पान:निवडक अंतर्नाद.pdf/२७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कालिदासाच्या नायिका लीला अर्जुनवाडकर प्रचंड मोठ्या अशा दुःखानेही खचून न जाता, गैरसमजाची दरी उद्भवू न देता, केवळ आपलेच दुःख कुरवाळणाऱ्या अपंगपणाचा स्पर्शही होऊ न देता या स्त्रिया आपल्या अबोल सत्त्वाच्या, उदार आणि व्यापक समंजसपणाच्या आधाराने आपले प्रेम टिकवतात. संस्कृतात 'काव्य' ही संज्ञा 'ललित वाड्मय' - मग ते गद्य असेल किंवा पद्य - या अर्थाने वापरली जाते. या काव्यप्रकारातले मोठा जीव असलेले प्रकार म्हणजे महाकाव्य, खंडकाव्य, रूपक (म्हणजे मराठी अर्थाने नाटक), कथा आणि आख्यायिका हे 'नायिका' म्हणजे त्यातील मध्यवर्ती स्त्री व्यक्तिरेखा, पण मध्यवर्ती स्त्रीव्यक्तिरेखा' हे शब्दही काहीशा मर्यादेतच अर्थाने घेतले पाहिजेत. याचे कारण असे की जुन्या संस्कृत काव्यातील कोणतीही कृती फक्त स्त्रीलाच मध्यवर्ती कल्पून लिहिलेली नाही. त्या कृतीच्या शीर्षकात त्या नायिकेचे नाव गुंफलेले असलेही जसे 'मालविकाग्निमित्र', 'विक्रमोर्वशीय', 'अभिज्ञानशाकुन्तल पण मुख्य कथेचा ओघ वाहतो तो नायकाच्याच अनुषंगाने बाणभट्टाच्या रचनेला नायिकेचेच, म्हणजे कादंबरीचे नाव आहे. पण मुख्य कथा आहे ती चंद्रापीडाची म्हणजे नायकाचीच. टॉमस हार्डीच्या 'टेस ऑफ दि डर्बरव्हिल्स' या प्रसिद्ध कादंबरीत जसे टेसलाच अथपासून इतिपर्यंत महत्त्व आहे, पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री' मध्ये जसे सावित्रीलाच सर्वोच्च महत्त्व आहे, तसे स्थान संस्कृत काव्यात नायिकेला दिलेले आढळत नाही. अपवादच सांगायचा झाला आणि तो अगदी सद्य: कालीन आहे तर तो अलीकडच्या काही वर्षांत प्रसिद्ध झालेल्या 'इन्दिराजीवनम्' आणि 'इंदिरागान्धीचरितम्' या इंदिरा गांधींच्या चरित्रावर आधारलेल्या महाकाव्यांचा. संस्कृत काव्यात मुख्य असतो तो नायकच, तोच 'फलस्वामी' असतो. जे मिळायचे असते ते मूलत: त्यालाच. नायिकेला स्वतंत्रपणे काहीच मिळायचे नसते. कथानकाची सारी बांधणी त्याच्याच अनुरोधाने झालेली असते. अवस्था, अर्थप्रकृती आणि संधी ही भरताने सांगितलेली नाटकाच्या कथारचनेची तत्त्वेदेखील नायकालाच समोर ठेवून सांगितलेली आहेत. नायिका नायकाचा आब राखून त्याच्या शेजारी, पण दोन पावले मागेच, उभी असते. एखादी 'साधारण' नायिका वगळली तर 'स्वीया नायिका स्वत: डोळे वर करून पाहणार नाही की तोंड उघडून बोलणार नाही. ते काम तिची सखी करील. कारण 'मितभाषणी तीच कुलकामिनी' या आदर्शाने या नायिकांचे जीवन घडवलेले आहे सीतादेखील सत्याय मितभाषिणी अशी आहे. तिने फक्त एकदाच तोंड उघडले - निर्वाणीचे अखेरचे शब्द उच्चारण्यासाठी एरवी धिटाईने वागणारी देवांगना उर्वशीदेखील चित्रलेखेकरवीच आपले मन राजापुढे मोकळे करते. मात्र एक खरे की नायकाशी अतिशय मोकळेपणाने, खेळीमेळीने वागण्याचे धाडस, शूद्रकाच्या वसंतसेनेप्रमाणे, उर्वशीच करू शकते. ती अभिसारिका बनते आणि हळूच मागून येऊन पुरूरव्याचे डोळे झाकते. मालविका किंवा शकुंतला हे धारिष्ट्य कधीही करू शकणार नाहीत. त्या कुलवंत स्त्रिया आहेत. रूढ रीतीची बंधने तोडून विपरीत वागण्याचा मोकळेपणा त्यांना नाही. याचे कारण या स्त्रिया ज्या समाजात जन्मल्या, वाढल्या, वावरल्या, ज्यात त्यांनी खूप काही भोगले, त्याची गरत्या स्त्रीकडून असणारी अपेक्षा या समाजात गणिकांना मिळालेले स्वातंत्र्य आणि मोकळेपणा गरत्या गृहिणीला कधीही मिळाला नव्हता, ती नेहमी विविध कर्तव्ये, कुलपरंपरा, रीतभात यांच्या बंधनात जखडलेलीच राहिली. त्याच्या जोडीला तिने शयनेषु रंभा असावे, हीही अपेक्षा सतत केली गेली. त्यात समाज पुरुषप्रधान आणि बहुपत्नीकत्वाची रूढी दृढमूल झालेला. त्यामुळे अंतः पुरात सवतीमत्सराचा खेळ आणि बाहरेच्या जगात गणिकांविषयी आकर्षण अशी अवस्था अपरिहार्यच झाली. कुलीन स्त्रीने स्पृहणीय असे 'गृहिणी' पद मिळवावे, टिकवावे, अगोचरपणाने वागून कुळाला बट्टा लावू नये. वीर पुत्रांना जन्म द्यावा. घरादाराची वडिलधाऱ्यांची नीट देखभाल करावी. नवरा रागावला, त्याने अपमान केला तरी त्याच्याच मनासारखे वागून, सवतींशी गोडीगुलाबीने राहून संसार फुलवावा साऱ्यांना सांभाळून घेऊन घराचे घरपण टिकवावे. या लक्ष्मणरेषेपलीकडे त्यांनी चुकूनही जाऊ नये, एवढीच या समाजाची कुलीन स्त्रीकडून अपेक्षा होती आणि ही बंधने म्हणजे आपली भूषणेच आहेत असे मानून या स्त्रियांनीही तो आदर्श जपला. त्याच्या बाहेर जाणाऱ्या स्त्रिया तशा क्वचितच भेटतात. निवडक अंतर्नाद २७३