पान:निवडक अंतर्नाद.pdf/२८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रवींद्रनाथ विशेषांकामागची संपादकीय भूमिका अंतर्नादने एप्रिल ९८मध्ये 'शेक्सपिअर विशेषांक' व जुलै ९९मध्ये 'कालिदास विशेषांक प्रसिद्ध केला होता, या दोन्ही विशेषांकांचे वाचकांनी चांगले स्वागत केले होते. २००० मध्ये एखाद्या अर्वाचीन भारतीय साहित्यिकावर विशेषांक काढावा असे ठरले, त्यावेळी सर्वप्रथम रवींद्रनाथ ठाकूर यांचेच नाव डोळ्यांपुढे आले. एक गीतकार, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वचिंतक, देशभक्त अशा विविध भूमिकांतून रवींद्रनाथांनी इतिहासावर आपला ठसा उमटवला आहे. नोबेल पुरस्कार मिळवणारी ही केवळ पहिली भारतीय व्यक्ती नव्हे, हा पुरस्कार मिळवणारी ही पहिली युरोपबाहेरील व्यक्ती, जन गण मन आणि आमार शोनार बांगला ही गीते लिहून या एकाच कवीने भारत व बांगलादेश या दोन देशांना आपापली राष्ट्रगीते दिली. हाही एक विरळाच पराक्रम, महाराष्ट्राबद्दल त्यांना विशेष आस्था होती. पण असे असूनही सर्वसामान्य मराठी माणसाला 'गीतांजली' पलीकडे रवींद्रनाथांचा फारसा परिचय नाही याची खंत वाटते. दुसरे समकालीन श्रेष्ठ बंगाली साहित्यिक शरच्चंद्र चटर्जी हे त्या मानाने मराठी वाचकांना जास्त परिचित याचे श्रेय मामा वरेरकरांसारख्यांनी केलेले शरदबाबूंच्या कादंबऱ्यांचे अनुवाद, 'देवदास' सारखे चित्रपट वा 'श्रीकांत सारख्या टीव्ही मालिका यांना द्यावे लागेल, रवींद्रनाथांवर एखाद्या मराठी नियतकालिकाने विशेषांक काढायचा अलीकडच्या काळातील हा बहुधा पहिलाच प्रयत्न असावा. व्यक्तिश: मला सर्वांत भावणारा रवींद्रनाथांचा विशेष म्हणजे त्यांचे सौंदर्यपूजन, सत्यम् - शिवम्-सुंदरम् ह्य भारतीय संस्कृतीचा आदर्श मानला जातो, परंतु या तिघांतील सत्यम् व शिवम् यांच्यावरच बहुतेक भारतीय महापुरुषांनी जास्त भर दिला आहे व सुंदरम्‌कडे तसे दुर्लक्षच केले आहे असे खूपदा वाटते. आपली शहरे, बागा, रस्ते, नद्या, देवळे, तीर्थक्षेत्रे अशा सर्वच ठिकाणी सुंदरम्कडे दुर्लक्ष होत आहे असे वाटते. पुरुषोत्तम दास टंडन यांनी खजुराहो, कोणार्क व पुरी येथील मंदिरांतील कामोत्तेजक चित्रे व मूर्ती गाडून टाकाव्यात, असा प्रस्ताव स्वातंत्र्यपूर्वकाळात मांडला होता. महात्मा गांधींनीही या प्रस्तावाला पाठिंबाच दिला होता. विरोध करणाऱ्यांमध्ये सर्वांत आघाडीवर होते ते रवींद्रनाथ, त्यांच्याच विरोधामुळे शेवटी हा प्रस्ताव बारगळला. रवींद्रनाथांचे सौंदर्यप्रेम त्यांचे अवघे जीवन भारून टाकणारे होते. ते परिधान करत असलेली सोनेरी-अंजिरी- नारिंगी वस्त्रे, उंची शाली, मखमली येप्या यांतून ती सौंदर्यदृष्टीच दिसते. एरवी ऋषितुल्य वाटणाऱ्या रवींद्रनाथांना चॉकलेट, च्युईंगगम खूप आवडायचे. आइस्क्रिमदेखील. उन्हाळ्याच्या दिवसांत कधीकधी एकाच दिवसात ते आठ दहा आंबेही फस्त करत, कसेतरी जगणे रवींद्रनाथांना मंजूर नव्हते. जीवनातील सर्व प्रकारच्या सौंदर्याचे ते उपासक होते. याला स्त्रीसौंदर्याचाही अपवाद