पान:निवडक अंतर्नाद.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नकोस, निदान सध्यातरी." मनात यायचं, "मग केव्हा?" मध्ये वर्षाच्या लग्नात अडकले. मोठा बोवाळ घातल्यानं तीन महिने मान वर करणं जमलं नाही. तरी आठवणीनं पत्रिका पाठवली होती. पण कसलंच उत्तर आलं नाही. वाटलं, पोस्टात गहाळ झाली बहुतेक. पुढची दोन वर्षं तशीच उलटली. माझी भारतात ये-जा होती. बडोद्याला जाणं मनातनं जात नव्हतं, पण जायलाही जमत नव्हतं, मित्रमंडळींना माझा ध्यास माहीत होता. सरोजताई काही निमित्तानं बडोद्याला फेरी मारून आल्या. त्यांना भेटूनही आल्या. पण मला म्हणाल्या, "ते भेटत नाहीत गं कुणाला, जाऊ नकोस." गेल्या ऑक्टोबरमध्ये पुन्हा बेत ठरला. अगदी दिवसही नक्की झाला. जगभर भटकणारी मी लहान मुलासारखी त्याची वाट पाह्ययला लागले आणि पुन्हा माशी शिंकली. जाणं रद्द झालं. पुन्हा मनावर सावट आलं. त्यांना भेटणं आपल्या नशिबात नाही बहुतेक ! यावेळी लंडनला जायच्या आधी बडोद्याचं आमंत्रण आलं होतं. त्याच्या अंदाजानंच लंडनहून परतले. आले तोच घसा धरला. तोंडातून शब्द फुटेना. आता कसची जाते? शिवाय नाजूक प्रकृतीच्या या पति पत्नींना माझा आजार बाधला तर? नकोच ते. तिकीट परत करा. शिवाय न भेटण्याचा निरोप जारी होताच. " एरव्ही मी तुम्हांला आनंदानं घेऊन गेलो असतो, " देशपांडे फोनवर म्हणाले, "पण आता मलाच तंबी मिळालेली आहे मध्यंतरी एका प्रतिभावंत लेखिकेला भेटायला त्यांनी नकार दिला. तेव्हा तुमचं तुम्ही काय करायचं ते बघा. आधी न कळवता तशाच थडकलात तर तुमच्या तोंडावर दार लावून घेतील असं नाही, पण फारशा स्वागताची आशा नको. कंयळलेत ते." "मी फार त्रास देणार नाही त्यांना माझी ऊठबससुद्धा करायला नको, मी चहा-कॉफी काही पीत नाही. एकदाच भेटायची इच्छा आहे " "मग पाहा प्रयत्न करून, नशीब तुमचं.” सगळे संवाद, सगळे सल्ले कानात घुमत आहेत. धीर करून बडोद्याला येऊन पोहोचले तर आहे, पण पुढे जाऊ की नको? - नक्की ठरत नव्हतं. "मी तुम्हांला त्यांच्या दारापर्यंत नेऊन सोडतो,” कन्नल उदारपणे म्हणाले. "दूर राहतात ते. रिक्षावाला नीट नेईलशी खात्री नाही. तुम्हांला सोडून मी लांब उभा राहतो. पंधरा-वीस मिनिटांत तुम्ही परताल, मग परत घेऊन जातो. " "मला नुसतं सोडलंत तरी चालेल. मी रिक्षानं परतेन.” "रिक्षा मिळणंही तितकं सोपं नाही त्या भागात, मी थांबतो.” आता कन्नलांची वाट पाहत आहे. ते येतात. गाडीत चढताना मी म्हणते, "अजिबात अभ्यास झाला नसताना गणिताच्या पेपरला निघाल्यासारखं वाटतंय.” सगळे जण हसतात... मी सोडून ! पावणे अकराचा सुमार 'सुखिया' अशी वळणदार अक्षरं असलेलं बैठं घर, ज्याच्या जाळीनं वेढलेल्या व्हरांड्याबाहेर मी उभी आहे. पाय किंचित कापताहेत. 'बिन बुलाए न जाए खुदाके यहाँ भीं' या ब्रिटाची कास धरणारी मी सुखियाच्या दारी अनाहूतपणे उभी आहे. डोक्यात उलटसुलट विचारांची रीले रेस चालू आहे. 'मी केवळ एकदा भेटायला आले आहे पाचच मिनिटं थांबेन, पूर्वी घरी कसं यायचं याचा आराखडा त्यांनी पाठवला होताच ना?' 'तो किती पूर्वी! आता कित्येत दिवसांत पत्रव्यवहारही नाही. •तुला नावानं ओळखतील की नाही कोण जाणे!' 'नाही ओळखलं तर मी पत्रांची आठवण करून देईन. मेक्सिकोवरचं नवं पुस्तक आपल्या ह्यतानं त्यांना देण्याची माझी इच्छा आहे. तेवढं केलं की माझं काम झालं. थोडीच जास्त थांबणार आहे मी?' 'पण एकदम रागावून बोलले तर? - त्यांना कुणीही भेटायला यायला नको आहे.' 'ती शक्यता आहेच. (कोकणस्थ माणूस ) मग दूम दबाके भागो, दुसरं काय!' गल्ली क्रिकेटचा एक चुकार चेंडू अंगावर आपटून तंद्री मोडते. मी पुन्हा शोधते, पण जाळीच्या आसपास घंटीचं बटन कुठे सापडत नाही. मला नीटसं पाहताही येत नाही. नुसतीच जाळी दोनदा खडखडवते. आतलं दार उघडं दिसतंय. पण अजून कसं कुणी येत नाही ? बाहेर गेलेत की काय ? क्षणभर एकदम सुटल्यासारखं वाटतं. पण लगेच निराशही वाटतं. एवढं जमवून, धैर्य एकवटून आले आहे आणि आता दारातून परतावं लागणार मागचं दार उघडं दिसतंय. तिकडून शिरकाव होतो का बघू का? वाघ म्हटलं तरी खाणार, वाघोबा म्हटलं तरी खाणार, पुढचं दार काय नि मागचं काय? वळसा घालून मी पाठी जायच्या प्रयत्नात. पुढचं दार उघडल्याचा आवाज. "अहो काका, कुणीतरी बाई इथं होत्या. त्या मागच्या बाजूला गेल्यात पाह्य." त्याच क्रिकेटवीराची मदत. माझी उत्सुक पावलं परत वळतात. त्याहून उत्सुक डोळे दाराकडे धावतात. गेल्या दोन-तीन वर्षांत मी मनात श्री. बा. कसे दिसत असतील, याची पुष्कळदा कल्पना केलेली होती. उंच, उभट, पातळ चेहरा, तीव्र नाक- डोळे, बारीक मिशांची रेख, काळे पांढरे गच्च केस आणि चेहऱ्यावरच्या विद्वत्तेला असणारी त्रासिक किनार सगळं चित्र एकदम तयार झालेलं नव्हतं, हळूहळू रंगत गेलं होतं. त्यात हल्ली नवे रंग चढले होते. सगळ्यांमध्ये बहुश्रुत विद्वत्ता अखंड. यातलं विद्वत्तेचं गांभीर्य सोडून सगळंच चुकलं आहे. समोर लालवट गोरी, मध्यम मूर्ती. काळ्या फ्रेमचा चष्मा, जवळजवळ बंद डोळे, रुंद गोबरा मवाळ चेहरा. त्यावर गोंधळलेलं अर्धस्मित, "कोण आपण? - या. आत या." निवडक अंतर्नाद २९