पान:निवडक अंतर्नाद.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थोडा प्रयत्न केला तर कविता गहन, गूढ आणि अवघड करता येते. थोर कवी म्हणून मिरवायला ही सोपी गोष्ट आहे. परंतु मला नेहमीच वाटत आलेलं आहे की, कवितेनं सामान्य माणसाची नाळ न तोडता स्वतःला आखीव-रेखीव शिल्प बनवावं. भा. मराठी साहित्य संमेलनातल्या मुख्य कविसंमेलनाचं मी सूत्रसंचालन केलं, परभणी संमेलनात तर आम्ही त्याआधी अ. भा. च्या व्यासपीठावर फारशा न आलेल्या डहाके, काळसेकर, गणोरकर यांनाही बोलावलं आणि सूत्रसंचलन नीट केलं तर गंभीर कविताही लोक किती उत्कट दाद देऊन ऐकतात, ते दाखवून दिलं. साता-यानंतर मला सतत कवितावाचन करावं लागलं आणि कविता लोकांपर्यंत पोचवण्याचं एक साधन म्हणून मीही ते गंभीरपणे करू लागलो. त्याचा परिणाम म्हणजे माझ्या कवितासंग्रहाच्या चार चार, पाच-पाच आवृत्या प्रकाशित झाल्या. शिवाय त्यातून पैसाही खूप उभा करता येतो, हे लक्षात आल्यावर गेल्या दिवाळीपासून एका संस्थेला पन्नास हजाराची आणि तीन नियतकालिकांना (साक्षात्, कवितारती, पंचधारा ) प्रत्येकी अकरा हजाराची मदत मी करू शकलो. आपल्या मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या कामाचा असाही उपयोग करता येतो. माझी एक अप्रकाशित कविता पुढे देत आहे जसा कावसाच्या पोटी कधी जन्मा यावा वूस दृष्ट्या पुत्रा उसवते तशी नतद्रष्ट कूस कधी दुबळी असते बळीवंताची बहीण कुळवंतापोटी कन्या कधी जन्म घेते हीन शेप वाकडी तरीही तोल सावरते नीट काणी होवून जन्मते कधी दाण्यातले पीठ नर मारीतो नराला नाही कळत येड्याला मादी आयुष्य मागते हातामधल्या चुड्याला आता मला भावणाऱ्या एका नव्या कवीबद्दल जो या सदराचा एक भाग आहे. बालाजी इंगळे हा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरग्यासारख्या आडबाजूच्या गावात राहणारा एक नवकवी आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून नुकताच त्याचा 'मातरं' हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्याची एक मला आवडणारी कविता पुढं देत आहे जनावरासोबत राबणाऱ्या शेतकऱ्याला आपण बायकोशी चांगला व्यवहार केला नाही याची जाणीव होते, तेव्हा त्याची कृती कोणतं वळण घेते, ते फार सूचकपणे त्यानं या कवितेत मांडलं आहे. आज खेड्यापाड्यांतून खूप मुलं अशा ताकदीच्या कविता लिहीत आहेत. खेड्यापाड्यांतून लिहिणाऱ्या पोरांवर वाड्मयीन संस्कार कसे करायचे, हा एक प्रश्नच आहे आपल्या महत्त्वाकांक्षेच्या बळावर ही मुलं दूरपर्यंत, योग्य मार्गदर्शकापर्यंत पोचली आणि चांगली वाङ्मयीन संस्कृती त्यांना पाहायला मिळाली तर बरं, नाहीतर ही मुलं प्राप्त परिस्थितीचा बळी होऊन खुरटण्याची शक्यता जास्त असते आणि चुकीचं अन्नद्रव्य मिळालं तर वाईट अर्थानं फोफावत जाण्याची शक्यताही असतेच, खुरटण्यापासून आणि फोफावण्यापासून स्वतःला वाचवू पाहणाऱ्यांचा बालाजी इंगळे हा प्रतिनिधी आहे. सुंदर प्रतिमेसह सुंदर कविता आणि प्रतिमेशिवायही सुंदर कविता ही या कवीची ताकद आहे. त्यांची ही एक कविता - पेरता पेरता चाड्याची दोरी तुटली आणि जागच्या जागीच ती थांबली धनी तसाच कुळव घेऊन पुढी ती चाडं धरून तशीच जाग्यावर उभी तशीच उभी तिनं आवाजच दिला नाही मुरडण घेताना कळालं ती मागं नाही जीवनाच्या वाटेवर सोबत घेतलं नाही कधी मार्ग मार्ग चालली थांबा म्हटलं नाही कधी जीवनाचीही होईल ताटातूट असं वाटलं त्याला अन् कुळव सोडून तो निर्धारानं तिच्याकडे निघाला (जुलै २००३) निवडक अंतर्नाद ३५