पान:निवडक अंतर्नाद.pdf/३५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिपूर्णता कमी होऊ नये म्हणून अशी शिकवण ठीक, हीच खरीखुरी नैतिकता होईल. - मी भविष्यातील आदर्श समाजाचे काहीच स्वप्न देत नाही; स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणे हा मार्ग सांगतो, पण या कक्षा रुंदावत पोचायचे कोठे हे मात्र सांगत नाही. नैतिकता ही कोणत्याही एका विवक्षित व्यवस्थेत नाही, ती मार्गक्रमणात आहे, असे मानल्यानंतर आदर्शभूत समाज ही कल्पनाच अर्थहीन होते. आदर्शाची चित्रणे करणाऱ्या विचारपद्धतीपैकी मार्क्स व गांधी यांच्या स्वप्नसृष्टीचे काय झाले हे पाहण्यासारखे आहे मार्क्सवादाच्या समग्र विचारपद्धतीवर विसाव्या शतकातील कामगारचळवळ उभी राहिलेली आहे. जडवाद, विरोधविकासवाद, विपरीत उत्पादनसंबंध, खाजगी मालमत्ता, अतिरिक्त मूल्य, मजुरांचे शोषण, वर्गसंघर्ष यांतून भांडवलशाहीचा अटळ विनाश, यांतून वर्गरहित, शोषणरहित समाजवादी समाजाची निर्मिती व त्यांतून मानवी मनाची मुक्ती एवढ्या सगळ्या सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या पायावर मार्क्सच्या शास्त्रीय समाजवादाची उभारणी झाली. जगातील सर्व कामगारांना एक करण्याचे स्वप्न पाहत कामगारचळवळ जगभर उभी राहिली. आपल्या देशात अनेकांनी या चळवळीत स्वत:ला झोकून दिले, बलिदान केले. मजुरीच्या रूपात, बोनसच्या रूपात, नोकरीच्या अटी, शर्तीबाबत सुधारणा असे अनेक फायदे मजुरांनी पदरात पाडूनही घेतले. पण मार्क्सवादी दर्शनाची बांधिलकी काही तयार झाली नाही. कामगार नेतेपण हा व्यवसाय होऊ लागला, जो पाच दहा रुपये जास्त मिळवून देईल, त्याच्यामागे कामगार जाऊ लागले; कामगारक्रांतीच्या मार्गाने मानवजातीच्या मुक्तीचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना कामगारांनी सोडून दिले, ही हकीकत आहे. ज्या देशात तथाकथित मार्क्सवादी राजवट आली तेथे घडून आलेले बदलही किरकोळ, भांडवलशाही व्यवस्थेचा हा एक अवतार असे वायवे अशा धर्तीचे, अर्थव्यवस्थेच्या बदलांतून अपेक्षित परिवर्तन घडून आले नाही, हे असे का झाले? नैतिकतेवर अर्थव्यवस्था आधारू पाहणाऱ्या महात्मा गांधींची शोकांतिका मार्क्सहूनही भयानक आहे. जगाच्या इतिहासात म. गांधींइतका कोणत्याही युगपुरुषाशी त्याच्याच शिष्यांनी द्रोह केला नसेल. गांधीवादाला अपेक्षित आर्थिक व्यवस्थेच्या नेमकी उलटी व्यवस्था त्यांच्या परमशिष्यांनी उभारू घातली. गांधीवादी नैतिकता त्यांच्या शिष्योत्तमांनीच उलथवली महात्मा गांधींनी त्यांच्या विचारात नैतिक बाजू कोठेही लंगडी ठेवली नव्हती, पण प्रत्यक्षात तिचा समाजजीवनावर काहीच परिणाम झाला नव्हता. शोषण झाले, की शोषित उफाळून क्रांती करतात, प्रस्थापित व्यवस्था उधळून देण्यास कंबर बांधतात असा काहीतरी विचार त्यांच्या मनात खोलवर रुजलेला असतो. मार्क्सवाद्यांच्या