पान:निवडक अंतर्नाद.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेहमीच फुटलेले असते त्या संदर्भातली काव्ये आहेत. कवितेत माजलेल्या अनेक अपप्रवृत्तीवर त्यांत मार्मिक भाष्य केलेले आढळते. उपाध्ये यांच्या या कविता आचार्य अत्रे यांच्या 'झेंडूच्या फुलां' मधील विडंबन कवितांशी जवळचे नाते सांगणाऱ्या आहेत. इतके सारे विविध प्रकारचे काव्यलेखन केलेले असूनही उपाध्ये यांचा केवळ एकच कवितासंग्रह निघालेला असावा ही गोष्ट काहीशी विस्मयकारक वाटते. 'पोपटपंची या कुतूहलजनक नावाने प्रकाशित झालेल्या प्रस्तुत संग्रहातही उपाध्ये यांच्या फक्त त्रेचाळीसच कविता असाव्यात याचे तर अधिकच आश्चर्य वाटते. त्यातही एक नवलाची गोष्ट अशी की, उपाध्ये यांच्या सर्व कवितांचा संग्रहात अन्तर्भाव झालेलाच नाही. 'चालचलाऊ भगवद्गीता' हे विडंबन 'पोपटपंची'त नाही. विसरशील खास मला ही जी सुंदर कविता इथे घेतलेली आहे तीही 'पोपटपंची'त आढळली नाही. याचा अर्थ असा की उपाध्ये यांच्या इतर काही कविता समकालीन मासिके, नियतकालिके यांत विखुरलेल्या असाव्यात. त्या एकत्रित करून 'पोपटपंची' ची समग्र आवृत्ती कुणी काढली तर कवी या नात्याने उपाध्ये यांची अधिक नेमकी ओळख पटेल आणि आजच्या पिढीलाही त्यांची कविता पुन्हा उपलब्ध होईल. पण तूर्त तरी हे अशक्य दिसते. उपाध्ये यांच्या कवितांचा आणखी एक उल्लेखनीय गुणविशेष आहे. त्यांच्या अनेक कविता म्हणजे उत्कृष्ट भावगीते आहेत. या बाबतीत भा. रा. तांबे, रविकिरण मंडळातले कवी यांच्याशी त्यांचे साम्य आहे असे म्हणता येईल. अतिशय आकर्षक ध्रुपद, तीन किंवा चार कडव्यांतून मध्यवर्ती कल्पनेचा केलेला विस्तार, अस्ताई अंतऱ्याचे वेगळे राखलेले वजन यांमुळे त्यांच्या या गीतांना आपोआपच गेयतेचे परिमाण लाभलेले आहे. ही गेयता संगीतकारांनी अचूक हेरली आणि उपाध्ये यांच्या काही गीतांना त्यांनी रसपरिपोषक चाल लावून ती स्वरबद्ध केली. त्याबरोबर गुणी गायक-गायिकांनी ती गाइली, उपाध्ये यांची ही गीते ध्वनिमुद्रितही झाली आहेत. आजच्या अनेक तरुण कवींना आणि काव्यप्रेमी रसिकांना उपाध्ये या कवीची थोडीबहुत ओळख आहे ती त्यांच्या या ध्वनिमुद्रित गीतांमुळेच. मुळात काव्यगुणांनी संपन्न असलेली ही गीते चांगली चाल व गाणारा गोड गळा यामुळे अधिकच रसाळ झाली आहेत. विसरशील खास मला हे उत्तम चाल लावलेले आणि आशासारख्या प्रतिभावंत गायिकेने गायिलेले गीत रसिकमान्य झाले आहे. उपाध्ये यांचे रामचंद्र मनमोहन नेत्र भरूनि पाहिन काय? हे मूळच्या दीर्घ कवितेचा संक्षेप करून तयार केलेले भावगीतही ध्वनिमुद्रित झालेले आहे. किति गोड बाई! बाळ जसे कमल उमलले हे सुंदर गीत विख्यात नाटककार वसंत कानेटकर यांनी आपल्या नाटकात घेतलेले आहे आणि रसिकांना जर आठवत असेल तर फार वर्षांपूर्वी रामचरित्रावर आधारलेल्या रामराज्य या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गीते लिहिली होती, तेव्हा एका गीतात त्यांनी