पान:निवडक अंतर्नाद.pdf/२८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. तिच्यामुळे ही साधी कविता अत्यंत उच्च अशा कलात्मक पातळीवर जाऊन पोचते. तिसरी कविता 'विचारक (न्यायाधीश) ही पेशव्यांचे सरन्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी रघुनाथराव ( राघोबादादा ) पेशव्याला त्याच्या पुतण्या नारायणराव याच्या खुनाबद्दल देहांताची शिक्षा सुनावली, या घटनेवर आधारलेली आहे. कवितेच्या शेवटी शास्त्रीबुवा म्हणतात, "मी हा न्यायदंड टाकून दिला आणि आपल्या गावी परत चाललो. इथलं न्यायालय हे पोरखेळाचं घर बनलंय. तिथं मी यापुढं आणखी गुंतून राहणार नाही..." त्या दीन-दरिद्री ब्राह्मणाने आपले गौरवपद सोडून दिले. सारी संपत्ती दूर फेकून दिली आणि खेड्यातल्या आपल्या पर्णकुटीत तो परत निघून गेला. ही कविता वाचताना आपल्या डोळ्यांसमोर आजच्या लाचार व लोभी न्यायाधीशांचे उद्वेगजनक चित्र नकळत उभे राहून जाते. चौथी कविता 'शिवाजी उत्सव १९०४ साली लिहिलेली १५० पंक्तींची (चरणांची) ही दीर्घ, प्रसादपूर्ण कविता कोणत्याही अन्य भाषेत लिहिल्या गेलेल्या शिवाजीविषयक कवितांमध्ये सर्वश्रेष्ठ समजली जाते. मराठी भाषकांनी तिची फारशी दखल घेतल्याचे दिसत नाही. त्याचे कारण बहुधा हे असावे की ज्या उच्च पातळीवरून रवींद्रनाथांनी शिवाजी महाराजांच्या वैशिष्ट्यपूर्ण श्रेष्ठत्वाचे रसग्रहणात्मक मूल्यमापन केले आहे, त्याचे आकलन स्थूलत्वाची, बटबटीतपणाची आवड असणाऱ्या मराठी मनाला झाले नाही. त्या आणि त्यानंतरच्याही काळात अनेक बंगाल्यांच्या जिभेवर ती कविता होती. अगदी अलीकडच्या काळातही ती संपूर्ण कविता तोंडपाठ म्हणून दाखविणारे बंगाली लोक मला भेटले आहेत. या कवितेचा इतिहासही मोठा उद्द्बोधक आहे. लोकमान्य टिळकांनी १८९७ साली देशभक्तीच्या भावनेचा प्रचार करण्याच्या उद्देशाने शिवाजी उत्सव सुरू केला, कै. सखाराम गणेश देउसकर (१८६९-१९१६) या महाराष्ट्रीय गृहस्थांनी या उत्सवाचे लोण बंगालमध्ये नेऊन पोचवले. एक श्रेष्ठ दर्जाचे पत्रकार व स्वदेशाभिमानी साहित्यिक म्हणून आजही श्री देउसकर यांची बंगालमध्ये ख्याती आहे. 'देशेर कथा' हा त्यांचा ग्रंथ जहाल राष्ट्रवादी बंगाल्यांचा स्फूर्तिग्रंथ बनला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे १९०४ साली कलकत्त्यात शिवाजी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ शकला. त्यांच्याच विनंतीवरून रवींद्रनाथांनी 'शिवाजी - उत्सव' ही १८ कडव्यांची दीर्घ, प्रसादपूर्ण कविता बंगालीत लिहिली. इतकेच नव्हे तर कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये त्यांनी ती स्वत: वाचूनही दाखवली असे सांगतात, की सदर कवितेचे मराठी भाषांतर वाचल्यावर लोकमान्य टिळकांनी रवींद्रनाथांना लिहिले, "तुमचे हे काव्य बंगाल व महाराष्ट्र यांचे मिलन युद्धाशिवाय घडवून आणील, यात मुळीच शंका नाही. " लोकमान्यांच्या या उद्गारांतील 'युद्धाशिवाय' हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण गुरुदेवांच्या या काव्यात त्यांनी असे म्हटले होते की, "गेल्या तीन शतकांपासून