क्रांतितत्त्वज्ञानात एक मोठी चूक वारंवार आढळते. शोषित हे शोषकांविरुद्ध लढा उभारतात, कमालीचे ३५८ निवडक अंतर्नाद अगदी शरीरशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा ही कल्पना अवास्तव आहे. अतिशोषितांमध्ये उठण्याची ताकदच नसते, शोषणाच्या अगदी सुरुवातीच्या पायरीत त्यांची प्रतिकारक्षमता खलास होते. प्रत्यक्षात शोषक क्रमांक एक' विरुद्ध 'शोषक क्रमांक दोन' आघाडी उघडतात असे दिसते. शोषितांचे नाव घेऊन ते ही आघाडी उघडतात. उदाहरणार्थ, परदेशी भांडवलदाराविरुद्ध आघाडी स्थानिक भांडवलदार उघडतात - वरकरणी नाव मात्र गांधींच्या तत्त्वज्ञानाचे किंवा स्वदेशीचे किंवा शिवशाहीचे असते. प्रचंड दुःख आणि यातना सोसून केवळ दुसऱ्याच्या भल्याकरता मी हे दिव्य करीत आहे असे कोणी म्हटले, की माझ्या मनात भीतीच्या घंटा वाजू लागतात. जगन्मान्य थोर विचारवंत लोकधुरीणांच्या दर्शनांची ही शोकांतिका विचार करावयास लावणारी आहे. पहिला प्रश्न निर्माण होतो तो ह्य, की या प्रेषितांनी आदर्श समाजाची पाहिलेली स्वप्ने योग्य होती का? तत्कालीन समाजातील समस्यांचे अचूक विश्लेषण त्यांनी केले. ते दोष दूर केल्यानंतर ज्या आदर्श समाजाची निर्मिती होईल त्याचे मोठे मनोहारी चित्रण हर 'पैगंबराने उभे केले. ॲरिस्टॉटल, प्लेटोपासून मार्क्स - गांधींपर्यंत प्रत्येकाने एक आदर्श समाजाचे लोभस चित्र लोकांसमोर ठेवले. अतिरिक्त मूल्याचे विश्लेषण मार्क्सने केले. तेवढ्या आधारावर कामगारक्रांतीची आणि वर्गहीन समाजाची स्वप्ने रंगवणे हे मार्क्ससारख्या प्रकांड बुद्धिवाद्याला कसे काय योग्य वाटले? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या आदर्शांवर समग्र समाज उभा राहिल्याची कल्पना गांधींनी करणे कितपत वास्तववादी होते? प्रत्येक छायाचित्राचा एक केंद्रबिंदू असतो. त्या बिंदूत प्रमा स्वच्छ आणि स्पष्ट दिसते. त्या बिंदूपासून जितके दूर जावे, तितकी प्रतिमेची गुणवत्ता कमी होत जाते. प्रत्येक छोट्या-मोठ्या विचारवंताच्या विचारपद्धतीचेही असेच असते. काही केंद्रबिंदूत त्यांना त्यांच्या काळाला व परिस्थितीला अनुरूप असा साक्षात्कार झालेला दिसतो. बुद्धिनिष्ठ सचोटी राखून आपला विचार तेवढ्यापुरताच मर्यादित ठेवावा, हे मात्र आजपर्यंत थोराथोरांना जमलेले नाही. आपल्याला गवसलेल्या सत्यकणांच्या आधारे विश्वव्यापी पसाऱ्याला गवसणी घालण्याच्या मोहाला मोठमोठे बळी पडले आहेत. विश्वाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वतःच्या पराभवाचा पाया घातला. आपल्या विचाराचा भविष्यावर परिणाम काय होईल, याचे चित्रण करताना बुद्धिनिष्ठ कठोर तर्कशास्त्राला सोडून देण्याचा मोह त्यांना का पडला ? अनुयायांना एक विशाल दर्शन देऊन सर्वसंगपरित्यागाला तयार करण्यासाठी ? स्वप्ने विकण्याच्या धंद्यात ते का पडले हे सांगणे कठीण आहे