पान:निवडक अंतर्नाद.pdf/३३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथा त्यांना प्रकाशित करण्यायोग्य वाटल्या. मग एक कल्पना सुचली आपण चौघी मिळून आपली पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करू या. विशाल सोनींना आम्ही ही कल्पना सांगताच त्यांनी हे काम आव्हान म्हणून स्वीकारले. सर्वांच्या ●अनुमतीने एक तारीख निश्चित केली व त्या वेळी पाचही पुस्तके प्रकाशित व्हावीत असे ठरले. मग हे प्रकाशन कोणाच्या हस्ते करावे असा विचार आला. अंतर्नाद मासिकातून आम्हां चौघींचेही लेखन मधूनमधून प्रकाशित होत असते. तेव्हा या मासिकाचे संपादक भानू काळे यांच्या हस्ते आपल्या पुस्तकांचे प्रकाशन झाले तर फारच चांगले, असे आम्हांला वाटले. त्यांना तसे विचारताच त्यांनी येण्याचे आनंदाने मान्य केले. मग सभागृह, मेनू, निमंत्रित... अशा एकेक गोष्टी ठरत गेल्या. (या निमित्ताने आम्हा चर्चाप्रिय मैत्रिणींना भेटण्यासाठी आणखी एक निमित्त मिळाले!) सगळ्यांच्या सहकार्याने १४ मार्च २०१७ या दिवशी संध्याकाळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सुमंत मुळगावकर सभागृहात आमच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. 'दान' आणि 'गुंता' ही दोन पुस्तके अनघा केसकर हिची होती. 'स्वान्त सुखाय' हा कथासंग्रह ज्योती कानेटकरचा होता. योगिनी वेंगुर्लेकर हिचा 'जाणता अजाणता' आणि 'तनहाई' हा माझा कथासंग्रह.. अशी पाच पुस्तके त्या समारंभात प्रकाशित झाली. भानू काळे यांनी प्रसंगास अनुरूप असे मराठी वाड्मयाबद्दल आणि एकूण साहित्यजगताबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे मांडणारे भाषण केले. कथासंग्रहाचा फॉर्म घेऊन येणारे लेखन आक्रसत चालले आहे असे ते म्हणाले. पुस्तकांच्या दुकानात इतर वाङ्मयप्रकारांपेक्षा कथासंग्रहाची जागा कमीकमी होत चालली आहे आणि आपले स्थान निर्माण करण्यासाठी बदलत्या परिस्थितीनुसार आपले लेखन अधिक सकस व्हावे आणि ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचावे म्हणून काय करता येईल यावर कथालेखकांनी नव्याने विचार करायला हवा असेही ते म्हणाले. कथासंग्रह मोठ्या प्रमाणात वाचले जातात, लोकांना ते हवे असतात, त्याविषयी आम्ही सर्व्हे केला आहे असे विशाल सोनींनी त्यांच्या भाषणात सांगितले. ते सातच मिनिटे बोलले पण अगदी खेळीमेळीत आणि तरीही माहितीपूर्ण, आशादायक असे त्यांचे बोलणे होते. लेखिका म्हणून आपण काय बोलायचे यावर आम्ही पुष्कळ ऊहापोह केला होता. त्यानुसार मुख्य गोष्ट अशी ठरली की, प्रत्येकीने फक्त पाच मिनिटे बोलायचे. म्हणजे लेखिकांचे एकूण मनोगत वीस मिनिटांचे होईल. मग विषय असा ठरला, की प्रत्येकीने स्वतःची एखादी कथा निवडून त्याचे कथाबीज मनात कसे रुजले आणि मग त्याने कथारूप कसे धारण केले... हा प्रवास उलगडून सांगायचा मात्र पाचच मिनिटात! आम्ही खरोखरच त्याप्रमाणे वीस मिनिटांत चारजणी बोललो. ( मला वाटते, श्रोत्यांना प्रकाशन समारंभातील हा सगळ्यात दिलासादायक वाटला असला पाहिजे!) भाग ३३२ निवडक अंतर्नाद प्रकाशनसमारंभातल्या सर्वच वेळा अगदी काटेकोर सांभाळल्या होत्या. समारंभ सुरू झाला तेव्हा सभागृह गच्च भरलेले होते. त्यानंतर दहापंधरा मिनिटांनी आलेल्यांना उभे राहून कार्यक्रम ऐकावा लागला. 