पान:निवडक अंतर्नाद.pdf/३०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथालेखक, कवी, कथाकार, नाटककार, कादंबरीकार, चित्रपट लेखक अशा विविध रूपांतून रॉय किणीकर अनेक प्रतिभावंतांना आणि रसिकांना भेटले. काहींना ते अवलिया वाटले. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे 'माणूस आणि साहित्यिक अशा दोन्ही अंगांनी दर्शन घडविणारे पुस्तक म्हणून 'रॉय किणीकर - माणूस आणि साहित्य' या पुस्तकाकडे पाहावे लागेल. ह्य महत्त्वपूर्ण ग्रंथ वाचकांच्या हाती देण्यासाठी रवींद्र घवी आणि किणीकरांचे सुपुत्र अनिल किणीकर यांनी संपादक म्हणून महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, अरविंद गोखले, विजया राजाध्यक्ष, स ह देशपांडे, एक शोधयात्रा... मनमोहन, माधव मनोहर, मोहन नगरकर, सुभाष अवचट, सदानंद रेगे, माधवी देसाई, म. द. हातकणंगलेकर, रा. बा. कुलकर्णी, रावसाहेब जगताप, रा. भि. जोशी, बा, द. सातोस्कर, प्रभाकर पाध्ये, अ. सी. केळूसकर, हरिभाऊ विठ्ठल देसाई, मधुकर रामचंद्र नाडगौडा, बाबा पाटील, सविता पारिजात, वासुदेव कुलकर्णी, शरद कारखानीस, प्रकाश देवकुळे, राम देशपांडे, रणजित देसाई, शरद देशपांडे, विश्राम गुप्ते या मान्यवरांनी रॉय किणीकरांच्या उलगडलेल्या आणि न उलगडलेल्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिले आहे. "उत्तररात्र वाचताना वाटलं, ह्या अवलियाकडे आपण अधिक आस्थेने आणि आदराने पाहायला हवं होतं. त्यांनी स्वतः आदराची अथवा मानसन्मानाची चुकूनही अपेक्षा ठेवली नव्हती. म्हणून काय आपण त्यांना ओळखायला नको होतं? आपण ओळखीच्या माणसांच्या बाबतीत किती अनोळखी राहतो पहा, पण किणीकरांनी तरी स्वत:मधला चिंतनशील कलावंत असा दडवून का ठेवावा?... ते दृष्टीआड राहू इच्छित असले तरी त्यांना असं राहू द्यायला नको होतं. किणीकर काही अलौकिक ऋणं फेडायचीही इच्छा बाळगून होते. 'ऋण फेडायाचे राहून माझे गेले ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेले' म्हणणाऱ्या किणीकरांचे आपणही देणे लागत होतो, हे फार उशिरा कळले." अशा शब्दांत पुलंनी व्यक्त केलेली खंत किणीकरांवर आणि त्यांच्या प्रतिभेवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वांच्या लेखांतून उमटली आहे. युगायुगांचा सहप्रवासी – अद्भुत कलंदर, दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक काढणे - एक कला; बुडविणे एक धंदा, मंतरलेले व तंतरलेले दिवस, मी एक कलंदर माणूस हे रॉय किणीकरांचे स्वतःविषयीचे लेख एका अवलियाचे त्याच्याच शब्दांत दर्शन घडविणारे आहेत. रॉय किणीकरांच्या या लेखांमुळे किणीकर माणूस आणि साहित्य हे पुस्तक परिपूर्ण वाटते. संपली रात्र, वेदना संपली नाही. हा अनिल किणीकरांचा लेख अप्रतिम आहे. आपल्या वडिलांचे एक प्रतिभावंत म्हणून घडलेले दर्शन, त्यांचे संघर्षमय जीवन, त्यांची अव्यभिचारी वाड्मयनिष्ठा, या साऱ्यांचे दर्शन त्यांनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्रात दिसते. जवळच्या माणसांवर अंतरावर राहून लिहिणे अवघड असते. हे अवघड काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे. डॉ. अरुणा ढेरे, डॉ. स्वाती कर्वे, आसावरी काकडे, सतीश कामत, रमेश वैद्य यांनी किणीकरांच्या साहित्याविषयीचे जे लेख लिहिले आहेत, त्यांतून उलगडणारे वेगळे रॉय किणीकर वाचकांना भेटतात. ग्रीक ट्रॅजेडीमधील नेमेसिस : ये ग ये ग विठाबाई, अनोखे न-नाट्य खजिन्याची विहीर, आधी केले; मग सांगितले या अनुक्रमे रामभैय्या दाते, कमलाकर नाडकर्णी आणि दीनानाथ दलाल यांच्या लेखांमुळे रॉय किणीकरांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वातले अनेक अपरिचित पैलू उलगडत जातात. अचपळ पारा... या सविस्तर लेखात रवीन्द्र घवी यांनी रॉय किणीकरांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाविषयी जे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे, ते महत्त्वाचे आहे "पूर्वकालीन, समकालीन आणि उत्तरकालीन सगळेच रॉय किणीकरांच्या लेखनाने प्रभावित झाले आहेत. त्यांच्या विक्षिप्तपणाचा अनुभव घेतलेले प्रभावित झालेले आहेत. पाया पडण्यासाठी येणाऱ्यांना झटकून टाकणाऱ्या संत गाडगेबाबांच्या अफाट गणगोताप्रमाणे हुलकावण्या देत गेलेल्या रॉय किणीकरांचं गणगोत आहे, असं म्हटल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं अवलियासारखं एक अंग उजळून येतं.” असे रवीन्द्र घवी त्यांच्या लेखात म्हणतात. हे पुस्तक वाचल्यानंतर वाचक त्यांच्या मताशी सहमत होतात. जीवनाचा शोध घेणाऱ्या प्रतिभावंताच्या जीवनाचा शोध हे एक कठीण काम असते. ज्यांना रॉय किणीकर समजून घ्यायचे आहेत अशा सर्वांना आवडेल, भावेल असे हे पुस्तक आहे. (रॉय किणीकर माणूस आणि साहित्य, डायमंड पब्लिकेशन्स, संपादन : रवीन्द्र घवी, अनिल किणीकर, किंमत रुपये ३००, पृष्ठे ३४६) ( दिवाळी २००९) - परीक्षण : मिलिंद जोशी निवडक अंतर्नाद ३०७