पान:निवडक अंतर्नाद.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझी कविता आणि मी इंद्रजित भालेराव मनकविता या २००३ आणि २००४ सालांतील एका सदरात फ. मुं. शिंदे, दासू वैद्य, सुहासिनी इलेंकर, विजया जहागीरदार, वसंत आबाजी डहाके, लक्ष्मीकांत तांबोळी, इंद्रजित भालेराव, ना. धों. महानोर, हेमकिरण पत्की, पुरुषोत्तम पाटील, महेश केळुसकर, नीरजा, गोविंद कुलकर्णी, अरुण म्हात्रे, सतीश सोळांकुरकर, अरुणा ढेरे व हेमंत गोविंद जोगळेकर या प्रख्यात कवींनी लेखन केले. आपला अल्पपरिचय, कवितेविषयीची एकूण भूमिका, एखादी अप्रकाशित कविता आणि त्याचबरोबर दुसऱ्या एखाद्या अल्पपरिचित कवीचाही परिचय असे या सदराचे स्वरूप होते. त्या सदराची ही एक झलक. कशासाठी लिहितो मी कविता? या प्रश्नाची उत्तरं अनेक आहेत. परंतु मला सर्वाधिक विश्वसनीय वाटणारं उत्तर आहे, आयुष्यातले सर्व प्रकारचे अभाव भरून काढण्याचं काम कविता करते, म्हणून मी कविता लिहितो. कवितेनं मला आनंद दिला, कवितेनं मला आत्मभान दिलं, कवितेनं मला विश्वास दिला, कवितेनं मला सन्मान दिला, कवितेनं मला पैसा दिला, कवितेनं मला हिंमत दिली. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवितेनं माझा जन्म सार्थकी लावला. यातलं काहीच कवितेकडून मी अपेक्षित केलेलं नव्हतं, कवितेनं मला दिलेला गोतावळा तर एवढा मोठा आहे की त्याची मी स्वतःच कल्पना करू शकत नाही. बऱ्याचदा लोकांना उत्सुकता असते की काय पार्श्वभूमी आहे कवीची? कोणत्या परिस्थितीत कवीनं कविता लिहायला सुरुवात केली? मी माझ्यासंबंधी अशाच स्वरूपाचा विचार केला तेव्हा लक्षात आलं - वटकन लावून ताटातली भाजी गोळा करावी तर तितक्यात हातातली भाकरच सरावी रात्री अंगाची आग होऊन उठावं तर तितक्यात नाकातल्या घोळण्यानं फुटावं अरे आपलं बालपण काय बालपण होतं? ते तर मुलखाचं बकालपण होतं पण बाप सांगायचा गोष्टी अन् माय म्हणायची गाणी मग भूक भागवायचं फक्त काळं पाणी गोष्टीची भाकर गाण्याची भाजी घरभर होती तुडुंब ताजी माय म्हणायची जात्याला, आयुष्य लाभतं गात्याला काळी काळी रात बाई गोरी गोरी होते गोष्टीच्या नादानं सूर्य वरी वरी येते दाण्याच्या जोडीनं होतो जिवाचा रगडा गाण्याच्या ओढीनं तुला ओढीते दगडा अवती-भवती जात्यावर गायलेल्या ओव्या याच मी आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या वहिल्या कविता, त्यांचा संस्कार आणि ठसा इतका पक्का आहे की, मला जात्यावरच्या ओव्याच खऱ्या कविता वाटतात. पुस्तकी कविता वाचताना मला सतत ओव्या आठवत जातात आणि तुलना केली की एकेक ओवी लाख मोलाची वाट जाते. मला पडलेल्या प्रत्येक वाड्मयीन प्रश्नाचं उत्तरदेखील मला ओवीतच सापडलं आहे. जसं की वरील कवितेच्या शेवटी दिलेल्या आईच्या ओवीत तिनं आपण ओव्या कशासाठी म्हणतो, तर आयुष्याचं जड दगडी जातं ओढायला सोपं जावं म्हणून, हे दिलेलं उत्तर कलावादी जीवनवादी हे सगळे वाद निकाली काढणारं आहे. म्हणून मला नेहमी वाटत आलेलं आहे की, पुरुषानं स्वतःतली अर्धनारी जगवल्याशिवाय त्याला कविता लिहिता येत नाही. माईचा सोडून ज्यानं भलतिचाच धरला पदर अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर ज्याला कधी बहिणीचा मुन्हऱ्हाळी नाही होता आलं कवितेला त्यांच्यासाठी गोड गुन्हऱ्हाळी नाही होता आलं पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू ढळत नाही अशांच्या तर मरणदारीही कविता कधी वळत नाही अशा पुरुषापासूनच इतिहासात कवितेला कायम भीती राहिली होती म्हणून फक्त जात्याभोवतीच कविता जिती राहिली होती मी शेतकऱ्यांच्या जगण्यावर कविता लिहिल्या, राबण्यावर कविता लिहिल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कविता लिहिल्या. हे जगणं, हे राबणं, हे प्रश्न आज माझे आहेत का? नाही. मी ते सगळं ओलांडून आलोय. या प्रश्नांनी पेटलेल्या घरातून मी बाहेर निवडक अंतर्नाद ३३