पान:निवडक अंतर्नाद.pdf/२७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या मनातून जात नाही. दारुण दुःखाच्या अनुभवाने सीता आणि शकुंतला दोघींचीही विभूती अधिक विस्तारली आहे, समृद्ध झाली आहे. कालिदासाने आपल्या सर्व नायिकांच्या वेगवेगळ्या वयोवस्थांमधील देहसौंदर्याचे वर्णन अतिशय रसिक दृष्टीने केले आहे. या सौंदर्याचा सर्वांत देखणा नमुना म्हणजे मेघदूतातील यक्षपत्नी. तन्वी श्यामा शिखरिदशना पक्वबिम्बाधरोष्ठी मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्ननाभिः । श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्यां या तत्र स्याद् युवतिविषये सृष्टिराद्येव धातुः ॥ (कृशांगी, ऐनपणातली, कुंदकळ्यांसारखे दात असलेली, पिकल्या तोंडल्याप्रमाणे ओठ असलेली, कमरेत बारीक, बावरलेल्या हरिणीप्रमाणे नजर असलेली, नाभिप्रदेश खोल असलेली, नितंबभारामुळे मंदगती आणि स्तनांमुळे किंचित झुकलेली अशी - स्त्रीजातीमधली विधात्याची आद्य निर्मितीच.) मात्र आपल्या प्रत्येक नायिकेच्या सौंदर्याचे अवयवशः वेगळे असे ठाशीव व्यक्तिमत्त्व त्याने फारसे दाखवले नाही. पण त्याने रेखाटलेल्या स्त्रियांच्या चित्रांत खूप वेगवेगळ्या छटा आल्या आहेत. मुग्धत्व आणि यौवन यांच्या सीमेवर उभी असलेली मालविका त्यात आहे. दरड ढासळल्यामुळे जिचा प्रवाह गढूळ झाला पण जी आता पुन्हा निर्मळ होऊ लागली आहे अशा गंगेप्रमाणे भासणारी मूछेंतून बाहेर येणारी उर्वशी आहे. जिच्या देहावर गर्भाचे तेज पसरू लागले आहे अशी लतेव संनद्रमनोज़पल्लवा (जिच्यावर कोवळी सुंदर पालवी धरली आहे अशा लतेप्रमाणे असणारी ) सुदक्षिणा आहे दीपशिखेप्रमाणे झळझळीत लावण्याने डोळे दिपवून टाकणारी इंदुमती आहे. अनाघ्रात पुष्प, कोवळी लुसलुशीत लालसर पालवी, वेज न पाडलेले रत्न, ताजा कुणीही न आस्वादलेला मध आणि स पुण्याचा परिपाकच जणू असे रूप असणारी शकुंतला आहे. सर्व सौंदर्य एकत्रच पाहायला मिळावे म्हणून सर्व उपमाने एकत्र करून विधात्याने जिला घडवले ती उमा आहे आणि जी नजरेला पडावी म्हणून अयोध्येतल्या साऱ्या स्त्रिया दाटीवाटीने वाड्यांच्या खिडक्यांत उभ्या राहिल्या ती नूतनपरिणीता सीता आहे (एक सहज उलगडलेला तपशील सीता अखेरची अयोध्येत आली, तेव्हाही लोकांची गर्दी जमलेली होतीच, पण तिच्याकडे पाहण्याची कुणाची हिम्मत झाली नाही. आत दाणे भरल्यावर साळीच्या लोंब्या जशा खाली झुकतात, तशा साऱ्यांचा नजरा खाली झुकल्या. काषाय वस्त्र धारण केलेल्या, पायाकडे दृष्टी असलेल्या शांतमूर्ती सीतेला पाहून.) उमा, शकुंतला आणि सीता या कालिदासाच्या सर्वश्रेष्ठ अशा व्यक्तिरेखा, त्यांची निष्ठा, उदार क्षमाशीलता आणि