पान:निवडक अंतर्नाद.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर तिचे जुळती... विजया देव “दगडांच्या राशीजवळ ती आली आणि पटकन खाली वाकून दगडाला स्पर्श करून तिनं तो हात कपाळाला लावला. बाजूचा हातोडा उचलला आणि पहिला घाव त्या दगडावर घातला. " कधी कधी, मन हेलावून टाकणारी दृश्यं अगदी अनपेक्षितपणे, सहज जाता जाता नजरेला पडतात. अनाहूतपणे आपल्या समोर घडून जाणारं काहीतरी इतकं साधंसुधं असतं की, त्या साधेपणापुढे झगमगत्या दुनियेचा कोलाहल फिका पडतो. एक दिवस सकाळी टेकडीवरून फिरून परत येत होते. पहाटेचा गारवा आणि ताजेपणा यांची शिंपण अजून आसमंतात होती. घरच्या वाटेवर नेहमीची दृश्यं दिसत होती. दूधवाला, पेपरवाला, शाळेची मुलं, फिरायला निघालेले कुणी, कुणी आपल्या घराच्या सज्जात चहाचा आस्वाद घेणारे झाडांच्या शेंड्यांवर पाखरांची लगबग आणि वेलीवर डोलणारी रंगीबेरंगी फुलं.... गल्लीच्या एका बाजूला एका बंगल्याबाहेर दगडांच्या एक-दोन राशी पडलेल्या दिसल्या बांधकामाच्या साहित्याचे ढीग, खणलेला रस्ता, विखुरलेला कचरा या गोष्टी बोगन वेलीच्या सुक्या पाकळ्यांची पखरण किंवा पारिजातकाचा सडा यांच्यासमवेत गुण्यागोविंदानं नांदत असतात. आजच तिथे आलेली ती दगडांची रास मी पाहिली आणि ह्या बंगल्याच्या कुंपणभिंतीचं काम चाललेलं दिसतंय, असं मनात आलं. तेवढ्यात समोरून एक कामकरी बाई आली, घोळदार लेहंगा आणि आरसे लावलेली गडद ओढणी असा तिचा पेहराव, दगडांच्या राशीजवळ ती आली आणि पटकन खाली वाकून दगडाला स्पर्श करून तिनं तो हात कपाळाला लावला. बाजूचा हातोडा उचलला आणि पहिला घाव त्या दगडावर घातला. माझ्या लेखी तो दगडांचा ढीग रस्ता अडवणारा एक अडथळा होता. ती दगडांची रास हे तिचं चरितार्थाचं साधन होतं. तिचा उदरनिर्वाह त्यातून चालणार होता, आणि तो चालवायचा तर त्या दगडावर हत्यार चालवणं, पुरेशा ताकदीनं तो फोडणं तिला भाग होतं. त्याला इजा करूनच तिच्या पोटाची खळगी भरणार होती. तो पडणे पडून होता, त्यावर आघात करून त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय तिचा चरितार्थ चालणार नव्हता. म्हणून ती क्षमायाचना करत होती का? - उदरनिर्वाहाच्या साधनाबद्दलची ती कृतज्ञता तर होतीच, पण दणकट हत्याराचे कठोर घाव घालण्यापूर्वी त्या दगडाला ती सहकार्य करायला विनवत होती का? रंगदेवतेला वंदन करणारे रंगकर्मी, कारखान्यातल्या यंत्राला नमस्कार करणारा मजूर, देवळाच्या पायरीला हात लावून तो मस्तकी नेणारा भाविक आणि दगडाला नमस्कार करणारी ही बाई यांच्यातून एक परंपरा वाहत होती, रस्त्यावरून वाहनं येत जात होती. रिक्षांमधून, गाड्यांमधून, पायी शाळेत निघालेली मुलं हा तिचा वर्तमानकाळ नव्हता. एकमेकांना आधार देत फिरायला निघालेलं वयस्क दांपत्य हा तिचा भविष्यकाळ नव्हता. फिरून घरी गेल्यावर मिळणार असलेला ताज्या दुधाचा चहा आणि दाराशी आलेला पेपर हे तिचं वास्तव नव्हतं. मुळात जे दगड ती फोडत होती, त्या दगडाच्या भिंतींचा आधार तिच्या छपराला नव्हताच रस्त्यावरचं आयुष्य, मुकादम म्हणेल तिथे काम आणि पदरी पडेल तो दाम, यासाठी ती कष्टत होती. तरी उपजीविकेच्या साधनाबद्दल एवढा विनम्र भाव तिच्यात कोठून आला? ठक्ठक् आवाज घुमत होता. कोवळं पिवळं ऊन पसरलेलं होतं. (जानेवारी २००२) mach निवडक अंतर्नाद २७