नव्हता. रवींद्रनाथांची पिढीजाद जमीनदारी दार्जिलिंगपासून दूर नव्हती. गंगेइतकेच हिमालयाच्या उत्तुंग शिखरांचेही त्यांना आकर्षण होते. दार्जिलिंग-कालिमपाँग परिसरात ते खूपदा घोड्यावरून फिरत. सत्यजित राय यांनी कांचनजंगा हा त्यांचा चित्रपट रवींद्रनाथांच्याच एका कथेवर बनवला या चित्रपटात दार्जिलिंग परिसरात फिरायला आलेला एक गरीब तरुण स्थानिक जमीनदाराच्या मुलीच्या प्रेमात पडतो व लग्नाचा प्रस्ताव घेऊन जमीनदाराच्या भव्य हवेलीवर जातो. "तू कुठे, आम्ही कुठे? ही हिंमत तू केलीसच कशी?" - संतापलेला जमीनदार त्याच्यावर गरजतो. तो तरुण शांतपणे उत्तरतो, "सर, मला ठाऊक आहे, की मी एक अगदी सामान्य तरुण आहे. पण कसं कोण जाणे, या उत्तुंग शिखरांच्या सहवासात मीही कोणीतरी आहे असं मला वाटून गेलं.” निसर्गाच्या सहवासात होणाऱ्या मानवी मनाच्या उन्नयनाचा हा एक सुरेख दाखला सौंदर्यप्रेमाचीच एक अभिव्यक्ती, रवींद्रनाथ अतिशय देखणे होते आणि वाढत्या वयाबरोबर त्यांचे सौंदर्य वृद्धिंगतच होत गेले. एकदा एका विवाहसमारंभात रवींद्रनाथ आणि शरदबाबू हजर होते. त्यांचे वर्णन करताना एका पत्रात शरदबाबूंनी लिहिले आहे, "फार काळानंतर परवा मी रवींद्रनाथांना पाहिलं. डोळे दूर करावेसे वाटेनात, वय वाढतंय तसं त्यांचं रूप जणू उमलतंय. जगात याहून विलक्षण नवल मला तरी माहीत नाही.” त्यावेळी रवींद्रनाथ ६६ वर्षांचे होते! आचार्य रजनीश यांनी त्यांच्या व्याख्यानात एकदा महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ यांच्या एका भेटीची कहाणी सांगितली होती. तसा दोघांनाही एकमेकांविषयी आदर असे म्हणतात, की महात्मा ही उपाधी गांधींना प्रथम रवींद्रनाथांनी दिली; तर रवींद्रनाथांना गुरुदेव ही उपाधी प्रथम गांधींनी दिली. पण गांधी मुख्यतः सत्यम्- शिवमचे उपासक तर रवींद्रनाथ मुख्यतः सुंदरम्चे उपासक, गांधीजी एकदा रवींद्रनाथांकडे राहायला गेले होते. संध्याकाळी फिरण्याचा रिवाज गांधीजी अगदी नियमितपणे, शिस्तीने पाळत, आपली वेळ होताच गांधीजी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडत होते. "मीही येतो," असे म्हणत आरशासमोर उभे राहून रवींद्रनाथ केस विंचरू लागले. पाच मिनिटे गेली, दहा गेली, पंधरा गेली तरी त्यांची तयारी उरकेना. इकडे उशीर होतो म्हणून गांधीजी कमालीचे अस्वस्थ झाले होते. शेवटी एकदाचे दोघे बाहेर पडले. "आता या वयात कोण तुमच्याकडे बघणार आहे? एवढा सगळा जामानिमा करायची गरज काय?" वैतागलेल्या गांधींजींनी विचारले. "मी कुरूप दिसलो, तर मला बघणाऱ्याच्या मनाला वेदना होतील, सुंदर दिसलो तर त्याला आनंद होईल. माझ्या दृष्टीने कुरूपता ही हिंसा आहे, सुंदरता ही अहिंसा," रवींद्रनाथ उत्तरले, सुंदरता आणि अहिंसा यांचा हा आगळा संबंध अहिंसेचा आजन्म पुरस्कार करणाऱ्या गांधीजींनी प्रथमच ऐकला असावा! आपल्या भोवतालच्या कुरूप वा केवळ उपयुक्ततावादी अशा कळाहीन वास्तवाच्या पार्श्वभूमीवर रवींद्रनाथांचे हे सौंदर्यप्रेम खूप लोभस वाटते. (मे २००० ) निवडक अंतर्नाद २८३