तेजस्वी बाणा यांमुळे त्या उत्तुंग उंची गाठणाऱ्या व्यक्तिरेखा बनल्या आहेत. पुरुषप्रधान आणि स्त्रियांविषयी तुच्छतादर्शक निंदा करणारी भाषा वापरणाऱ्या समाजात राहूनही ('पंचतंत्रा'तील उल्लेख, भर्तृहरीचे श्लोक यांतील संदर्भ पाहावेत.) कालिदासाने स्त्रीचे चित्रण अतिशय सहानुभूतीने केले आहे. अपि स्वदेहात् किमुतेन्द्रियार्थाद् यशोधनानां हि यशो गरीय: (यशोधन लोकांना आपली कीर्ती स्वतःच्या देहापेक्षाही मोलाची वाटते; मग केवळ इंद्रियविषयाचा काय पाड़ ) किंवा अत्यारूढो हि नारीणामकालज्ञो मनोभव: (स्त्रियांचा प्रमाणाबाहेर गेलेला मदनविकार काळवेळ जाणत नाही.) हे चरण कालिदासाचे स्त्रीविषयक अनुद्गार म्हणून नेहमी उद्धृत केले जातात. पण प्राप्त संदर्भात या दोन्हीही उद्धरणांचे अर्थ वेगळ्या रीतीने लावता येतात व लावलेही पाहिजेत. कन्यापितृत्वं खलु नाम कष्टम् (मुलीचा बाप होणे म्हणजे दुःखच!) किंवा न वै स्त्रैणानि सख्यानि सन्ति सालावृकाणां हृदयानि एता (स्त्रियांबरोबर मैत्री होणे दुर्घटच; कारण त्या लांडग्यांच्या काळजाच्याच असतात.) ही धारणा पिढ्यान्पिढ्या जपणाऱ्या समाजात कालिदासाची स्त्रीविषयक सहानुभूती वेगळेपणाने उठून दिसते. गृहिणी सचिव: सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ असा टाहो फोडणाऱ्या अजाची आर्तता आणि पुढची दुरवस्था पाहिली तर स्त्रीचे केवढे महत्त्व कालिदासाने दाखवलेले आहे ते ध्यानी येईल. कन्याजन्मही पुत्रजन्माइतकाच आनंददायी असतो हे त्याने उमेचा जन्म आणि रघूचा जन्म या वेळच्या तुल्य वर्णनातून दाखवले आहे. 'बाई ग, तुझ्या शुद्ध आचरणाच्या पुण्याईनेच आमची मुले फार मोठ्या संकटातून तरली' असे म्हणणाऱ्या प्रेमळ सासवा त्याने दाखवल्या आहेत. शंभूलाही विवाह करावासा वाटला कारण सत्पत्नी हे सर्व धर्मक्रियांचे अधिष्ठान असते हे त्याला अरुंधतीमुळे कळले. किंबहुना, आपला विवाह ठरवण्याच्या बाबतीत अरुंधतीने पुढाकार घ्यावा, कारण अशा संदर्भात स्त्रियाच प्रगल्भ असतात, असेही त्याने स्पष्ट केले आहे. असे सारे संदर्भ लक्षात घेतले आणि कालिदासाच्या संपूर्ण स्त्रीसृष्टीचे अवलोकन केले तर असे निश्चित म्हणता येते की कालिदासाने स्त्रीचे मन अतिशय बारकाव्यांनिशी जाणले होते. तिच्या अनेकविध गुणदोषांची त्याला फार चांगली जाण होती. तिच्या सुखदु:खांविषयी त्याला मनापासून सहानुभूती होती. त्याची संविधानके जरी रूढ परिपाटीप्रमाणे नायकाला मध्यवर्ती स्थान देणारी ●असली तरी त्याच्या मुख्य नायिका त्याच्या काव्यग्रंथांचे आभाळ व्यापून राहिल्या आहेत. त्या वाचकांच्या मनात घर करून राहतात. (जुलै १९९९, कालिदास विशेषांक) निवडक अंतर्नाद २७७