पान:निवडक अंतर्नाद.pdf/३००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ते पुस्तकाच्या निर्मिती प्रसारापर्यंत अनेकविध कामं करावी लागली. मी नवीन होते; परंतु प्रॉडक्शन मॅनेजर शिराली, जनरल मॅनेजर गोकर्ण, कमर्शियल आर्टिस्ट डिकुन्हा या 'प्राध्यापकांच्या आणि प्राचार्य रामदास भटकळ यांच्या या 'विद्यापीठा'त माझा अभ्यास सुरू झाला. बुद्धी आणि कल्पनाशक्तीला चालना देणारा आणि नवनिर्मितीचा आनंद देणारा हा अभ्यासक्रम होता. रामदास एकदा मला म्हणाले, "अंजली, तू रोजनिशी लिहायला लाग, स्वतःसाठी लिही. मला दाखवायची जरुरी नाही. " कल्पना चांगली होती. ती प्रत्यक्षात आणायचा मी मनापासून प्रयत्नही केला. मात्र जगणंच इतकं आकर्षक असताना, त्याच्या नोंदी करत बसणं हे काम कंयळवाणंच असतं. काळाच्या ओघात रोजनिश्याही गहाळ होतात. मात्र १९८३ सालची एक रोजनिशी मला सापडली. ती वाचता वाचता ते दूरचे पॉप्युलरचे दिवस जवळ आले... दिवस धावपळीचे होते; पण उमेदीचे होते. आनंदाचे होते. 'ग्रंथव्यवहार' नामक उद्योगाचा मी एक घटक बनले होते. कोणत्या पुस्तकासाठी छापखान्याला कागद पुरवायचा, प्रदर्शनं कुठे भरवायची, पत्रव्यवहार तर मागे पडला नाही ना, हे आणि असेच विचार घरी आल्यावरही डोक्यामध्ये चालू असत. १९८३ सालच्या माझ्या रोजनिशीमधलं हे एक वाचनीय पान - "६ फेब्रुवारी १९८३, रविवार सकाळी सव्वासहाच्या सुमारास मी आणि सुमन हट्टंगडी पुण्याला जायला निघालो. दादर, टी. टी. ला टॅक्सी पकडली. साडेदहाला पोहोचलो. सासरी सामान यकून 'साप्ताहिक मुद्रण येथे गेलो. 'हे ईश्वरराव... हे पुरुषोत्तमराव' या पुस्तकाचं मुखपृष्ठ तयार नव्हतं. फाटकांना बजावून बजावून ते लौकर करायला सांगितलं. मग 'यशवंत मुद्रणालय' गाठलं. तेथे प्रवासी (कुरियर ) कुंजुरला बोलावलं होतं. त्याची व मामा दाते यांची गाठ घालून दिली. (प्रुफं मुंबईला पोहोचविण्यासाठी) तेथून साधना मुद्रणालयात गेलो. तिथले मॅनेजर नाना डेंगळे यांना 'नरसू माळी' या कादंबरीचं हस्तलिखित दिलं, डेंगळे अतिशय सुसंस्कृत आहेत. फार छान बोलतात. तेथून कर्वे रोडवरील 'सागर' मध्ये जाऊन आम्ही दोघी जेवलो. मग पॉप्युलरच्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आचार्य अत्रे सभागृहात गेलो. दुपार असल्यानं माणसं नव्हती. सुळे म्हणाले, 'अजूनपर्यंत कोणत्याही वृत्तपत्रात प्रदर्शनाची बातमी आली नाही.' मी त्यांना पाच-सहा नावं दिली व त्या मंडळींना आमंत्रण द्यायला सांगितलं. " पॉप्युलरमधील सर्वांत महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर निर्णयस्वातंत्र्य! वादविवाद स्वातंत्र्य ! रामदासांनी कधी बॉसिंग केलं नाही. माझ्या निर्णयक्षमतेवर त्यांचा विश्वास होता. ते एकदा मला म्हणाले, "तू तुला योग्य वाटतील ती पुस्तकं जरूर निवड, फक्त निवडीमागे एक विचार असू दे - तो लेखक