पान:निवडक अंतर्नाद.pdf/२८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अत्यंत गौण स्थान होतं. एक कसलंतरी रंगीत विशेषतः एखाद्या कमनीय तरुणीचं चित्र असलं की बस एवढंच त्याचं काम ही धारणा अगदी पंचवीस-तीस वर्षांपूर्वी होती. लेखक, प्रकाशक आणि चित्रकार या तिघांनाही त्यात काही गैर वाटत नव्हतं. परस्परांच्या संमतीनं, सहकार्यानंच ही अनिष्ट प्रथा पडली होती, मग ज्याच्यासाठी आपण हे सर्व करतो आहोत, त्या 'वाचक' या मुख्य घटकाला विचारातही घ्यायचं कारण नव्हतं. 'आम्ही देऊ तेच त्यानं घेतलं पाहिजे ही हडेलहप्पी प्रवृत्ती त्यात होती. शिवाय ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचणारी ही पुस्तकं वस्त्रहरण केलेलीच असायची. त्यामुळे जिथं चित्र बघायलाच मिळत नाही, त्यावर कसला विचारही होणं शक्य नव्हतं. त्यामुळे वाचक मुखपृष्ठाबाबतीत निरक्षर राहिला हे एकवेळ समजून घेता येईल; परंतु लेखक, प्रकाशक आणि स्वतः चित्रकारही या सशक्त घटकाबद्दल इतके उदासीन कसे राहिले, याची संगती अशी लावता येईल - 'आशयहीन, केवळ आकर्षक चित्र' या मागणीमागे प्रत्येकाची गरज अशी असू शकते अ) लेखक - जास्तीत जास्त वाचक आपलं पुस्तक पाहतील, मग वाचतील. ब) प्रकाशक – ग्रंथविक्रेता खुश झाला म्हणजे जास्त खप होईल. क) चित्रकार लेखक- प्रकाशक यांचं समाधान हेच आमचं ध्येय. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी लेखक किंवा प्रकाशक किंवा हे दोघेही चित्रकार या कामगाराला बोलावून 'चित्रकल्पना' सांगायचे किंवा थोडक्यात लिहून द्यायचे. लेखकानं हस्तलिखित चित्रकाराला वाचायला देणं, चर्चा करणं वगैरे भानगडी नव्हत्या. लेखकाच्या चित्रकल्पनाही दिव्यच असायच्या. सिनेमाचा एखादा शॉट सांगावा असं ते सांगायचे. चित्रात हे कसं दिसेल, किमान हे मावेल तरी का, याचा काडीमात्र विचार लेखकाने केलेला नसे. पंचवीसएक वर्षांपूर्वीचा माझा एक अनुभव सांगतो. एका वाचकप्रिय / लायब्ररीप्रिय लेखकानं मला 'थोडक्यात' म्हणून फुलस्केप पान पाठपोट गच्च भरून चित्रकल्पना लिहून पाठवली होती. तिचा अगदी थोडक्यात सारांश असा दूरवर पसरलेलं शहरवजा खेडं... संध्याकाळची वेळ आहे... पाखरं घराकडं परतू लागली आहेत... कादंबरीचा नायक एक बुद्धिमान पण 'इंपोटंट' प्राध्यापक... त्याची सुस्वरूप पण अतृप्त तरुण पत्नी... नायकाचा एक जिवलग मित्र जो त्याचा सखा, बंधू, मार्गदर्शक इ. आदर्शाने परिपूर्ण... नायकाची आई - हिचे चित्र सर्वांत अलीकडे आणि ठसठशीत हवे जी त्याची स्फूर्तिदायिनी आहे... नंतर नायक गावच्या राजकारणात पडतो, नगराध्यक्ष म्हणून निवडून येतो, गुलाल उधळीत जाणाऱ्या विजयी मिरवणुकीचे चित्र... पुढे नायकाची वृद्ध माता मरण पावते - गाव लोटतो तिच्या भव्य अंत्ययात्रेचं चित्र आवश्यकच इ. इ. सर्वांत शेवटी लेखकाने माझ्यावरचा विश्वास प्रकट केला २८६ निवडक अंतर्नाद होता. "आपण एक मान्यवर चित्रकार आहात, या कल्पनेवरून आपण आजवरचे आपले सर्वांत बेस्ट चित्र काढणार याची खात्री आहे. याशिवायही तुम्हांला आणखीन काही काढायचे असल्यास माझी हरकत नाही. कळावे.” आणि हे सर्व मला क्राउन आकारात (वाचकप्रिय लेखकांची पुस्तकं अजूनही याच आकारात छापली जातात. डेमी आकारात काढली तर खपत नाहीत म्हणे.) म्हणजे १२.