पान:निवडक अंतर्नाद.pdf/३०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हातातील चामड्याची बॅग हलवत धीरोदात्तपणे प्रवेश करायचे. तत्पूर्वी त्यांचं पत्र येऊन थडकलेलं असे. 'चंदा दर्शनची फी भरायची आहे. पैसे पाठवा घर बांधायचं आहे. पैसे पाठवा.' मला वाटे यांना रॉयल्टी तरी किती मिळते? मी शुभांगीला म्हटलं, "माझं एक स्वप्न आहे. कधीतरी यांच्यासारखं बॅग हलवत रॉयल्टी घ्यायला मला पॉप्युलरमध्ये यायचंय!” गंमत म्हणजे ते स्वप्न पूर्ण झालं. श्रेयस मालिकेतील डॉ. आनंदीबाई जोशींचं काशीबाई कानिटकरलिखित पुस्तक संपादनासाठी माझ्याकडे आलं. तोवर हर्ष भटकलनं सूत्रं हाती घेतली होती, ज्या दालनात बसून मी ते स्वप्न पाहिलं, तिथेच आता हर्षची केबिन होती. तिथेच मला रॉयल्टीचा चेक मिळाला. क्वचित स्नेहप्रभा प्रधान येत, लख्ख गोरा रंग, नाजूक चण, पिंगट केस आणि नीटस पोशाख केलेल्या स्नेहप्रभाबाई एखाद्या बाहुलीसारख्या दिसत. त्यांचं घर जवळच पेडर रोडवर होतं. कोणत्यातरी पार्टीच्या निमित्तानं मी व रामदास त्यांच्या घरी गेलो होतो; तिथेच माझी आणि माझे भावी प्रकाशक श्री विद्याचे मधुकाका कुलकर्णी यांची ओळख झाली. स्नेहप्रभाबाई प्रेमळ होत्या. गप्पा मारायला घरी बोलवत. एकदा तर त्यांनी माझे केस त्यांच्या स्टाईलमध्ये कापून दिले. त्या घरी एकट्याच असत. सोबतीला एक तपकिरी कुत्रं आणि मांजर ! मी मुलखाची भित्री ! रामदास गमतीनं म्हणत, "लेखकांशी रॅपो साधण्याच्या अंजलीच्या मार्गातला पहिला अडथळा म्हणजे लेखकाचे पाळीव प्राणी!” निर्मला देशपांडे, शिरीष पै या माझ्या आईच्या मैत्रिणी आता त्यांचं माझं स्वतंत्र नातं निर्माण झालं. विंदा करंदीकर माझे इंग्रजीचे प्राध्यापक, तेही कधीतरी येत. निर्मलाबाईंचं आणि माझं नातं 'बन्सी काहे को बजायी' या त्यांच्या कादंबरीमुळे जुळलं. पहिल्याच भेटीत मी त्यांना सांगितलं, “कादंबरीत खूप त्रुटी आहेत. त्या सुधारण्याची तयारी आहे का?" त्यांना हे अनपेक्षित होतं. काहीशा नाराजीनंच त्या म्हणाल्या, "सांग काय सांगतेस ते." एकेका मुद्द्यावर तपशीलवार चर्चा सुरू झाली. दोघीही त्या कादंबरीतील पात्रांना घडविण्यात रंगून गेलो, निवेदनात्मक मजकूर अधिक नाट्यात्मक बनू लागला. एकेका प्रकरणाचं लेखन पूर्ण करून त्या मला फोन करत. सकाळी ११च्या सुमारास मी त्यांच्या शिवाजी पार्कच्या घरी जात असे. छानसं खायला करून, त्या माझी वाट बघत असत. कादंबरीचा त्यांनी केलेला शेवट मला फसवा वाटत होता. आता त्यांचा माझ्यावर इतका विश्वास बसला होता, की त्या मला म्हणाल्या, "तू तुला हवा तसा शेवट कर, मग मी बघते." एकदा त्या ऑफिसमध्ये माझ्यासाठी चिक्कूच्या रंगांची चंदेरी साडी घेऊन आल्या, मला कोणाकडून भेटी घेणं आवडत नसे. मी म्हटलं, "मला नको साडी. आहेत त्याच नेसणं होत नाही." त्या रागावल्या. "नकोय काय? माझ्या येशूला नसती का मी दिली!” त्यांनी खरंच माझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं. एक दिवस त्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर माझी वाट पाहत बसल्या होत्या, त्या दिवशी बरोबर माझी आईदेखील होती. आईला त्या म्हणाल्या, "पद्मिनी, तुझ्या