पान:निवडक अंतर्नाद.pdf/२७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कालिदास विशेषांकामागची संपादकीय भूमिका आषाढचा पहिला दिवस ( यंदा १३ जुलै) हा 'महाकवी कालिदास दिन' म्हणून साजरा होतो. त्या निमित्ताने 'अंतर्नाद' चा हा जुलै अंक 'कालिदास विशेषांक' म्हणून वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे. कालिदासाच्या व्यक्तिगत जीवनाचे संदर्भ निर्विवादपणे सांगणारा दस्तऐवज उपलब्ध नाही. त्याचे चित्रही अस्तित्वात नाही. त्याच्या लेखनावरूनच त्याच्या व्यक्तित्वाचा अंदाज करता येतो. अर्थात ह्या संदिग्धतेमुळे कालिदासाच्या वाड्मयीन महात्मतेला कुठल्याही प्रकारे उणेपण येत नाही. किंबहुना कालिदास हा भारतीय साहित्यकारांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले तर बहुधा ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मरणं प्रकृतिः शरीरिणाम्, शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्, किमिव हि मधुराणां मण्डनं नाकृतीनाम्, अतिस्नेह: पापशंकी यांसारखी त्याची वचने सर्वच भारतीय भाषांनी शतकानुशतके अलंकार म्हणून मिरवली आहेत. शकुंतला, सीता आणि उमा यांच्या रूपाने भारतीय स्त्रीत्वाचे आदर्शच कालिदासाने साकार केले आहेत. मुग्ध प्रणय, अनुनय, पूर्तता, दीर्घ विरह आणि चिरमिलन या प्रेमाच्या विविध अवस्था चितारणाऱ्या 'शाकुंतल चा उल्लेख 'काव्येषु नाटकं रम्यं तत्रापि च शकुंतला' असा केला जातो. शृंगाररसाचा सम्राट मानला गेलेल्या कालिदासाने 'मेघदूता' त निसर्गसौंदर्याचाही सर्वोत्तम आविष्कार केला आहे. कालिदासाविषयी श्रेष्ठ जर्मन विचारवंत प्रो. मॅक्स मुल्लर लिहितात, “Rarely has a man walked our earth who observed the phenomena of living nature as accurately as he did, though his accuracy was of course that of a poet and not that of a scientist.” अंत: पुरातील गुजगोष्टींपासून हिमालयाच्या उत्तुंग शिखरांपर्यंत कुठेही कालिदासाची लेखणी लीलया संचार करते. भोग व त्याग, शृंगार व वैराग्य, काम व मोक्ष यांचा सुरेख समन्वय कालिदास साधतो. डॉ. के. ना. वाटवे यांनी म्हटल्याप्रमाणे वाल्मीकीच्या नीतीला आणि व्यासाच्या बुद्धीला कालिदासाने सौंदर्याची जोड दिली. व्यासाने सत्य, वाल्मीकीने शिव, तर कालिदासाने सौंदर्य यांची प्रचीती प्रामुख्याने दिली. व्यास, वाल्मीकी आणि कालिदास यांच्यात भारतीय संस्कृतीचे सार साठवलेले आहे असे महर्षी अरविंद म्हणत ते याचसाठी. हे सगळे असूनही साहित्यप्रेमींच्या आजच्या पिढीला कालिदासाचा म्हणावा तितका परिचय नाही. एखाद्या मराठी नियतकालिकाने 'कालिदास विशेषांक' काढायचा हा कदाचित पहिलाच प्रयत्न असावा. कालिदासाची थोरवी वाचकांपुढे पुनश्च आणणे या व्यतिरिक्त हा 'कालिदास विशेषांक' काढण्याचे दुसरेही एक कारण आहे ते २७८ निवडक अंतर्नाद म्हणजे राजकीय अस्थिरतेच्या व विघटनवादी प्रवृत्तींच्या वाढीच्या या काळात भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेचे एक प्रतीक म्हणून कालिदास महत्त्वपूर्ण आहे भारताच्या बहुतांश भागांची वर्णने त्याच्या साहित्यात आढळतात. भारतीय संस्कृतीचे म्हणून जे आदर्श आहेत, ते कालिदासाने अभिव्यक्त केले आहेत व म्हणूनच केरळपासून काश्मिरपर्यंत सर्वांनाच कालिदास पूज्य वाटतो, 'आपला' वाटतो. ह्य विशेषांक काढण्यामागे संस्कृत भाषेकडे जाणकारांचे लक्ष वेधावे हाही 'अंतर्नाद' चा एक उद्देश आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा इस्राएलचा पुनर्जन्म झाला, तेव्हा ठिकठिकाणचे ज्यू तिथे परतले आणि त्यांनी जवळपास मृतप्राय झालेल्या त्यांच्या हिब्रू भाषेचे पुनरुज्जीवन केले. आज इस्राएलमधले सर्व व्यवहार हिब्रू भाषेत चालतात. आपणही संस्कृतचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. भारत जगाला देऊ शकेल अशा आयुर्वेदासारख्या आपल्या संचिताच्या अनेक भांडारांची संस्कृत ही किल्ली आहे. नवीन शब्द निर्माण करायची संस्कृत भाषेची अनन्यसाधारण क्षमता हा सर्वच भारतीय भाषांचा मोठा आधार आहे. कॉम्प्युटरला संगणक किंवा प्रोग्रॅमला आज्ञावली यांसारखे सुरेख प्रतिशब्द संस्कृतमधूनच आपण निर्माण करू शकतो. संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही नमूद केले होते. जगातल्या अनेक विद्यापीठांत आजही संस्कृतचे अध्ययन चालते, ही बाब लक्षणीय आहे अनेकांच्या सहकार्यातून हा विशेषांक साकार झाला आहे. सर्वप्रथम उल्लेख करायला हवा तो कॅप्टन माधव व सौ. अनुराधा चिन्मुळगंद या साहित्यप्रेमी दांपत्याचा, या 'कालिदास विशेषांका' ची आखणी करण्यासाठीची पहिली बैठक त्यांच्याच घरी जून १९९८ मध्ये झाली. ह्या आखणीत डॉ. अशोक केळकर यांचीही महत्वाची मदत मिळाली. वसंत बापट, सरोजा भाटे, स. ह. देशपांडे, विमला जोशी, शान्ता शेळके, लीला अर्जुनवाडकर, मृणालिनी गडकरी आणि चंद्रकांत बांदिवडेकर या सर्व ज्येष्ठ लेखकांनी विहित मुदतीमध्ये आपापले लेख दिले. केवळ 'अंतर्नाद' विषयीच्या आपुलकीतूनच त्यांनी हे कष्ट घेतले. 'कालिदासकालीन सामाजिक-सांस्कृतिक जीवन' हा पूर्वनियोजित लेख केवळ अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारपणामुळे प्रा. राम शेवाळकर देऊ शकले नाहीत, याचे वाईट वाटते, प्रा. यास्मिन शेख यांनी अंकातील सर्व लेख शुद्धलेखनाच्या दृष्टीने काळजीपूर्वक तपासून दिले. धनंजय सस्तकर यांनी अंकासाठी अतिशय कल्पक असे मुखपृष्ठ तयार करून दिले. या सर्वांविषयी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो, अंकात काही चांगले असेल तर त्याचे श्रेय याच सर्वांना आहे (जुलै १९९९, कालिदास विशेषांक)