पान:निवडक अंतर्नाद.pdf/२९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काहीतरी अद्भुत (आणि तरीही 'स्टॉल अपिलिंग!') दाखवावं अशी असते. व्यावसायिक चित्रकार म्हणून ती गरज पूर्ण करणं मला आवश्यकही वाटत असतं. पण मुळात लेखनच कच्चं, उथळ, भरकटलेलं, शब्दबंबाळ असं असलं, की माझी सत्त्वपरीक्षा सुरू होते. चित्र सुचत नाही म्हणून मी अस्वस्थ चित्र अजून मिळत नाही म्हणून लेखक प्रकाशक वैतागलेले. (त्यात प्रकाशन समारंभ ठरवलेला असला तर मग विचारायलाच नको.) वेळ जसजसा जात राहतो, तसतशी माझी चडफड वाढायला लागते. हुकमी काही काढता येत नसल्याबद्दलची खंत बळावू लागते. त्या काळापुरता तरी मी वैफल्याने ग्रासून गेलेला असतो. खरंच का यापूर्वी आपण शेकडो पुस्तकांची मुखपृष्ठं केली होती? हा प्रश्न वेगवेगळ्या स्वरांत स्वतःलाच ऐकू येऊ लागतो. मुळात ज्यांना लेखनच कळत नाही किंवा जे चित्रकार वाचायचा, समजून घ्यायचा ताप घेत नाहीत; लेखक- प्रकाशकांच्या कल्पनेनुसार चित्र करून द्यायला ज्यांना जमतं, त्यांना माझा दंडवत आहे. मला त्यांचा हेवा वाटतो. इथे सगळेच रिलॅक्स्ड असतात. केवळ मुखपृष्ठ न मिळाल्यामुळे भांडवल अडकून पडलंय, याची प्रकाशकाला येचणी नसते. लेखकाला विशिष्ट तारखेच्या आत पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे प्रकाशन समारंभाची / बक्षिसाला पुस्तक पाठवण्याची अडचण होत नाही आणि चित्रकारही काम पार पडल्याने निवांत. सगळं कसं सोप्पं असतं अशा केसमध्ये ! पण हे माझ्या नशिबी नाही. एकदा माझा एक प्रकाशकमित्र चित्रासाठी माझ्याकडे आला. हस्तलिखिताऐवजी कादंबरीचं कथानक दोन पानांत लिहून लेखकानं पाठवलं होतं. वास्तविक, मी हस्तलिखित वाचल्याशिवाय चित्र कधी करत नाही. पण इथं मित्रानं गळ घातली. मूळ कॉपी त्यानं प्रेसला दिली होती आणि त्यावेळी फोटोकॉपी अस्तित्वात नसल्यामुळे त्याला मला दुसरी प्रत देता येत नव्हती. एकावेळी दहा-दहा पंधरा-पंधरा पुस्तकांचा सेट काढणाऱ्या प्रकाशकांपैकी हा माझा मित्र होता. बाकीची पुस्तकं जवळजवळ तयार झाली होती. या एका पुस्तकामुळे त्याचा सेट अडकून पडणार होता. साहजिकच त्याचं भांडवल तितके दिवस गुंतून पडणार होतं. म्हणून त्यानं ही दोन पानी कथानकाची सोय केली होती. मी ती पानं वाचली. कुठूनतरी सुरुवात करून कुठेतरी संपवायलाच पाहिजे म्हणून ते कथानक (?) संपवलेलं होतं. चित्राच्या दृष्टीनं खोदून खोदून पाहिलं, तरीही ढेकळंही हाती लागत नव्हती, एकीकडे मला मित्राची दया येत होती आणि दुसरीकडे चित्र काही केल्या डोक्यात येत नाही, म्हणून मी हैराण, कुठून या धंद्यात पडलो, असं वाटायची वेळ. रोज दुसऱ्या दिवसाचा वायदा करत होतो. मित्र यायचा आणि माझ्या बोर्डवर दुसरंच काही तरी चालू आहे हे बघून स्वतःवर संयम ठेवायचा. दर दिवसागणिक आम्हां दोघांतला ताण वाढत चालला होता. एके दिवशी तर मी या ताणापासून थोडं रिलॅक्स व्हावं म्हणून बाबूराव अर्नाळकरांची कुठलीतरी एक 'झुंजारकथा' वाचत बसलो होतो. मित्र नेमका त्याच वेळी आला आणि त्याचा भडकाच उडाला. शेवटी मी मनाचा हिय्या करून त्याला सांगितलं, "खरंच मला काही सुचत नाहीय. प्लीज, तू दुसऱ्या कुणाकडून तरी काढून घे!” त्यानं सुन्नपणे डोळे मिटले आणि नंतर तापून म्हणाला, “आता इतके दिवस तू खाल्ल्यावर मी अजून कुणाकडे जाऊ? ते काही नाही, तूच काहीतरी चांगलं ('चांगलं', हे बेटा एवढा भडकूनही नाही विसरला!) काढून दे. उद्याच! अजून एक दिवस देतो, मी लेखकाला दाखवणारही नाही. छापल्यावरच तो बघेल " "बरं बघतो!" मी खचून म्हणालो. "बघतो नाही! उद्याच! काहीतरी कर अॅट्रॅक्टिव्ह! ती स्टोरी गेली खड्यात!” मग मलाही ती "स्टोरी" यात घालणं भागच होतं. लेटरिंगला प्राधान्य देऊन तजेलदार रंगातलं चित्र मी केलं. थोडीफार कमर्शियल गिमिक्स वापरून मी शोधलेली ती चक्क पळवाट होती. पुस्तक छापून झालं. कव्हर बरं दिसत होतं. पुढे आम्ही दोघेही हे सगळं विसरून गेलो. एके दिवशी सकाळी सफारी सुटातले एक गृहस्थ माझ्याकडे आले. नमस्कार करून झाल्यावर म्हणाले - "मी...", मी दचकलो. हेच 'त्या' कादंबरीचे लेखक! प्रकाशकमित्रावर मनातल्या मनात संतापलो. माझा पत्ता यांना कशाला दिला म्हणून! चेहऱ्यावर रुंद हसू आणत प्रसन्नतेने लेखक म्हणाले "आर्टिस्ट, यू आर ग्रेट.. मला जे जे सांगायचं होतं, ते ते तुम्ही कव्हरवर परफेक्ट दाखवलंय." मी अवाक्, मला वाटलं, ते उपरोधानं बोलताहेत. "खरंच, अगदी तंतोतंत... आपण खुश आहोत तुमच्यावर!" खरोखरीच ते खुशीत होते. मी रडल्यासारखं हसलो. पुढे काही दिवसांनी माझ्या त्या प्रकाशक मित्रानं सांगितलं - 'अरे, ते पुस्तक एका कॉलेजच्या लायब्ररीत संदर्भ विभागात ठेवलंय. आहे की नाही मज्जा ?" कारण उघड होतं – नुसतं लेटरिंग असलेलं कव्हर म्हणजे ते समीक्षा, संदर्भग्रंथ या प्रकारातलं असतं हा सार्वत्रिक समज. मला वाटतं, पुस्तकाच्या चेहऱ्याविषयी गंभीर आणि गमतीदार तूर्तास एवढं पुरे. ( एप्रिल २००५) निवडक अंतर्नाद २८९