पान:निवडक अंतर्नाद.pdf/२८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र श्रीपाद जोशी रवींद्रनाथांनी 'शिवाजी - उत्सव ही १८ कडव्यांची दीर्घ, प्रसादपूर्ण कविता बंगालीत लिहिली. इतकेच नव्हे तर कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये त्यांनी ती स्वतः वाचूनही दाखवली. असे सांगतात, की सदर कवितेचे मराठी भाषांतर वाचल्यावर लोकमान्य टिळकांनी रवींद्रनाथांना लिहिले, “तुमचे हे काव्य बंगाल व महाराष्ट्र यांचे मिलन युद्धाशिवाय घडवून आणील, यात मुळीच शंका नाही. " विश्वकवी रवींद्रनाथ ठाकूर (टागोर), थोर चिंतक खलील जिब्रान आणि उर्दूचे महाकवी इकबाल, हे गेली ५० वर्षे माझ्या अभ्यासाचे विषय राहिले आहेत. या तिन्ही महाकवींच्या अभ्यासाची प्रेरणा आचार्य स. ज. भागवत यांच्याकडून मला मिळाली; आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने मी या तिघांविषयी मराठी, हिंदी व उर्दू या तीन भाषांत पुष्कळ लिखाण केले. त्यापैकी बरेचसे पुस्तकरूपाने प्रकाशितही झाले. रवींद्रनाथांच्या जन्मशताब्दीच्या वेळी आचार्यांच्या प्रेरणेनेच मी रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र हे १९० पृष्ठांचे एक संकलन तयार केले होते व ते 'महाराष्ट्र राज्य रवींद्रनाथ जन्मशताब्दी समिती चे पहिले प्रकाशन म्हणून १९६१ साली प्रसिद्धही झाले होते. या गोष्टीला ४० वर्षे होऊन गेली, आता ते पुस्तक अप्राप्य (दुर्मिळ ) झाले आहे. ते वाचलेल्या वाचकांच्या स्मरणातही ते आता राहिले नसावे. नव्या पिढीला तर त्याची माहितीही असण्याची शक्यता फारशी नाही. म्हणून अंतर्नादच्या नव्या दमाच्या वाचकांसाठी त्याच पुस्तकाच्या आधाराने हा लेख लिहिला आहे. चार कविता रवींद्रनाथांच्या काही हजार कवितांतून महाराष्ट्रविषयक कविता शोधून काढणे तसे अवघड होते. परंतु चिकाटी असेल आणि आपण करीत असलेल्या कामात अद्भुत आनंद मिळत असेल तेव्हा त्यातला अवघडपणा नाहीसा होतो, हा माझा अनुभव या बाबतीतही खरा ठरला आणि मला त्यांच्या अशा चार कविता सापडल्या. त्यांपैकी 'प्रतिनिधी', 'सती' व 'विचारक' या तीन काव्यकथा असून त्यांपैकी 'प्रतिनिधी' ही कविता 'मराठ्यांची संग्रामगीते' (Ballads of The Maratha) या शीर्षकाने एच. ए अॅक्वर्थ साहेबांनी संकलित केलेल्या ग्रंथातील शिवाजी व रामदास यांच्या भेटीवर आधारलेल्या ऐतिहासिक घटनेवर (की दंतकथेवर?) आधारलेली आहे. ( एका दृष्टीने या चारही कथाकविता अॅक्व साहेबांच्या लिखाणावर आधारित आहेत.) या भेटीत ऐतिहासिकदृष्ट्या किती तथ्य आहे, हे इतिहासकारच सांगू शकतील. या बाबतीत इतिहासकारांमध्ये किती तीव्र व मूलभूत स्वरूपाचे मतभेद आहेत, याची कल्पना जिज्ञासू वाचकांना असलेच. ते कसेही असले तरी रवींद्रनाथाची ही कविता नाट्यगुणांनी परिपूर्ण असून रसिक वाचक तिच्यातील कल्पनारम्य (रोमँटिक) संवाद व वातावरण यांचा रसास्वाद घेऊन खूष होतात. एखाद्या काव्यकथेत नाट्यमयता व कल्पनारम्यता यांच्याबरोबरच मानवी जीवनातील एखादे उच्च तत्त्व गुंफणे ही रवींद्रनाथांची विशेषता या कवितेतही आहे. त्यामुळे ही साधी दंतकथा न राहता एक संदेशकविता बनते. दुसरी कविता 'सती' हीदेखील १८१४ साली 'लाँगमन्स ग्रीन्स आणि कंपनी ने प्रकाशित केलेल्या अॅववर्थ साहेबांच्या Ballads of The Maratha या पुस्तकातील The Story of A Sanyasee ( एका संन्याशाची कहाणी) या शीर्षकाच्या कथेवर आधारलेली आहे. ही कविता मूळ एकाच पोवाड्यावर आधारित नसून अनेक पोवाड्यांतील घटनांचे संकलन तिच्यात झाले आहे मात्र या कवितेतील घटनेचे 'सती'च्या मूळ कथेशी खूपच साम्य आहे रवींद्रनाथांची स्त्रीविषयक सहानुभूतीची भूमिका या कवितेत स्पष्ट दृगोच्चर होते. वस्तुतः हे एक संवाद-गीतच आहे. तिला छोटी संगीतिका असेही म्हणता येते. अमाबाई (उमाबाई) या विवाहवेदीवर उभ्या असलेल्या वधूला एक यवन पळवून नेतो आणि तिच्याशी लग्न करून चांगला संसार करतो. तीही त्या संसारात रमते. तिला एक मुलगाही होतो. कालांतराने, ज्याच्याशी तिचे मुळात लग्न होणार होते तो जिवाजी या यवनावर स्वारी करून त्याला ठार मारतो. त्या लढाईत जिवाजीही मारला जातो. आता अमाबाईने जिवाजीच्या प्रेताबरोबर स्वत:ला जाळून घेऊन सती व्हावे, यासाठी तिचा बाप विनायकराव तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण ती आपले घरटे मोडून, मुलाला अनाथ बनवून, परपुरुषासाठी सती जाण्यास तयार होत नाही. विनायकरावाला तिची भूमिका पटते. तो तिला सोडून देण्यास तयार होतो. पण तिची आई रमाबाई अत्यंत करारीपणाने तिला जिवाजीच्या सरणावर सती जाण्यास भाग पाडते, अशी ही कथा आहे. या कवितेतील संवादात खरा धर्म, हृदयाचा धर्म म्हणजे काय याची सुंदर मूलग्राही चर्चा रवींद्रनाथांनी केली निवडक अंतर्नाद २७९