वा ते पुस्तक पुढील अनेक वर्षं टिकेल असा असावा." त्यांचा शब्द त्यांनी पाळला. एखादं पुस्तक वाचल्यावर त्यात मला जे बदल वा सुधारणा हव्या असतील त्या मी परस्पर लेखकांना सांगत असे. या चर्चा मला फार आवडत. इतरांच्या पुस्तकांचा चिकित्सकपणे विचार करत असतानाच माझ्यातील लेखिका घडत होती. १९८३च्या प्रारंभी रामदासांनी मला मराठी विभागाची मॅनेजर केलं. त्यावेळी मी या विभागात एकटीच होते. सुमन हट्टंगडीला तयार करावं अशा विचारात होते. याच हेतूनं तिला मी पुण्याला नेलं होतं. त्यानंतर एक दिवस गोकर्णांनी मला व सुमनला केबिनमध्ये बोलावलं. त्यांनी संशयानं विचारलं, "तुम्ही कोणाला विचारून पुण्याला गेलात ? सुमनला न्यायची काय गरज होती? टॅक्सी का केलीत?" मी आश्चर्यचकित झाले. आजवर माझ्याशी असं कोणी बोललं नव्हतं, वरिष्ठ, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गोकर्णांचं त्याच्या परीनं बरोब असेल; पण त्यांच्या शब्दांतला संशय व अविश्वास मला झोंबला. रागावर काबू ठेवत मी शांतपणे म्हटलं, "मी जे केलं, ते सर्व रामदासांना विचारूनच केलं.” तो विषय तेवढ्यावरच थांबला. मात्र हे सारं प्रकरण रामदासांना सांगितल्याशिवाय मला राहवेना. त्याचीही नोंद माझ्या रोजनिशीत आहे. " ११ फेब्रुवारी १९८३ आज लौकर ऑफिसात आले. रामदासांना म्हटलं, "तुम्हांला थोडा वेळ आहे का? मला काही बोलायचंय.” रामदास म्हणाले, "मला स्नेहप्रभा प्रधानांच्या ऑपरेशनसाठी जायचं आहे. पण मी ते १५ मिनिटं पुढे ढकलू शकतो." मी घडलेलं सर्व सांगितलं. ते म्हणाले, “You are absolutely right! मीच तुला सांगितलं होतं, की तुझे निर्णय तू घे तुझ्या अधिकारांचा वापर तू करायलाच हवास. मी याबाबत बोलीन गोकर्णांशी तू मनाला लावून घेऊ नकोस." गोकर्णांवरचा माझा राग मावळला. असे वादविवाद कामावर परिणाम करायचे नाहीत. कायम कोणी एकमेकांशी फटकून वागत आहे. अबोला आहे, असं होत नसे. कलह प्रत्येकाचा हक्क होता. त्यामागे हेवेदावे नसत; विचारभिन्नता असे. पॉप्युलरच्या वातावरणातील ही वैचारिक आरोग्यसंपन्नता मला प्रिय होती. दिवसेंदिवस मी या कामात खूप गुंतून गेले. पाच वर्षांत अनेक पुस्तकांवर काम केलं. पैकी एक पुस्तक त्याच्या अनोख्या पार्श्वभूमीमुळे आजही लक्षात आहे. एका सकाळी बाहेरगावाहून ग. कृ. कुलकर्णी नावाचे एक मध्यमवयीन गृहस्थ आले. त्यांच्याबरोबर धोतर- सदरा, गांधीटोपी घातलेले, धिप्पाड पण अतिशय सात्त्विक चेहऱ्याचे • आणखी एक गृहस्थ होते. कुलकर्णीनी मला 'नरसू माळी' नावाच्या कादंबरीचं हस्तलिखित दिलं. ही कादंबरी म्हणजे एक सत्यकथा होती. गुंडगिरीकडे व गुन्हेगारीकडे वळलेल्या, तरीही मूलतः सरळमार्गी असलेल्या एका माणसाची ही थरारक जीवनकाणी होती. भुकेची आग, गरिबी यामुळे नरसू अनिष्ट मार्गाला लागतो; पण त्याच्यातला 'माणूस नष्ट होऊ शकत निवडक अंतर्नाद २९९