पान:निवडक अंतर्नाद.pdf/२५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नाडांवर होणारा दुसरा आरोप म्हणजे 'कार्नाडांवर भारतीयत्वाचा जो काही प्रभाव आहे तो कलेच्या अंगानं आहे (त्यांचे शिरसीतले अनुभव). पण भारतीय जीवन आणि तत्त्वज्ञानापासून ते दूर आहेत. उलट ख्रिश्चन तत्त्वज्ञान आणि पाश्चात्त्य संस्कृतीशी ते मुळापासून जुळलेले आहेत.' तसंच, त्यांच्या ('तलेदंड' वगळता) ऐतिहासिक नाटकांनी ही असेच वाद निर्माण केले. विशेषत: टिपू सुलतान हे कर्नाटकाशी तितकंच निगडित नाव. कर्नाटकाची राज्यभाषा टिपूनं कन्नड असलेली बदलून उर्दू केली, ही कर्नाटकात खटकणारी गोष्ट. शिवाय टिपूच्या अनेक बऱ्या वाईट कथा तिथल्या जनमानसात रुळलेल्या. त्यामुळे कार्नाडांचं टिपूचं व्यक्तिचित्रण अनेकांना खटकलं. नंतरच्या काळातली त्यांची गोमांसाविषयीची आणि अर्बन नक्सलवादी असण्याविषयीची विधानं संपूर्ण भारताप्रमाणेच कर्नाटकातही वादग्रस्त ठरली. त्यांच्या रवींद्रनाथ टागोरांवरील विधानानंही अशीच भारतभर खळबळ उडवून दिली होती. 'नागमंडल' मध्ये वापरल्या गेलेल्या एका गाण्याच्या संदर्भात त्यांच्यावर वाङ्मयचौर्यांचे आरोपही झाले. पण कर्नाटकातले बुद्धिवादी समूह मात्र त्यांना विचारांना दिशा देणारा लेखक मानतो. तसेच त्यांना आधुनिक नाटकांमध्ये चैतन्य भरणाऱ्या लेखकांपैकी एक मानतात. इंग्लिशसह भारतात सर्वदूर पोचलेले गिरीश कार्नाड आजच्या काळातले महान भारतीय नाटककार ठरतात. चित्रपट - संस्कृतीमुळे चैतन्यहीन झालेल्या नाट्यसृष्टीला साठाव्या शतकात ज्या भारतीय नाटककारांनी चैतन्य देण्याचं महान कार्य केलं, त्यात गिरीश कार्नाडांचं स्थान वादातीत आहे. ००० 'उणेपुरे शहर एक' या नाटकाचा पुण्यातला प्रयोग आम्ही कार्नाडाच्या शेजारी बसून पाहिला. त्यानंतर घडलेला प्रसंग. 'लेखिका साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मी नागपूरला गेले असता तिथल्या संयोजकांनी मला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. ते अनेक वर्षं गिरीश कार्नाडांना नागपूरला बोलवायचा प्रयत्न करत होते. अनेकांकरवी प्रयत्न करून झाले होते. तिथल्या साहित्य आणि नाट्य क्षेत्रांतल्या मंडळींची कळकळ स्पष्टच दिसत होती. त्यासाठी त्यांची योग्य तो खर्च करायचीही तयारी होती. पण याबाबतीत मी त्यांना काय मदत करू शकते, हे मला समजत नव्हतं. मी विचारलं, 'त्यांच्या नव्या नाटकाचा प्रयोगही सोबत ठेवाल का ? तर मी तसं विचारून बघते. बाकी तपशील तुम्ही आपसात ठरवा.' व्याख्यान किंवा मुलाखत आणि नाटकाचा प्रयोग अशा दोन्ही कार्यक्रमांसाठी संबंधितांची सहजच तयारी होती. मी लगेच कार्नाडांना फोन केला. फक्त व्याख्यान किंवा मुलाखतीसाठी त्यांनी तयारी दर्शवली नाही. पण नाटकाच्या प्रयोगाचं बोलताच ते तयार झाले. पुढील बोलणी त्यांनी परस्पर ठरवली आणि दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम झाला. कार्नाडांची मुलाखत आणि नव्या नाटकाचा प्रयोग पाहून