पान:निवडक अंतर्नाद.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भेट मीना प्रभु बडोद्याला गेल्या असताना मीना प्रभु यांनी ज्येष्ठ लेखक श्री. बा. जोशी यांची भेट घेतली. सहज पाच मिनिटं भेटण्यासाठी गेलेल्या मीना प्रभु जोशी दांपत्याशी दिलखुलास गप्पांत रमून गेल्या. एका लोकप्रिय लेखिकेच्या लेखनाचा हा आगळावेगळा आविष्कार. बडोद्याचं सूर्य पॅलेस हॉटेल. सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत. रात्रभर गाडीचा प्रवास करून नुकतीच पोहोचले असले, तरी बाहेर जाण्याचा जामानिमा करून मी जय्यत तयार आहे. प्रश्न तयारीचा नाही, जाण्याचाच आहे. आजचा नाही, गेल्या वर्षभराचा आहे. "त्यांनी स्पष्ट सांगितलंय, कुणालाही माझ्याकडे आणू नका.” देशपांडे म्हणताहेत, "मग मी तुम्हांला त्यांच्याकडे कसं नेऊ?” "मलाही तसंच बजावलेलं आहे' कन्नल पुस्ती जोडतात. "त्यांची आणि त्यांच्या पत्नीची तब्येत ठीक नसते. वय झालंय. त्यांच्याकडून आल्यागेल्याची उठबस होत नाही. जाऊ नका.” मुंबईतसुद्धा हेच कानी आलेलं. मैत्रिणीनं आग्रह करून तिकीट काढलं तरी माझा बडोद्याला जायचा निश्चय होत नाही. जाऊ की नको? गेल्यानंतर त्यांना भेटल्याखेरीज कसं परतायचं? आणि मग मुळात जायचंच कशाला? त्यांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा मला गेली चार वर्षं आहे त्यांचं पहिलं पत्र आल्यापासून, आमच्या मैत्रीची सुरुवातही किती गमतीची, "श्री. बा. जोशींच्या 'गंगाजळीत' 'रविवार सकाळ मध्ये तुझ्या पुस्तकाचा उल्लेख आला होता. वाटलं, तुला कात्रण पाठवावं.” कात्रणासोबतचं मित्र-पत्र सांगत होतं. गंगाजळीत 'माझं लंडन' चा संदर्भ देऊन म्हटलेलं होतं. "एक अप्रतिम पुस्तक आहे असं मित्र म्हणतात. अजून वाचायचा योग आलेला नाही. " मनातून फुलारले, पण सदरातल्या बाकीच्या मजकुरानं लक्ष वेधून घेतलं. साध्या, सरळ, सोप्या भाषेत, सुबोध शैलीत वेचक लिहिलेलं होतं. त्यात विविध विषय आलेले. त्यांचा योग्य तो परामर्श घेतलेला. त्यातून लेखकाची वाचन-संपन्नता आणि त्यांचे अचूक निष्कर्ष मन वेधून घेत होते. असं शुचिर्भूत लिखाण आता पहायलाही मिळत नाही, असं म्हटलं तर अतिशयोक्ती नव्हे माझ्या परदेश वास्तव्यानं आजवर माझा या सदराशी परिचय नव्हता, हळहळ वाटली. अशा व्युत्पन्न व्यक्तीशी ओळख व्हावी असं वाटलं. त्याच भरात 'माझं लंडन' पाठवून दिलं. त्याच्यावर 'तुमच्या अपेक्षा फोल ठरणार नाहीत अशी आशा करते, हे केवळ २८ निवडक अंतर्नाद तोंडदेखलं लिहिलं नव्हतं. मनातून खरंच धडधड होती. पसंत पडेल की नाही ? जवळजवळ उलट डाकेनं पत्र आलं. "आकाशफळ हाती यावं तसं अनपेक्षितपणे आज तुमचं पुस्तक हाती आलं.” एका वाक्यानं मी भरून पावले होते. मग पत्रापत्री सुरू झाली. ते परिचित रेखीव अक्षर पत्त्यावर पाहिलं की मन उचंबळायचं, हातचं सारं बाजूला सारून त्याचं आधी वाचन आणि मग पारायणं व्हायची. श्री. बा, पस्तीस वर्षं कलकत्त्याच्या राष्ट्रीय ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून राहिलेले. साहित्याची लेखन-वाचनाची अतोनात आवड असलेल्या श्री. बां. ना ही नोकरी म्हणजे माशाला समुद्रात पोहायची नोकरी, प्राचीनपासून आधुनिक ग्रंथांपर्यंत सर्व साहित्यसंपदा हाताशी किती वाचू नि किती नको. त्यातून 'साहित्य सोनियाच्या खाणी' असलेली बंगाली भाषा उत्तम अवगत. त्यामुळे वाचन केवळ मराठी-इंग्लिशशी निगडीत न राहता इतर भारतीय भाषांच्या साहित्याचा सांगोपांग विचार करण्याची संधी आणि पात्रता दोन्हीही लाभलेलं. त्याची प्रतिबिंबं त्यांच्या पत्रात खोलवर पडलेली असत. वाचताना दर वेळी काहीतरी वेगळं हाती लागायचं, असं वाटे की, अशी अधिकारी व्यक्ती शेजाराला असेल तर काय बहार येईल ! काय वाचलंच पाहिजे ते कळेल आणि काय यळावं तेही. आपली साहित्याची जाण अनेक पटींनी वाढेल. त्यांचं एक सविस्तर पत्र पोस्टात गहाळ झालं हे पुढच्या एका पत्रातून उमजल्यावर वाटलेली हळहळ अजून छळते. पत्रातून माझ्या लिखाणावरही स्पष्ट भाष्य असे. 'माझं लंडन वरचा परखड अभिप्राय वाचून या एकाच वाचकानं पुस्तक नीट वाचलंसं वाटलं होतं. 'दक्षिणरंग' मध्ये माझं पाऊल पुढे पडल्याची प्रशस्ती वाचून अंगावर मूठभर मांस चढलं, तोवर मला त्यांचं 'संकलन ही भेट आलं होतं. त्याचं अनोखेपण भावलं होतं. आता उत्सुकता होती समक्ष भेटीची, पत्रातून ती मी व्यक्त केली होती. घरी कसं यायचं याचं नीट मार्गदर्शनही लिहून आलं होतं. दरवेळी भारतात यायची ते बडोद्याचे बेत करत. दरवेळी कुणी ना कुणी ते हाणून पाडायचे. सगळे जण स्पष्ट सांगत, "जाऊ