पान:निवडक अंतर्नाद.pdf/२४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुवादकाच्या अडचणी ठाऊक होत्या. पण त्यांच्या काही सूचनांवरून माझं उद्बोधन होत होतं. उदाहरणार्थ, कथा- कादंबऱ्यांच्या अनुवादाच्या सवयींमुळे नाटकाचा अनुवाद करताना मी मुबलक प्रमाणात उद्गारवाचक चिन्हांचा वापर केला होता. ती सारी त्यांनी खोडली होती. कदाचित माझ्याकडून त्या चिन्हाद्वारे दिग्दर्शक-कलाकाराच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येत असावा असा माझा मीच निष्कर्ष काढला. हे अनुवाद सुरू होते तेव्हा कार्नाड विविध कारणांनं भरपूर कार्यरत होते. अनेकदा चित्रीकरणामुळे ते कुठल्यातरी आडगावात असत, मिटिंगसाठी परगावी असत. सतत कुठल्या ना कुठल्या देश- परदेशातल्या प्रवासात असत. त्यातच ते हस्तलिखित तपासून देत. एकदा रामचंद्र गुहांनी एक आठवण लिहिली होती, '... विमानात गिरीश पुढच्या दोन रांगा सोडून सीटवर होता. पाहिलं तर त्याच्यासमोर कागदांची एक चवड होती. विचारलं तर त्यानं सांगितलं, त्याच्या नाटकाच्या मराठी अनुवादाचा खर्डा तो तपासत होता. मला त्याच्याविषयी वाटणारा आदर वाढला...' 'नागमंडल' चा अनुवाद अशा प्रकारे पुरा झाला आणि प्रकाशकाकडे छपाईला गेला होता. त्याच वेळी वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली. 'नागमंडल' नाटकाची प्रॅक्टिस सुरू झाली होती. पण त्यासाठीचा अनुवाद आणखी कुणाचा तरी होता. मी गडबडले. लगेच कार्नाडांना पत्र लिहिलं, त्यांचंही गोंधळून पत्र आलं. 'असं कसं घडलं ?...' नंतर त्यांनी सगळा शोध घेऊन क्षमायाचना करणारं पत्र लिहिलं, '...सॉरी आता त्यांची प्रॅक्टिस सुरू झाली आहे... काही करणं शक्य नाही... पण पुस्तक तुमच्याच अनुवादाचं येईल याची खात्री बाळगा...' आणि नंतर मात्र त्यांनी ती काळजी घेतली. पाठोपाठ 'सुगावा प्रकाशन'च्या उषा - विलास वाघ यांच्याकडून 'तलेदंड' या नाटकाच्या अनुवादाचं काम आलं. मनावरचं दडपण पहिल्यासारखं राहिलं नव्हतं. या अनुवादाच्या वेळच्या काही आठवणी आहेत. 'तलेदंड' हे नाटक बाराव्या शतकातल्या बसवेश्वराच्या जीवनातल्या एका कालखंडावरचं आहे सनातन धर्मातल्या जातीय व्यवस्थेसारख्या वाईट रूढींच्या विरोधात बसवण्णानं एक सर्वव्यापक चळवळ उभी केली. जातिव्यवस्था नष्ट करून एकसंघ समाज निर्माण करण्याचं भव्य स्वप्न पाहणारा हा द्रष्टा महापुरुष, त्याच्या 'रोटी-व्यवहारा' ला विरोध झाला तरी काही प्रमाणात यश मिळालं. पण ब्राह्मण मुलगी आणि चांभार मुलाचं लग्न करायच्या 'बेटी-व्यवहारा' ला कडाडून विरोध झाला आणि रक्तक्रांतीच झाली. कर्नाटकातल्या अनेक लेखक-नाटककारांना या विषयानं वेळोवेळी लिहायला उद्युक्त केलं आहे प्रस्तावनेत कार्नाड म्हणतात त्याप्रमाणे दुखऱ्या दाताकडे पुन्हा पुन्हा नकळत जीभ वळते, तसाच हा प्रकार, या नाटकातलं बिज्जळ हे पात्र महत्त्वाचं, हा न्हावी जातीतला उत्तम माणूस आता राजा झाला आहे. याच्या दरबारात उच्चपदावर असलेल्या बसवण्णाचं बरंच कार्य याच्याच पाठिंब्यावर चाललं आहे. त्यामुळे नाटकातलं हे पात्र महत्त्वाचं आहे. त्याच्या आणि त्याच्या मुलाच्या, सोविदेवाच्या तोंडातली भाषा शिवराळ आहे. अनुवाद तपासून पाठवताना कार्नाड मी वापरलेल्या शिव्यांखाली रेष मारून तिथे 'स्ट्राँग' शिवी वापरण्याची आग्रहाची सूचना करत! कारण मी वापरलेली शिवी 'नालायक' एवढ्याच ताकदीची असे! अखेर मीही संशोधन करून अधिक स्ट्रॉग शिव्या मिळवल्या आणि वापरल्या! पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आणखी एक प्रसंग घडला. कार्नाडांचे एके काळचे शिक्षक डॉ. पंडित आवळीकर हे आमच्याही परिचयाचे होते. ते मुलाकडे पुण्यात आले की आमच्याकडे भेटायला येत. एका भेटीत मी त्यांना मोठ्या उत्साहानं मराठी 'तलेदंड' ची प्रत भेट म्हणून दिली. पुढच्या भेटीत त्यांनी भरपूर अभ्यास करून त्यातील काही आक्षेपार्ह शब्द काढून दाखवले! कथा बाराव्या शतकातली असल्यामुळे मी माझ्या भाषेत 'खेळता खेळता आयुष्य' या कार्नाड यांच्या आत्मकथनाच्या अनुवादाचे प्रकाशन झाले त्यावेळचे छायाचित्र निवडक अंतर्नाद २४७