कोणाच्या मनात असा विचारही आला नाही, स्वप्नातही कोणाला कळले नाही, की तुझे २८० निवडक अंतर्नाद नाव बंगाल महाराष्ट्राला युद्धाशिवाय एकत्र करील..." त्यांच्या या विचाराला लोकमान्यांनी दिलेला तो प्रतिसाद होता. ही संपूर्ण कविता रवींद्रनाथांनी शिवाजी महाराजांना संबोधून लिहिली आहे. तिच्या कडव्या कडव्यात त्यांनी शिवाजीसाठी जी संबोधने वापरली आहेत, त्यातून रवींद्रनाथांची प्रतिभा आणि भक्ती या गोष्टी सजीवपणे व्यक्त होतात. ती संबोधने अशी : हे राजा शिवाजी, हे विचारवंता, हे वीर मराठ्या, हे राजतपस्वी वीरा, हे राजसंन्याशा, हे अशरीरी तापसा, हे स्वामी, हे धर्मराजा, हे अमरमूर्ती, हे राजन... या कवितेच्या पहिल्या कडव्यात विश्वकवी म्हणतात, "हे • राजा शिवाजी, कोण जाणे कोणत्या दूरच्या शतकाच्या, कोणत्या एका अप्रसिद्ध दिवशी, महाराष्ट्राच्या कोणत्या शैलावर, अरण्याच्या अंधकारात बसून 'छिन्नविच्छिन्न झालेल्या, विस्कटलेल्या भारताला मी एका धर्मराज्याच्या बंधनात बांधून टाकीन ही भावना तुझे भाल प्रकाशित करून विद्युत्-प्रभेप्रमाणे अवतरली होती. " दुसऱ्या कडव्यात ते म्हणतात, "त्या दिवशी हा बंगदेश चमकून झोपेत जागा झाला नाही. त्याला तो संदेश मिळाला नाही. तो धावून बाहेर आला नाही. त्याच्या प्रांगणामध्ये शुभ शंखनाद दुमदुमला नाही. शेकडो ग्रामवासीयांची दले शांतमुखाने आपले कोमल, निर्मल, श्यामल उत्तरीय पांघरून पेंगुळलेल्या संध्येला छातीशी धरून राहिली. " शेवटच्या दोन कडव्यांत ते म्हणतात, "त्या दिवशी आम्ही तुझे सांगणे ऐकले नाही. आता आम्ही तुझा आदेश शिरोधार्य मानू. तुझ्या ध्यानमंत्राने भारतातील सारे प्रदेश एकमेकांना स्नेहालिंगन देतील, बैराग्याच्या उत्तरीयाची ध्वजा बनवून आम्ही ती फडकवू. तेच आम्हा दरिद्र्यांचे सामर्थ्य! 'या भारतात एक-धर्म- राज्य होईल!' या महावचनाला आम्ही आमचे धन बनवू हे बंगालवासीयांनो! आज मराठ्यांच्याबरोबर एक स्वराने म्हणा, शिवाजीचा जय असो !" या कवितेतील 'एक-धर्म- राज्य' या शब्दसमूहाच्या खऱ्या अर्थाचे आजच्या दूषित वातावरणात वाढलेल्या वाचकांना कदाचित नीट आकलन होणार नाही. हाच अर्थ व्यक्त करणारा 'रामराज्य' हा शब्द गांधीजींनी वापरला होता. त्याचा खरा अर्थ न समजल्यामुळे देशात व जगात खूपच गैरसमज पसरला. खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या दारूची झिंग चढलेले आजचे तथाकथित पुरोगामी व बुद्धिप्रामाण्यवादी लोक रवींद्रनाथांच्या 'धर्मराज्य' या शब्दाचा व्यापक अर्थ समजण्याची कुवत नसल्यामुळे, लाल फडके पाहताच बुजून उधळणाऱ्या खोंडाप्रमाणे, त्यांना छुपे हिंदुत्ववादी व क्षुद्र जातीयवादी ठरविण्यास क्षणाचाही विलंब लावणार नाहीत. पण त्याला इलाज नाही. रवींद्रनाथ हे 'हे विश्वचि माझे घर' मानणारे, विश्वभारतीचे पुरस्कर्ते व सच्चे मानवतावादी होते, याची कल्पना असणाऱ्यांचा मात्र तसा काही गैरसमज होण्याची मुळीच शक्यता नाही. वस्तुतः धर्म आणि संप्रदाय या शब्दांतील फरक न कळल्यामुळे जगभर पसरलेल्या गैरसमजाचाच तो परिणाम आहे ते कसेही असले तरी या कवितेच्या संदर्भात एक गोष्ट सहज