पान:निवडक अंतर्नाद.pdf/३०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझ्या मनातील वादळवाऱ्यांकडे पाठ फिरवून तो निघून जाऊ शकतो... अगदी सहजपणे तो उद्ध्वस्त करू शकतो बहरणारी सुंदर स्नेह-बाग त्याच्या सुजाण प्रतिमेच्या साक्षीन! मग मी जपू लागलो फक्त त्याच्या कविता... त्याला विसरून! पत्र... ? ती तर येतच राहिली - वर्षांनुवर्ष रंगबदलत्या पावलांनी, त्याच्या आठवणींवर साचलेली कित्येक वर्षांची पानगळ दूर सारून मी चाळतो आहे अर्थ हरवलेले संदर्भ त्याच्या मृत्यूनंतर...! कार्यालयीन कामकाजांबाबत अत्यंत व्यवहारी असलेल्या रामदासांच्या मनाचा एक कोपरा अगदी हळवा होता. एका प्रसंगी मला तो दिसला. मार्च १९८३मध्ये त्यांना ज्योत्स्ना देवधरांकडून एक पत्र आलं, "तुम्ही 'घरगंगेच्या काठी' वेळेवर काढलं नाहीत. त्यामुळे युनिव्हर्सिटीनं ते अभ्यासक्रमातून वगळलं. तुम्ही माझं फार आर्थिक नुकसान केलंत. 'घरगंगेच्या काठी', 'उत्तरयोगी' मी इतरत्र देत आहे." रामदासांचा चेहरा अतिशय ताणलेला होता. ते मला म्हणाले, "तुझी प्रतिक्रिया काय आहे?" मी म्हटलं, "सध्या आपल्या डोक्यावर इतक्या पुस्तकांचं ओझं आहे, की एखादं पुनर्मुद्रण जात असेल तर जाऊ दे." नेहमीप्रमाणे रामदासांनी त्या घटनेचं अनेक बाजूंनी विश्लेषण केलं. "पुस्तक छापून तयार आहे, असं कळवूया का? घरगंगेच्या काठी हे पॉप्युलरचं पुस्तक म्हणून ओळखलं जातं. मग ते अन्यत्र का जावं? ज्योत्स्नाबाईंचं हेच पुस्तक सर्वांत चांगलं आहे. तेच जाणार असेल तर 'उत्तरयोगी', 'कल्याणी', 'पडझड' ही सगळीच पुस्तकं मुक्त करून, तुमची माझी मैत्री संपली, असं मी कळवू का? कारण त्या माझ्याशी •आर्थिक नुकसानाविषयी बोलताहेत! त्या जेव्हा 'ज्योत्स्ना देवधर' नव्हत्या, तेव्हाही मी त्यांची पुस्तकं काढली...” रामदास दुखावले गेले होते. कमालीचे अस्वस्थ झाले होते. हे सर्व मनोनाट्य मी दूरस्थ म्हणून न्याहाळत होते. साहजिकच माझी प्रतिक्रिया रोखठोक होती. मी विचारलं, "पुस्तक छापून तयार आहे, असं कळवून काय होणार? आपल्या हातून काम लगेच होईल का? ज्योत्स्नाबाई खऱ्या अर्थाने पॉप्युलरच्या लेखिका आहेत का? आपली बरीच शक्ती पुनर्मुद्रणात खर्च होते. तेव्हा गेलं तर जाऊ दे!” रामदास गप्प! मग जडपणे म्हणाले, "आजचा दिवस मला विचार करू दे. उद्या गोकर्णांनाही बोलावू. Then we will take Popular's decision आजचा Personal होता." दुसऱ्या दिवशी दुसरा अंक सुरू झाला, कालचे हळवे रामदास आज गायब! बोलण्यात भावनांची उलघाल नव्हती, कणखरपणे त्यांनी कालची घटना गोकर्णांना सांगितली. ते थंडपणे म्हणाले, "ज्योत्स्नाबाईंना कायदेशीर हक्क नाही; मला आहे! मग मी पुस्तक का सोडावं? तशीच वेळ आली