे प्रतिभावान लेखक असूनही आनंद यादव फक्त स्वतःच्या लेखनात कधीच रमले नाहीत, समाजाशी फटकून राहिले नाहीत. कायम साहित्यचळवळीत अग्रगण्य राहिले. ग्रामीण साहित्य परिषद स्थापन करून गावोगावी साहित्य संमेलने घेतली. ग्रामीण भागातील अनेक साहित्यिकांना उमेदवारीच्या काळात त्यांनी मोठा आधार दिला. काही माणसं आपल्या आयुष्यात खूप लवकर येतात, काही योग्य वेळी येतात, तर काही खूप उशिरा येतात. आनंद यादव माझ्या आयुष्यात एक लेखक म्हणून काहीसे उशिरा आले असं मला सारखं वाटत होतं. पण नंतर मात्र असं जाणवलं, की यादवांशी आणि त्यांच्या साहित्याशी आपली ओळख झाली ती अगदी योग्य वळणावर त्यातही आधी त्यांची प्रत्यक्ष ओळख झाली आणि नंतर त्यांच्या साहित्याची ओळख झाली. तोवर मी सत्यकथा हे मासिक मोठ्या भक्तिभावाने वाचत होतो. पण त्यावेळी यादवांनी सत्यकथेत लिहिणं सोडलं होतं. आणि त्यातही माझे आवडते लेखक म्हणून त्यावेळी मी श्री. ना. पेंडसे, चिं. त्र्यं. खानोलकर, ग्रेस, जी. ए. कुलकर्णी आणि तत्सम लेखकांच्या साहित्याचा चाहता झालो होतो. नाटकात वसंत कानेटकर, तेंडुलकर हे आवडते लेखक होते. दलित-ग्रामीण साहित्यही त्यासोबतच वाचत होतो. थोडक्यात, वाचन असं शिस्तबद्ध नव्हतंच. जेव्हा जे हाताशी येईल ते वाचून काढीत होतो. याच वयात मी लेखन सुरू केलं होतं आणि माझ्या लेखनाची प्रकृती काहीशी तशीच तयार झाली होती. त्यांच्या लेखनाचा प्रभाव माझ्या लेखनावर स्पष्टपणे जाणवत होता. आपल्या अवतीभवतीचं जग आपल्या लेखनातून टिपण्यापेक्षा माझा ओढा तेव्हा अशा अमानवी आणि चमत्कृतिपूर्ण, नियतिशरण लेखनाकडे अधिक होता. केवळ वाचनाच्या संस्कारातून तयार होऊ पाहणाऱ्या माझ्यासारख्या लेखकाची नाळ जमिनिशी जोडू पाहण्याच्या शक्यतांची प्रचीती करून देण्याचं काम प्राचार्य या वा वडस्कर यांनी जाणीवपूर्वक केलं. त्यांच्याच बैठकीत आनंद यादव हे नाव अनेकदा त्यांच्या मुखावाटे मी ऐकलं होतं. अशातच प्राचार्य वडस्कर यांनी नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अमृता प्रीतम यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसीय जनसाहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. या साहित्यसंमेलनात मी पहिल्यांदा आनंद यादव यांना पाहिलं. उंच बांधा, गौर वर्ण, अंगात साधीच शर्ट पँट, डोक्यावरचे पांढरे झालेले केस चापून चोपून नीट बसवलेले, आणि चेहऱ्यावर कायमचं स्मित, त्या साहित्य संमेलनात मी स्वयंसेवकाचं काम करीत होतो. साहित्याविषयीची मनातून आवड असल्यामुळे मी या संमेलनात ही भूमिका पार पाडत होतो. त्यासोबतच माझ्या लेखकीय कारकीर्दीतली पहिली कथा मी याच संमेलनात वाचली होती. या साहित्यसंमेलनात सहभागी झालेले अनेक लेखक नंतर माझे कायमचे मित्र झाले, ही माझी या साहित्यसंमेलनातली मोठी कमाई मी मानतो, आनंद यादव हे त्यातलेच एक होत. आनंद यादवांच्या या भेटीनंतर, ओळखीनंतर त्यांची माझी मैत्री हळूहळू वाढीस लागली. खरं तर त्यांच्या माझ्या वयात एका पिढीचं अंतर होतं; पण ते अंतर पहिल्या दुसऱ्या भेटीतच कधी कसं गळून पडलं तेही जाणवलं नाही. प्राचार्य वडस्करांनी माझी यादवांशी ओळख करून देताना सांगितलं होतं – 'ह्य बऱ्यापैकी लिहिणारा लेखक आहे पण बेटा ग्रेस- जी.एं.च्या प्रभावात आहे अजूनही त्याला या प्रभावातून बाहेर काढावं लागेल.' त्यावर यादव म्हणाले होते – 'ते सध्या पुस्तकं वाचून लिहितात, म्हणून ग्रेस, जी.एं.च्या प्रभावात आहेत. जीवन वाचायला लागतील तेव्हा आपोआपच त्या प्रभावातून बाहेर पडतील. ' त्यांचं ते वाक्य माझ्या वाड्मयीन जाणिवांची उलथापालथ करणारं ठरलं. वाचनाच्या या प्रक्रियेत जीवनदर्शाचे काही वेगळे पैलू आपल्याला आकळता येतात का याचाही विचार करू लागलो. आपल्याच जगण्याकडे अधिक गंभीरपणे, अधिक चौकसपणे पाहायला सुरुवात केली. साहित्यांतर्गत आणि जीवनांतर्गत सत्याचा, शक्यशक्यतांचा अधिक गंभीरपणे विचार करण्याची सवय मला याच अवस्थेत कधीतरी लागली आणि ती कायमची अंगवळणी पडली. त्यानंतर मी याच काळात आनंद यादवांचं हाताशी येईल तेवढं साहित्य वाचून काढण्याचा जणू सपाटाच सुरू केला. काही काळातच मला जाणवलं - यादव माझे आवडते लेखक झालेले आहेत. त्यांचं ललित आणि समीक्षणात्मक असं दोन्ही प्रकृतींचं लेखन मी अधाशासारखं वाचून काढलं. मीही ग्रामीण भागातून आल्यामुळे यादवांची बोलीविषयीची, ग्रामीण साहित्यनिर्मितीसंबंधीची मतं मला पटू लागली. पटू लागली असं निवडक अंतर्नाद २३९