पान:निवडक अंतर्नाद.pdf/२७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढील ओळींत तीन प्रतिमा आल्या आहेत. त्यात प्रचंड निराशावाद साठलेला आहे. कोठलीही एक प्रतिमा घ्या. जीवन म्हणजे एखाद्या सामान्य नटाचा रंगभूमीवरील चार क्षणांचा आरडोओरडा, छाती काढून चालणे, मुठी आवळून बोलणे, शेवटी काळांच्या विगमध्ये गेला की तो होतो निःशब्द, नगण्य! अथवा दुसरी प्रतिमा घ्या; (जीवन म्हणजे) मूर्खाने आरडाओरडा करीत सांगितलेली गोष्ट जिला काहीच अर्थ असत नाही. शेवटी ती गोष्ट आणि तो मूर्ख दोघेही संपतात, तो दिमाख, तो मूर्ख विश्वास सारेच भ्रम विरून जातात. उरते नि: शब्दता, उरतो काळोख! आणि तिसरी प्रतिमा म्हणजे Walking shadowची. माणसाचे जीवन म्हणजे जणू चालतीबोलती सावली : म्हणजे पुन्हा तीच निरर्थकता, शेक्सपीअरमध्ये येणाऱ्या असल्या प्रतिमा घंटानादासारख्या असतात, अभिधेचा ठोका पडतो आणि व्यंजनेच्या लहरी दूरवर जातात. सवंग दिमाखाने शब्द आणि चाल फेकणारा नट संपतो, त्याचे शब्द संपतात दिमाख उरत नाही. नाट्यगृहात तो विसरला जातो. नाटक संपते. शेवटी नाट्यगृह रिते होते आणि उरते शांतता - सगळे काही निरर्थ करणारी, हास्यास्पद करणारी व्यंजनेच्या लहरी मनाला अशा दूरवर नेतात आणि सगळा संदर्भ व्यापतात. पण शेक्सपीअरने आपल्याला नेमके काय दिले? विचार? विचारप्रणाली ? तत्त्वज्ञान? यातले एकच एक काही त्याने दिले असे वाटत नाही. वैचारिक निराशावाद आपणा सर्वांना मान्य होईल असे नाही. तो खरा असेल अथवा नसेलही, शेक्सपीअर आविष्कृत करतो तो केवळ विचार नव्हे तर त्यामागील भावनेचे क्षेत्र ( emotional field). शेवटी विचारात क्रिस्टलाईज होणारी भावनांची प्रक्रिया, not the product, but the process. ती प्रक्रिया तो समग्रतेने आपल्यापुढे उभी करतो. कवितेचे सामर्थ्य विचारप्रदानात नसते. ते भावना आणि तिच्या संदर्भाचे व्यापक क्षेत्र ह्यांच्या एकत्रित आविष्कारात असते. प्रस्तृत संदर्भात आपण असे म्हणू की निराशावाद खरा नसेल पण निराशा खरी आहे काव्य म्हणजे काही धंदेवाईक आशावाद्यांनी अथवा निराशावाद्यांनी लावलेल्या दुकानांचा बाजार नव्हे. येथे कधी क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे असे वातावरण असते तर कधी आषाढवनांशी झुंजे वादळवात असे दृष्य दिसते. आणि जे दिसते ते हृदयाला भिडते. जीवनाच्या गुंतागुंतीचे अनेक तणाव व्यवस्थित आविष्कृत करणारी अद्वितीय भाषा हे शेक्सपीअरचे विशेष वैभव, शेक्सपीअर आपण वाचला. काय मिळाले आपल्याला ह्या प्रवासामधून? आयुष्याच्या कटकटी का कमी असतात? हॅम्लेटने म्हटल्याप्रमाणे गर्विष्ठांचा उद्धटपणा, कायद्याचा विलंब, नालायकांचा शहाजोगपणा इत्यादी अनेक वैताग आणणाऱ्या गोष्टींनी आयुष्य भरले असताना आणखी कशाला हे ताणतणाव ? थकलेला, दमलेला अँटनी क्लिओपात्राबद्दल विचार करतो की आयुष्यात ती भेटलीच नसती तर किती बरे झाले असते! हे ताण तरी पडले नसते! त्यावर त्याचा सहकारी इनोबार्बस् म्हणतो: Then you had left unseen a Wonderful piece of work, Which not blessed withal, Would have discredited your travel ! (तर मग तुम्ही एका अजब कृतीला मुकला असता आणि त्या अभावी तुमचा जीवनप्रवास अर्थशून्य झाला असता.) शेक्सपीअरच्या काव्याविषयी निदान एवढे तरी निश्चित म्हणता येईल. ही रसयात्रा झाली नसती तर जीवनाचा प्रवासच मुळी अपुरा राहिला असता; आगऱ्याला जाऊन ताजमहाल न पाहिल्यासारखा! शेक्सपीअरसाहित्य वाचल्यामुळे जीवन जगणे सुकर झाले असे म्हणणे हास्यास्पद वाटेल. शेक्सपीअरने उपदेश केलेला नाही, नीतितत्त्वांवर भर दिला नाही, अध्यात्म सांगितले नाही, किंवा धर्मप्रचार केला नाही. वास्तवतेचे सहीसही प्रतिदर्शनही त्याच्या साहित्यातून मिळणार नाही. आणि त्याने आदर्शांची आरासही लावली नाही. जीवनाचे विविध दर्शन, आंतरिक आणि बाह्य, त्याने उभे केले आहे; पण त्याही पलीकडे आणि ह्याहून अधिक काहीतरी त्याने केले आहे जीवनाची कृतार्थता सुफलित होण्यात आहे, परिपक्वता मिळविण्यात आहे. फुलाची कृतार्थता फुलण्यात, फळाची पिकण्यात आहे आणि माणसाची मानसिक समृद्धीने जगण्यात आहे. शेक्सपीअरची कविता वाचताना मनाला येणाऱ्या परिपक्वतेचा, मिळणाऱ्या समृद्धीचा आनंद सतत जाणवत राहतो. शेवटी ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूही आहे दोन येकांच्यामध्ये होणाऱ्या प्रवासाचे गुणात्मक मोजमाप हेच की जो जन्मला, तो (तसाच) मृत्यू पावला नाही. फुलाप्रमाणे त्याचा विकास झाला, फळाप्रमाणे तो पक्व झाला. थोडक्यात तो जगून मेला, किंग लिअरमधील शब्दांत : Men must endure Their going hence, Even as their coming hither, Ripeness is all. शेवटी सगळा उपदेश, सगळे धर्म, सगळी नीतितत्त्वे, सगळ्या बांधिलक्या ह्यांचे महत्त्व अस्तित्वाचे बोचके उतरताना नाहीसे होते. मग महत्त्वाचे काय ? Ripeness is all. सगळीच कविता मनाला समृद्ध करते, परिपक्वता देते, शेक्सपीअरची कविता ती परिपक्वता अधिक पूर्णपणे आणि सर्वांगाने देते आणि म्हणूनच ती कविता वाचल्यावर जीवनयात्रेची कृतार्थता जाणवते, गोएटेचे शब्द आठवतात : We learn nothing by reading great literature; but we become something. (एप्रिल १९९८, शेक्सपीअर विशेषांक) निवडक अंतर्नाद •२७१