'मिळून साऱ्याजणी' च्या विद्याताई बाळ आणि 'कथाश्री' चे प्रकाश पानसे हे संपादक या वेळी उपस्थित होते. वंदना बोकील, भारती पांडे, अर्चना अकलूजकर, मृणालिनी चितळे अशा लेखिका, दीपक पारखी, श्रीकांत जोशी हे लेखक, साहित्यप्रेमी भगिनी मंडळातील ज्योत्स्ना आफळे, मीरा शिंदे, शलाका माटे... अशा अनेक जाणकार व्यक्ती कार्यक्रमास आल्याने समाधान वाटले. सूत्रसंचालन संगीता पुराणिक आणि आभारप्रदर्शन प्रमोदिनी वडके- कवळे या आमच्या लेखिका असलेल्याच मैत्रिणींनी केले. एक मात्र आवर्जून सांगावेसे वाटते की, विश्वकर्मा प्रकाशनच्या विशाल सोनी यांनी जर आमच्या कल्पनेला पाठिंबा देऊन पाच पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करण्याची • जबाबदारी घेतली नसती तर आमच्या ह्या कल्पनेच्या भराया हवेतच राहिल्या असत्या. भानू काळेंनी आपल्या भाषणात आणखी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला होता. आम्ही चारजणींनी एकत्र येऊन हा समारंभ केला हे त्यांना अगदी वेगळे, उल्लेखनीय असे वाटले. मराठी साहित्यक्षेत्रात असे सहसा घडत नाही; ज्याचे पुस्तक प्रकाशित होते, तो एकटा त्या त्या वेळी त्याचे प्रकाशन करतो; आम्ही चौघी लेखिकांनी मिळून एकाच वेळी प्रकाशन समारंभ आयोजित केला हे त्यांना अगदी वेगळे वाटले. पण मग हळूहळू काही जणांकडून याचा आवर्जून उल्लेख केला गेला. भानू काळेंनी आम्हाला सांगितले की, 'हा प्रकाशनसमारंभ तुम्ही चौघींनी मिळून एकत्रितपणे करेपर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला, हे तुम्ही लिहून द्या. इतर लेखकलेखिकांच्या दृष्टीने हा प्रवास अनुकरणीय आहे.' मग आम्हीही विचार करू लागलो, लेखन ही एकट्याने करायची गोष्ट आहे असे आपल्याला वाटते आणि त्यामुळे बहुतेक वेळा लेखक किंवा लेखिका आपणच उभ्या केलेल्या कल्पनाविश्वात रममाण होतात. लेखन करताना ही तन्मयता आवश्यकच असते. चिंतन, मनन यासाठी एकांत हवाच असतो. पण कधीकधी यातून लेखकाला एकटेपणा येतो. एक प्रकारे आपल्या लेखनासाठी लेखकाने चुकवलेली ही किंमत असते. त्यातून त्याचे इतरही काही तोटे होतात. ते टाळता येतील का? जर असेच एकेकटे लेखक एकत्र येऊन एकमेकांशी विचारांची, कल्पनांची देवाणघेवाण करू लागले तर ? आम्हांला समृद्ध करून गेलेला अनुभव इतरांनाही आनंद देऊ शकेल असे वाटले. आमची एकमेकींशी ओळख झाल्याच्या पहिल्या भेटीपासून आम्ही आज ज्या मुक्कामावर पोचलो आहोत, तिथपर्यंतचा हा प्रवास खरोखरच फार समाधान देणारा आहे. (दिवाळी २०१७)