पान:निवडक अंतर्नाद.pdf/३२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखक असं लिहू पाहात नाहीत, इंग्रजीत मात्र गेल्या २५ ते ३० वर्षांत अशी बरीच पुस्तकं आलीत, त्यातील अनेक पत्रकारांनी लिहिलेली आहेत. प्रवासलेखनात प्रामुख्याने प्रवासात भेटलेल्या माणसांचं, परिस्थितीचं वर्णन असतं. या सत्रात सहभागी झाले होते पॉल थेरॉ (Theroux), चार्ल्स ग्लास, सामंत सुब्रमण्यन, सॅम मिलर, ब्रिजिद कीनन व आकाश कपूर. जेएलएफचे संचालक व इतिहासविषयक लेखन करणारे विल्यम डॅलरिम्पल यांनी या सत्राचं सूत्रसंचालन केलं. या सर्व लेखकांनी आपापल्या पुस्तकांमधनं काही भाग वाचून दाखवला. ब्रिजिद यांच्या वाचनानं धमाल आणली. भारतात जन्मलेल्या व डिप्लोमॅट पती असल्याने ३७ देशांमध्ये वास्तव्य केलेल्या ब्रिजिद यांचे अनुभव मजेशीर व वैविध्यपूर्ण आहेतच, पण तीच मजा लिखाणातही जाणवली सामंतने श्रीलंकेतल्या एलटीटीईच्या परिसरात वावरतानाचा एक उतारा वाचला. सॅम मिलर हा बीबीसीचा दिल्लीतील प्रतिनिधी; त्यांचं दिल्लीवरील पुस्तक प्रसिद्ध आहे. प्रवास आणि पर्यटन - travel and tourism यांत फरक आहे. त्यामुळेच त्याविषयीच्या लिखाणातही, हे या सत्रात स्पष्ट झालं. लेखक त्याच्या पुस्तकातून उतारा वाचत असताना, आपण जणू त्याच्या सोबत फिरतोय, इतकं जिवंत वातावरण तिथे होतं. शंभर वर्षांपूर्वी प्रवासावर पुस्तक लिहिणं आणि आजच्या इंटरनेट/गूगलच्या काळात लिहिणं यांत फार फरक आहे. आता एखाद्या शहरातल्या प्रमुख वास्तूच कशाला छोट्या छोट्या इमारती / दुकानंसुद्धा गूगलमॅपवर आपण घरबसल्या पाहू शकतो. मग लिहायचं काय, तर तिथे पाहिलेल्या/भेटलेल्या माणसांबद्दल तिथे आलेल्या अनुभवांबद्दल. या सत्रानंतर याच जागी होती शशी थरूर व पत्रकार मिहीर शर्मा यांची मुलाखत, त्यामुळे कोणीच आपल्या जागेवरून उठलं नाही. नव्याने आलेल्या कोणालाही बसायलाच मिळालं नाही. 'इंडिया शास्त्र' हे थरूर यांचं पुस्तक नुकतंच बाजारात आलं आहे. त्यावर आधारित हे सत्र होतं. फ्रंट लॉनमध्ये हे सत्र होतं तरी ते पूर्ण ओसंडून वाहत होतं. पत्नीच्या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भात थरूर यांची चौकशी होणार, अशा बातम्या या काळात जोरात होत्या. तरीही उपस्थितांमध्ये याविषयीची अस्वस्थता जाणवत नव्हती. थरूर देखणे आहेत, त्यांचं बोलणं अत्यंत आकर्षक, भाषा प्रभावी आणि शरीरभाषा आत्मविश्वासपूर्ण, किंचित बेदरकार म्हणावी अशी, पुस्तक मोदी सरकारचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लिहिलेलं आहे. या संदर्भात उपस्थितांचे अनेक प्रश्न होते. एका तरुण मुलीने त्यांना विचारलं, "मला व माझ्यासारख्या अनेकांना राजकारणात यायचं असतं. परंतु लोकसभा टीव्हीवर सभागृहात जो गोंधळ, घोषणाबाजी सुरू असलेली आम्ही पाहतो, त्याने आमच्या विचारांवर विरजण पडतं. याबाबत तुम्ही काय सांगाल ?" शशी थरूर एवढंच म्हणाले, "I am in politics ! मी आहे, तुम्हाला यायला काय हरकत आहे.” याला माज म्हणायचं, की जबरदस्त आत्मविश्वास ते आपण ठरवायचं. या संमेलनात राजकीय नेत्यांचा वावर अगदी मर्यादित असतो हेही इथलं एक वेगळेपण, मी तेथे असताना राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी एका कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले, पण एरव्ही सगळा वेळ त्या श्रोत्यांमध्येच बसल्या होत्या. ३२२ • निवडक अंतर्नाद पॉल थेरॉ यांच्या गप्पा ऐकणं हा मस्त अनुभव होता, त्यांनी लेखकांसाठी दिलेला सल्ला फारच पटण्याजोगा वाटला - "पुस्तक लिहायचं असेल तर आधी घराबाहेर पडा", "प्रवास करताना कुणाच्या नजरेत न भरता निरीक्षण करत राहा. लिहिणं ही अत्यंत खाजगी गोष्ट आहे, ते स्वतःजवळच ठेवा. वाट पाहायला शिका", "प्रवास करणारा घाईत नसतो”. त्यांनी सांगितलेला एक किस्सा द्यायचा मोह आवरत नाही. पॉल आयर्लंडमध्ये फिरत होते. एक दिवस एका छोट्या इनमध्ये उतरले. वहीत व्यवसायाच्या समोर त्यांनी 'लेखक' लिहिलं. तर, त्या इनच्या मालकिणीने त्यांना विचारलं, “What books do you write, Mr. Thorax?” भारतात नावांचे / उच्चारांचे / शब्दांचे होणारे खून पाहून अस्वस्थ वाटणाऱ्या जीवांना हे वाचून शांत वायवं! जेएलएफच्या तिसऱ्या दिवशीची दोन सत्रं वेगळ्याच काळात घेऊन जाणारी होती. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन याने गेल्या वर्षी मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्राचीन लिप्या व भाषांमध्ये असलेल्या ग्रंथांचं नव्याने प्रकाशन असं या प्रकल्पाचं थोडक्यात स्वरूप सांगता येईल. या सत्रात पंजाबी (बुल्लेशा), फारसी (अबुल फजल), तेलुगु (मृणालिनी), पाली/ सिंहला (खेमा) व ब्रज (सूरदास) या प्राचीन भाषांच्या अभ्यासकांनी त्या त्या भाषेतील (कंसात असलेल्या लेखकांचा) काही उतारा व त्यापाठोपाठ त्याचं इंग्रजी भाषांतर ऐकवलं, तेव्हा अंगावर आलेला काटा निव्वळ थंडीचा नक्की नव्हता. हजारो वर्षांपूर्वी बोलल्या/वाचल्या जाणाऱ्या या भाषा ऐकणं हा माझ्यासाठी यंदाच्या फेस्टिवलमधला अत्युच्च आनंदाचा क्षण होता. या पाच जणांपाठोपाठ शेल्डन पोलॉक या ब्रिटिश भाषातज्ज्ञाने "किं वा काव्यरसः स्वादुः? किं वा स्वादीयसी सुधा ?" या संस्कृत वचनाने बोलायला सुरुवात केली. पोलॉक संस्कृतचे तज्ज्ञ आहेत, ते कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकवतात व या मूर्ती प्रकल्पाचे प्रमुख संपादक आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्रीने गौरवण्यात आले आहे त्यांनी काशी व चेन्नईत शास्त्र्यांच्या घरी राहून संस्कृत शिकली आहे. पांढरीशुभ्र दादी, गोरा वर्ण नि निळे डोळे असा हा माणूस बोलताना मधूनच संस्कृत शब्द असे पेरत होता, जसे आपण मराठी बोलताना इंग्रजी पेरतो. संस्कृत भाषेवरून सुरू असलेल्या वादाविषयी त्यांना प्रश्न केल्यावर ते म्हणाले, "संस्कृत ही जोडणारी भाषा होती, तो एक पूल होता.” येत्या काही वर्षांत १४ भाषा व १० लिप्यांमधील ४० पुस्तकं प्रकाशित करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे पोलॉक व गिरीश कर्नाड यांच्या मुलाखतीचे एक सत्र झाले. त्यातून कर्नाडांच्या व्यापक वाचनाची नव्याने ओळख झाली. या गप्पांनंतर रोहन मूर्तीचं प्रचंड कौतुक वाटतं. नारायण मूर्तीसारखा अब्जाधीश पिता, हार्वर्डमध्ये संगणकविषयक शिक्षण अशी पार्श्वभूमी असलेल्या रोहनने इतक्या लहान वयात, तिशी देखील गाठलेली नसावी त्याने भारतातील लुप्त होऊ घातलेल्या साहित्याचं जतन करण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. अत्यंत समरसून तो त्यात गुंतला आहे, त्याने त्यात काही कोटी रुपये गुंतवले आहेत. परंतु, ही काही दुपटीवर पैसे परत मिळवून