तर मी कोर्यंत जाईन. मी त्यांना सांगतो, की पुस्तक तयार आहे !” मी थवक – थक्क! रामदासांच्या भावनांनी आता वेश बदलला होता. मला मात्र ठामपणे वाटत होतं, रामदास भावना आणि व्यवहाराची गल्लत करत आहेत. दुसऱ्या दिवशीची माझी रोजनिशी सांगते – “१७ मार्च १९८३ मी रामदासांच्या केबिनमध्ये गेले. ते ज्योत्स्नाबाईंना पत्र लिहीत होते. पत्र बाजूला ठेवून त्यांनी मला सांगितलं, "ती कादंबरी छापायची! नातं तोडणं सोपं असतं; जोडणं अवघड. शिवाय ज्योत्स्नाबाईंना माझी गरज आहे मी जर सर्व पुस्तकं रिलीज केली तर मैत्री तुटेल." मी गप्प ! तेच पुढे म्हणाले, “You may call it my weakness.” मी म्हटलं, "ते माझ्या कालच लक्षात आलं होतं.” रामदासांच्या स्वभावाचा एक पैलू आत्तापर्यंत माझ्या चांगलाच परिचयाचा झाला होता. त्यांच्या वर्तनात सौम्यपणा होता, ते कधीही आवाज चढवायचे नाहीत, निर्णयापूर्वी सर्वांशी ते विचारविनिमय करत; पण तरीही अनेकदा अंतर्यामी ते त्यांच्या निर्णयावर ठाम असत. पॉप्युलरमध्ये काम करत असताना, माझ्या सवयीनुसार गोकर्ण, शिराली, रामदास या त्रिमूर्तीच्या लकबी, सवयी, बोलण्याची पद्धत या सर्वांचा मी सूक्ष्म अभ्यास करत असे. रामदासांचा एखादा 'खास निर्णय सर्वानुमते ठरला, की ते समाधानी दिसत उजवा हात पेन्सिलसकट ते अर्धवर्तुळाकार हलवत आणि आम्हांला विचारत, “So, this is pakka (पक्का), हो ना?” या समेवर 'चर्चा राग' संपे. मला हसू यायचं. हा निर्णय त्यांच्या मनात केव्हाच पक्का झालेला होता! अर्थात हा त्यांचा धोरणीपणा होता. ते मला नेहमी सांगत, "वेगवेगळ्या वृत्तीच्या माणसांना सांभाळण्याचं कौशल्य उपजत तरी असावं लागतं किंवा शिकून तरी घ्यावं लागतं.” त्यांचं आयुष्य माणसांनी भरगच्च होतं. आपल्या मित्रांसाठी काय वाट्टेल ते करायला रामदास तयार असत. कोणाला विमानतळावरून आणायला जा; कोणाच्या ऑपरेशनच्या वेळी हजर राहा; कोणाची थंड हवेच्या ठिकाणी जायची व्यवस्था कर, अशी नाना 'मित्रकर्तव्यं ते करत. मला प्रश्न पडे, इंग्रजी-मराठी ग्रंथांचा अफाट व्याप सांभाळून हा माणूस इतक्या उनाडक्या कशा करू शकतो? आमच्या ऑफिसची स्थानिक भाषा' कोकणी होती. ती माझ्या व शुभांगीच्या कानावर पडे. त्यातले काही शब्द उचलून आम्ही दोघींनी आमची स्वतंत्र भाषा घडवली, कोकणीत 'थांब' या अर्थी 'राब' हा शब्द वापरतात. रामदास दुपारी कोठे गायब झाले, की आम्ही म्हणायचो, 'हांव राबता; तू बागडता.' कोकणी 'राब ला आम्ही 'राबणे' ह्य मराठी अर्थ बहाल केला होता, रामदासांच्या मित्रांपैकी वसंत कानेटकरांचं आगमन फार लक्षणीय असे. दुपारी चारच्या सुमारास प्रथम युडी कोलनचा घमघमाट यायचा. मग स्थूल पण रुबाबदार कानेटकर, निवडक अंतर्नाद ३०१