मुलीच्या रूपानं माझी मुलगी मला परत ३०२ • निवडक अंतर्नाद मिळाली.” त्यांचं माझं नातं तात्पुरतं, कामापुरतं नव्हतं; ते गाढ़ बनलं होतं. पॉप्युलरमध्ये मला भेटलेली अविस्मरणीय व्यक्ती म्हणजे विश्राम बेडेकर, 'एक झाड दोन पक्षी' हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशनार्थ आमच्याकडे आलं. पिवळ्या, बिनरेघांच्या कागदांवर बारीक, नागमोडी अक्षरात लिहिलेलं! पॉप्युलरमधील ते सर्वांत सुंदर दिवस होते. विस्मृत घटना आता ताज्या कळ्यांसारख्या मनात उमलू लागल्या आहेत. शाळेत असताना बेडेकरांची 'रणांगण' कादंबरी वाचून मी अंतर्बाह्य थरारून गेले होते. माझ्या छोट्याशा लेखनवहीत नवख्या ह्यतांनी बाळबोध परीक्षणही केलं होतं. तेव्हा आवडली होती नायिका हॅटर्य! चक्रधरचा राग आला होता. वाटत होतं, चक्रधर म्हणजे बेडेकरच! मोठेपणी लेखकाला भेटून जाब विचारायचं मी ठरवलं होतं, "हॅर्टाशी तुम्ही इतक्या कठोरपणी का वागलात?" आणि आता त्याच बेडेकरांचं आत्मचरित्र माझ्या हातात आलं होतं. बाकी सारी कामं लांब सारून मी ते वाचायला घेतलं. मनाचं एक रूप दुसऱ्याशी बोलतं आहे, अशी कल्पना करून ते लिहिलं होतं. बेडेकरांनी स्वतःचा उल्लेख 'तो' असा केला होता. प्रांजळपणे स्वतःच्या पराभवाची कहाणी सांगितली होती. स्वतः ची भ्रामक प्रतिमा चितारण्याचा त्यात प्रयत्न नव्हता, आत्मचरित्राचा पहिला भाग रोचक आणि विश्लेषणात्मक होता. दुसऱ्या भागात त्यांनी आपल्या कारकिर्दीची रूपरेखा मांडली होती. मात्र इथे मानसिक द्वंद्वांचं चित्रण टाळलं होतं. चरित्र वाचताना मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. चित्रपटसृष्टीमुळे घरापासून मनानं दुरावल्यामुळे घरात संघर्ष उद्भवले असतीलच. मग त्याचं चित्रण का नाही ? हरिभाऊ मोटेंशी असलेली घनिष्ट मैत्री का तुटली? आपलं हरिभाऊंशी लग्न ठरल्याची बातमी कृष्णाबाईंनी सांगताच बेडेकर एवढे का चिडले? मी हे प्रश्न रामदासांना विचारले. ते म्हणाले, "तुझ्या प्रतिक्रिया तू मोकळेपणी बेडेकरांना सांग. त्या लिहून काढ. आपण त्यांना भेटू” अन्य माणसांच्या जीवनातील खासगी संदर्भ आणि मधूनच अकारण उमटणारा उपहासाचा सूरही मला खुपत होता. १६ मे १९८३! साडेचारच्या सुमारास आम्ही वरळीच्या बेडेकरांच्या घरी गेलो. बंद दाराआड पावलं वाजली. 'रणांगण' चा नायक बघायला मी अधीर झाले होते. दार बेडेकरांनीच उघडलं. "या!” आवाज भरदार आणि राकट पोशाख अस्सल मराठी, धोतर- सदरा शरीर वृद्ध तरीही दणकट माथ्यावर रूपेरी केसांचा मंदिल; पण चेहरा तोच ! ताठा तोच! चक्रधरचा! त्या संध्याकाळी व्हायचं तेच झालं. येऊ घातलेल्या संघर्षाच्या कल्पनेनं मला गुदगुल्या होत होत्या. अंगठ्याएवढ्या माणसानं महाकाय गलिव्हरला आव्हान द्यायचाच तो प्रकार होता. प्रारंभिक गप्पा, चहापान यानंतर मी माझ्या प्रतिक्रियांचा कागद त्यांच्या हातात दिला. माझ्यासारख्या शेंदाड शिपायाकडून त्यांच्या लेखनावर टीका होईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. बेडेकरांचा चेहरा झरझर पालटू लागला. दबलेला संताप डोळ्यांत उतरला. एकेका मुद्द्याचा ते बेडेकरी शैलीत समाचार घेऊ लागले. मीही माझी बाजू मांडत होते,