नागपूरकर भरून पावले. त्या वेळी कार्नाडांच्या स्वभावाचा नवाच पैलू सामोरा आला. आजही नागपूरमधले साहित्यप्रेमी आणि नाट्यप्रेमी त्या दोन दिवसांची भरभरून आठवण काढतात. नंतर आणखी एका कार्यक्रमासाठी त्यांना फोन केला तेव्हा मात्र त्यांनी परगावी प्रवास करण्याविषयी असमर्थता व्यक्त केली. ००० कार्नाडांचं आत्मकथन 'खेळता खेळता आयुष्य' थाटामाटात प्रकाशित झालं आणि मराठी वाचकांनी त्याचं मोकळ्या मनानं स्वागत केलं. त्यातही गाजली ती त्याची गमतीशीर 'अर्पण- पत्रिका', मागच्या पिढीतल्या पुण्यातल्या सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. मधुमालती गुणे यांना त्यांनी ते अर्पण केलं. कारण त्या ठरलेल्या वेळी न आल्यामुळे आपला जीव बचावला आणि म्हणून आपण अस्तित्वात आलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. साहजिकच सुरुवातच अशा मनोरंजक प्रकारे झाल्यामुळे आत्मकथनाविषयी उत्सुकता निर्माण होते. तीन आवृत्त्या संपल्यानंतर माझ्या कानांवर एक गोष्ट आली ती अशी; या अर्पणपत्रिकेमुळे डॉक्टरांचे काही आप्तस्वकीय दुखावले गेले होते. त्यांना ओळखणाऱ्यांची प्रतिक्रिया अशी होती, त्या अशा प्रकारची कामं करणाऱ्या डॉक्टर नव्हत्या हो ! कितीतरी जीव वाचवलेत त्यांनी! घरटी आठ-दहा मुलं असायची त्या जमान्यात तर ही फारच हीन मानली जाणारी गोष्ट होती. काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तरच बाईचा जीव वाचवण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जायचा. मुख्य म्हणजे जरी डॉक्टरीणबाई वेळेवर आल्या असत्या तरी कार्नाडांच्या जिवाला अजिबात धोका नव्हता याची हमी देणारी कितीतरी माणसं आजही पुण्यात सापडतील!' ००० • अखेरची काही वर्षं गिरीश कार्नाड बरेच आजारी असायचे. ते परगावी जात नाहीत, पण ऑक्सिजनची नळी सोबत बाळगून गावात फिरतात, हे अशोक कुलकर्णी यांच्याकडून समजायचं. त्यांचा 'अर्बन नक्षलवादी' असल्याचा फलक घेतलेला, नाकात नळ्या घातलेल्या फोटोही सगळ्यांनी पाहिला. आपल्याला जे वाटेल ते स्पष्टपणे सांगण्याचा स्वभाव त्यांनी तेव्हाही सोडला नव्हता. गिरीश कर्नाडांच्या मृत्यूनंतरचे सगळे विधी त्यांच्या इच्छेनुसार सर्वस्वी यळण्यात आले. राजकीय इतमामानं अंत्यक्रिया व्हावी अशी तयारी शासनाकडून व्यक्त झाली तरी कार्नाडांच्या कुटुंबीयांनी ठाम नकार दिला. अखेरच्या काळात ते एका सोसायटीत राहायला गेले होते. मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला तर वाहतुकीच्या अडचणी निर्माण होतील, या विचारानं तेही केलं गेलं नाही. विद्युत- दाहिनीची जागा गावापासून बरीच दूर होती. अंत्यदर्शनाची इच्छा असलेल्यांना तिथं ठरावीक वेळेला यायला सांगितलं गेलं. पण माणसं पोचण्याच्या आत सगळं संपलं होतं! 'आपला मृतदेह कुणाच्या नजरेला पडू नये या गिरीश कार्नाडांच्या इच्छेचाही त्यांच्या कुटुंबीयांनी सन्मान केला! हेही सारं गिरीश कार्नाड या नावाला साजेसंच! (दिवाळी २०१९) निवडक अंतर्नाद २५१