उपाध्ये यांच्या सीते, सीते, विमलचरिते, प्रेमले, चारुशीले! का गे! ऐसे कठिण मन कोमले आजे केले! या ओळींचा जसाच्या तसा अन्तर्भाव केला होता. उपाध्ये यांच्या काव्याचे हे भावगीतात्म (Lyrical) वैशिष्ट्य मुद्दाम नमूद करावयास हवे. विसरशील खास मला ही उपाध्ये यांची इथे घेतलेली कविता हे एक नाट्यगीत आहे कुणीतरी एक 'तो' आणि कुणीतरी एक 'ती' यांच्या हृदयांचा एक सुंदर मेळ इथे जुळलेला आहे आणि आता 'तो' आपल्या वल्लभेला सोडून कुठे तरी दूर जायला निघालेला आहे. जातेवेळी तिचा निरोप घेताना त्याने 'मी तुला कधी विसरणार नाही' असे तोंड भरून आश्वासन दिले असेल. आपल्या एकनिष्ठ प्रीतीची साक्ष तिला पटवली असेल आणि परदेशी गेल्यानंतर तिथे कोणत्याही आणि कुणाच्याही मोहपाशात न गुंतता मी आहे तसाच निर्लेप परत येईन असे तिला पुन्हा पुन्हा सांगितले असेल. पण त्याच्यापेक्षा 'ती' जास्त चतुर, संवेदनाक्षम, आणि स्त्रीजातीला निसर्गतःच लाभलेल्या एका गूढ शक्तीमुळे या विषयात अधिक जाणकारही आहे अतिस्नेह: पापशंकी या न्यायानुसार आपल्या प्रियकराच्या 'गोड गोड' वचनांवर विश्वास ठेवणे तिला अवघड जात आहे मन समर्थ असेलही, पण शरीर दुबळे असते. प्रेमाचे अधिष्ठान असलेली व्यक्ती डोळ्यांना दुरावली की मनातूनही हळू हळू तिची मूर्ती अंधुक होत शेवटी अन्तर्धान पावते, हा निसर्गाचा नियम एका अभिजात शहाणपणाने तिला आधीच ठाऊक झाला आहे दृष्टिआड सृष्टी या मराठी म्हणीप्रमाणे किंवा Out of Sight, Out of Mind या इंग्रजी वचनानुसार आपल्या भेटीगाठी बंद पडल्या की आज आपल्यावर उत्कट प्रेम करणारा प्रियकर उद्या आपल्याला विसरून जाईल या आशंकेने तिचे मन बावरून गेले आहे अस्वस्थ झाले आहे. तिचे सारे बावरलेपण, भय कवितेच्या पहिल्या दोन ओळींतच किती परिणामकारकपणे व्यक्त झाले आहे हे बघण्यासारखे आहे. ती म्हणते विसरशील खास मला दृष्टिआड होता वचने ही गोड गोड देशि जरी आता! प्रेमाला विस्मरणाचा शाप असतो. त्यातून पुरुषप्रेम तर चंचल, भ्रमर वृत्तीचे असते. आपला प्रियकरही त्याला अपवाद नसणार हे एका अन्तःप्रेरणेने जाणणारी ही प्रणयिनी त्याच्या गोड वचनावर, मधुर आश्वासनांवर विश्वास ठेवू शकत नाही. एकदा माणूस नजरेआड झाले, सहवासाला दुरावले की काय घडू शकते हे ती पुढे सांगते. तिची ही व्यथा तिची एकटीची नाही. ती अवघ्या स्त्रीजातीचीच मनोवेदना आहे. दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी व्यवसायहि विविध, विविध विषय भोवताली गुंतता तयात कुठे वचन आठवीता? ती प्रेयसी म्हणते, एकदा मी प्रियकराच्या दृष्टीआड झाले म्हणजे त्याच्या मनातले माझे स्थानही हळूहळू नाहीसे होणारच. तो परदेशी गेला म्हणजे त्याच्या भोवतालचे सारे जगच पालटेल, नाना व्यवसायांत तो गुंतून जाईल आणि त्याचे चित्त वेधून घेणारे असंख्य विषय त्याच्याभोवती जमतील. त्याचे पुरुषी मन एकदा या नवनव्या आकर्षणांनी विद्ध झाले म्हणजे मला दिलेली निवडक अंतर्नाद २५