पान:निवडक अंतर्नाद.pdf/३१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घराबाहेरचे हिरवे झाड गोड हसत असल्याचे जाणवते. चोचीत एक कोवळा किरण घेऊन येणारे पाखरू या कथनकर्त्याला एक 'गाणे' देऊन जाते. मग कथनकर्त्याला 'मला कळतं । माणसाचं मरण अजून दूर आहे । प्रेम करीत जगायला या जगात अजून एक सूर आहे ।' याची जाणीव होऊ लागते. मानवाभोवती त्याला नको असलेले वास्तव असते. ते बदलण्याची ताकद मानवामध्ये नसते. अशावेळी एक चमत्कार घडू शकतो. जे घडावे असे आपण अपेक्षित असतो, जे अतिशय सुखद, मन प्रसन्न करून टाकणारे असते तेच घडत असल्याचे आपल्याला जाणवते. 'चमत्कार' या कवितेचा कथनकर्ता म्हणतो - आपण आपले डोळे हलकेच मिटतो आणि पुन्हा हलकेच उघडतो; आणि चमत्कार घडतो. हे जग बदलून जाते. कावळ्याच्या कर्कश ओरडण्यातून एक अनवट बंदीश उमलू लागते. पलिकडच्या आगगाडीची खडखडसुद्धा अनोख्या आनंदाने भरू लागते!' 'प्रथमच जसं काही जाणवतं । आपल्या आतून वहात असतो एक झरा । अगदी खरा... अगदी खरा!' जगातील नको वाटणाऱ्या घटनांना आपणच हव्या असणाऱ्या घटनांचे रूप देऊन त्यांचा उपभोग घ्यायचा असतो. आपला आनंद हा महत्त्वाचा, तो आपणच मिळवायचा असतो. तो मिळावा असे या जगात घडत राहावे, आणि ते घडत नाही म्हणून आपण खंतावत राहावे, हा मार्ग चुकीचा असल्याचे शहाणपण ही कविता देते, 'मनमोकळं गाणं' यातला कथनकर्ता म्हणतो: 'आपण असतो आपली धून। गात रहा। आपण असतो आपला पाऊस । न्हात रहा!' जिवंत असेपर्यंत जगणे अपरिहार्य असल्यामुळे हे जगणे अर्थपूर्ण आणि आनंददायक करून जगले पाहिजे आणि आपल्या जगण्याला असे रूप देणे म्हणजे आपल्या जगण्याचे 'गाणे' बनवणे; ही 'बोलगाण्यां' तील केंद्रीय जाणीव असल्याचे आपण पाहिले. स्त्रीपुरुषांतील प्रेम आणि त्यांच्यातील प्रेमपूर्ण सहजीवन माणसाच्या जगण्याला 'सुंदर गाणे' बनवत असते; हा पाडगावकरांच्या जाणिवांचा दुसरा प्रमुख घटक आहे. प्रेम हे व्यक्तिविरोधी असलेल्या कष्टप्रद, दुःखदायक, असुरक्षित, निरस आणि 'गद्यप्राय' अशा जीवनाचे सुंदर गाणे कसे बनवते, याचे दर्शन पाडगावकरांनी प्रेमविषयक बोलगाण्यातून सांगितले आहे. म्हणून पाडगावकरांनी 'बोलगाण्या' त प्रेमावर आणि प्रेम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शहाणपणावर प्रामुख्याने 'बोलगाणी' लिहिली आहेत. प्रेमाचा अनुभव नसलेला परंतु प्रेमात पडण्यासाठी इच्छुक असणारा तरुण हा या 'बोलगाण्या' चा श्रोता आहे. प्रेमाबद्दल या तरुणांशी संवाद साधताना या कवितांच्या कथनकर्त्याने स्वीकारलेली आपुलकीची, श्रोत्याला विश्वासात घेण्याची आणि कधी नर्मविनोद करीत मिस्किलपणे तर कधी गंभीरपणे बोलण्याची पद्धती या कवितांना अर्थपूर्ण भावनिक स्वर मिळवून देतो. कथनकर्त्याच्या भावनिक पातळीवरील अशा भूमिकांमुळे या कवितांतील सर्वपरिचित असलेला प्रेमविषयक तपशील जसा नव्याने अर्थपूर्ण बनून जातो तसाच तो श्रोत्यांना या 'बोलगाण्या'त गुंतवूनही ठेवतो. या बोलगाण्यांना मिळालेल्या लोकप्रियतेचे रहस्य श्रोत्यांना खिळवून ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेतही आहे. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, रोमँटिक पातळीवरच्या पण खास पाडगावकरांच्या म्हणाव्या लागतील अशा प्रेमाबद्दलच्या जाणिवांची अभिव्यक्ती या कवितांतून झालेली आहे त्यामुळे त्यांची ही कविता जशी शहाणपणाची बनते तशीच ती पाडगावकरी प्रेमकविताही बनते. श्रोत्यांना संबोधित करणारी आणि कथनकर्त्यांच्या आत्मकथनाचे रूप घेणारी, अशा दोन प्रकारांत पाडगावकरांनी ही कविता लिहिलेली आहे प्रियकराने प्रेयसीला उद्देशून केलेली आणि प्रेमासंबंधीच्या स्वतःच्या अनुभवाचे कथन करणारी अशा दोन रूपांत यातली आत्मकथने व्यक्त झालेली आहेत. यातली आत्मकथनरूप कविता पाडगावकरांच्या प्रेमासंबंधीच्या रोमँटिक जाणिवा अभिव्यक्त करणारी कविता आहे. 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, ह्या प्रेम म्हणजे काय, हे श्रोत्यांना सांगणाऱ्या आणि अतिशय लोकप्रिय झालेल्या कवितेचा येथे फक्त निर्देश करणे पुरेसे आहे. प्रेमात पडल्यावर कोणकोणते अनुभव प्रियकराला येतात, आणि हे अनुभव सर्व प्रेमिकांसाठी सारखेच कसे असतात, हे श्रोत्यांना मिस्किलपणे सांगणाऱ्या 'प्रेमात पडलं की' या कवितेचाही येथे उल्लेख पुरेसा आहे. प्रेमाच्या साफल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतले जीवनही कसे गाणे बनते, याचे दर्शन 'तिनं लाजून होय म्हटलं' या श्रोतासंबोधित आत्मकथनरूपातील कवितेत पाडगावकरांनी घडवले आहे. या कवितेतला नायक दरिद्री, निम्न मध्यमवर्गातला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही तो जिच्यावर प्रेम करतो तिला लग्नासाठी मागणी घालतो. आणि मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं | सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं!' असा अनुभव त्याला येतो. त्याचे कष्टसाध्य, असुखी जीवन प्रेमसाफल्याच्या क्षणीच 'गाणे' बनून जाते. त्या धुंदीत तो तिला इराण्याच्या हॉटेलात घेऊन जातो आणि चहासोबत मस्कापाव मागवतो. तो म्हणतो : 'तीसुद्धा ऐपत नव्हती। असली चैन झेपत नव्हती | देवच तेव्हा वाली खिशातलं पाकीट खाली!' म्हणजे हॉटेलचे बिलही त्याला नव्हे तर त्याच्या प्रेयसीलाच चुकवावे लागते. हा नायक निम्न मध्यमवर्गीय असल्यामुळे तो जगात वावरताना भिऊन, गरिबीने वागत असला तरी प्रेमाच्या साक्षात्कारामुळे 'त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत । पोलीससुद्धा माझ्याकडे। आदरपूर्वक होते बघत !' असा आत्मविश्वास त्याच्यात आला आहे. आपला प्रेमानुभव दुर्मिळ, अलौकिक आणि व्यवहारापलीकडचा कसा हे सुचवण्यासाठी हे आत्मकथन ऐकणाऱ्या श्रोत्यांना तो विचारतो : 'तुमचं लग्न ठरवून झालं ? । कोवळपण हरवून झालं ? | प्रेमाच्या साक्षात्कारामुळे जीवनाला कोवळेपणा प्राप्त होतो, प्रेम न करता ठरवून लग्न केल्यामुळे तुम्ही हा कोवळेपणा गमावला असल्याचे हा कथनकर्ता सुचवत आहे. प्रेमाचा संबंध नसलेले लग्न हा केवळ रोखठोक व्यवहार बनतो, हे सांगण्यासाठी तो विचारतो - हुंडाबिंडा, मानपान हे सर्व घेऊन ते झालं? नंतर म्हणतो: 'तुम्हांला हे सांगून तरी कळणार कसं? । असलं गाणं तुमच्याकडे वळणार कसं? । पण ते जाऊ द्या, । माझं गाणं गाऊ द्या : ।' पुढे नोकरी, मुले-बाळे, त्यांचे संगोपन आणि शिक्षण हे सर्व इतरांप्रमाणेच आणि रीतीप्रमाणेच निवडक अंतर्नाद ३१७