५ X १८.५ सें.मी. या आकारात किंवा डबलस्प्रेड म्हणजे स्पाईन, मलपृष्ठासह धरल्यास जास्तीत जास्त २७ x १८.५ सें.मी. या आकारात काढण्याचं 'चॅलेंज' होतं. अर्थात हे असलं 'चॅलेंज' मी स्वीकारणं शक्यच नव्हतं. चित्रकल्पना देणं / सांगणं हे प्रकार पुढे बंद झाले. निदान माझ्यापुरते तरी, तरीही अजूनही लेखकांना कुठंतरी असं वाटत असतं, की चित्रकारानं आपलं ऐकलं पाहिजे. यात चित्रमाध्यमांबद्दल अज्ञान तर असतंच; शिवाय मी या पुस्तकाचा कर्ता आहे; तर मग माझ्या म्हणण्याप्रमाणं चित्रकारानं ऐकलं तर गैर काय, हा एक विचित्र अहंकारही असतो. लेखकाच्या सांगण्याबरहुकूम चित्र न करणारा चित्रकार या क्षेत्रात अतिशहाणा किंवा उही ठरतो. जे चित्रकार पुस्तक न वाचता चित्र करायला तयार होतात त्यांच्याबद्दल ही धारणा एकवेळ बरोबर ठरू शकेल. पण ज्यांचं वाचन चांगलं आहे, जे विचारपूर्वक काम करतात अशांनाही याच मोजपट्टीनं मोजणं योग्य नव्हे. मुळात प्रकाशनक्षेत्रात तुम्हांला चित्रकार म्हणून काम करायचं असेल, तर तुम्ही उत्तम वाचक असणं ही पहिली अट आहे, असं माझं मत आहे. सर्व वाङ्मयप्रकार कथा, कविता ते थेट समीक्षा तुम्ही समजून घेतले पाहिजेत. त्याशिवाय तुम्हांला लेखनाच्या आशयाशी सुसंवादी निर्मिती करताच येणार नाही. वाचन न करता केवळ शीर्षकावरून मुखपृष्ठ केलं तर काय ब्रह्मघोटाळा होऊ शकतो, त्याचं एक उदाहरण इथं देणं मला सयुक्तिक वाटतं. मनोहर माळगावकरांच्या 'प्रिन्सेस'चा मराठी अनुवाद अनेक वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. दहा-पंधरा वर्षांपूर्वी तिच्या नव्या आवृत्तीच्या मुखपृष्ठासाठी 'प्रिन्सेस माझ्याकडे आली. प्रकाशक माझा मित्रच होता. वाचल्याशिवाय मी चित्र करत नाही, हे त्याला माहीत होतं, पण त्याला कादंबरी बाजारात आणायची प्रचंड घाई होती. त्यामुळे ही चार-पाचशे पानांची कादंबरी मी वाचणार केव्हा आणि चित्र करणार केव्हा, या विचारानं तो त्रस्त झाला होता. पण माझ्या हट्टामुळं त्याला थांबावं लागलं, कादंबरी मी पूर्ण वाचली आणि तिच्यावरचं पूर्वीच्या चित्रकारानं केलेलं चित्र पाहून हैराण झालो. कादंबरीवर त्यानं एका राजकन्येचं चित्र काढलं होतं. 'प्रिन्सेस म्हणजे 'राजकन्या' असं साधं समीकरण होतं. मुळात माळगावकरांची ही कादंबरी राजकन्येविषयी नाहीच. 'प्रिन्सेस' हे शीर्षक त्यांनी 'प्रिन्स'चं अनेकवचन (The Princes') या अर्थी दिलेलं आहे. कादंबरी अनेक संस्थानी -