पान:निवडक अंतर्नाद.pdf/३८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तयार झाली होती. तिच्यामुळे ते तिथे आले. नाहीतर त्यांना माहितीसाठी फक्त सरकारी मालकीची एकांगी प्रसारमाध्यमंच उपलब्ध होती, ते एका हुकूमशाहीतले नागरिक होते. म्हणजे तंत्रज्ञान आज किती इक्वलायझिंग (समानता आणणारं ) होऊ शकतं याचा एक पुरावा आम्हांला अलीकडेच मिळाला. आमच्याकडे स्वभाषेतून असं परिवर्तन वगैरे सोडाच, प्राथमिक शिक्षणसुद्धा मिळेनासं होतंय. इंग्रजीचा प्रभाव आमच्या शालेय शिक्षणावर वाढत असला तरी त्यातील इंग्रजी अध्यापनामध्ये एक मूलभूत चूक झालीय. ज्या पद्धतीने आमच्या शाळांमध्ये इंग्रजी शिकवलं जातं, ती भाषा शिकवण्यासाठी अत्यंत अशास्त्रीय अशी पद्धत आहे. आमच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी हा विषय संभाषणकेंद्री नसून व्याकरणकेंद्री बनवण्यात आला आहे आणि शिक्षक सामान्यत: इंग्रजीतून बोलून तो कधीच शिकवत नाहीत. ते मुलांशी मराठीत बोलतात, म्हणून मुलंही इंग्रजी बोलू शकत नाहीत. याउलट इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट व तत्सम शाळेतले शिक्षक इंग्रजीत बोलतात, म्हणून ती मुलंही इंग्रजी बोलायला शिकतात. नव्यानं पेव फुटलेल्या तथाकथित इंग्रजी माध्यमाच्या तसंच सेमी इंग्लिश शाळांतील बहुसंख्य शिक्षकांना सफाईदार इंग्रजी बोलता येत नाही, त्यामुळे ते मराठीचा वापर करतात व शाळेतील एकूण पर्यावरण अर्धवट मराठी व अर्धवट इंग्रजी राहिल्याने तेथील मुले धड इंग्रजी बोलू शकत नाहीत व धड मराठीही बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खच्ची होतो आणि त्यांची भाषिक बुद्धिमत्ता या भाषिक गोंधळाच्या संभ्रमात निकृष्ट ठेवण्याचा गुन्हा आम्ही करत राहतो. ज्ञानयुगाकडे झेप घेऊ पाहणाऱ्या भारताला सुमार भाषिक बुद्धिमत्तेच्या प्रचंड संख्येच्या पिढीमुळे मोठी किमत मोजावीच लागेल. ही मुलं केवळ काही इंग्रजी शब्द आत्मसात करतात, पण मग त्यांच्या वाक्यरचना ह्या मराठी वळणाच्या असतात किंवा मराठी असतात आणि त्याच्यात काही शब्द तेवढे इंग्रजी असतात. सर्वसामान्य मराठी घरांमधली मुलं 'ब्लू जीन रेड टीशर्ट मॅच होतो' अशा प्रकारची वाक्यं मराठी भाषेमध्ये बोलतात! म्हणजे मोठ्या प्रमाणात इंग्रजी शब्दांचा वापर हा आम्ही मराठी भाषेचा बाज कायम राखून आता करतो. आता तर ती फॅशन झाली आहे. त्याचं सर्वात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमचे एफएम रेडिओ चॅनेलवरचे रेडिओ जॉकी, ते एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजीची इतकी बेमालूम सरमिसळ करतात, की मी स्वत:मध्ये न्यून समजतो, की मला तशी भाषा बोलता येत नाही! इंग्रजीपासून पिढ्यानुपिढ्या वंचित राहिलेल्या व इंग्रजीच्या बेसुमार प्रभावामुळे गोंधळून गेलेल्या लोकांचा अभिजनवर्गाकडे सरकण्याचा प्रवासही अशाच मिश्र भाषेच्या वाटेने जातो आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. आज कितीही ग्रामीण भागातला मुलगा असला तरी त्याला अनेक इंग्रजी शब्द आत्मसात करणं भाग पडतं, कारण त्याच्यापाशी समानार्थी असे, बोलायला - लिहायला सोपे, साधे, छोटे, चपखल, अर्थवाही असे मराठी शब्दच अस्तित्वात ३८२ निवडक अंतर्नाद नाहीत. दैनंदिन व्यवहारासाठीच्या संवादाची सोय ही तर कुठल्याही भाषेकडून प्राथमिक अपेक्षा असते. प्रमाण मराठी आज ही प्राथमिक अपेक्षाही पूर्ण करत नाही, कारण प्रमाणभाषेची निर्मिती करण्याचा हक्क राखणारा अभिजनवर्ग • आपले व्यवहार इंग्रजीत करण्यात तरबेज आणि मशगुल आहे. खेड्यातला मुलगासुद्धा 'मोबाइलवर टॉप-अप घेताना म्हणतो की, "अनलिमिटेड टॉक टाइम फ्री असायला हवा." कारण ह्याचे समानार्थी सोपे शब्दच आमच्याकडे नाहीत. त्यामुळे हा वर्ग आपल्या दैनंदिन गरजेपोटी एका मिश्र भाषेची निर्मिती करतो आहे. ही एक चिंतेची बाब आहे. कारण या प्रकारामुळे ही पिढी एकीकडे स्थानिक व जागतिक पातळीवर निखळ इंग्रजीत व्यवहार करू शकत नाही आणि दुसरीकडे मराठी ही लोकाभिमुख अशी ज्ञानभाषा म्हणून विकसितही होत नाही. अशा परिस्थितीत अभिजानांकडून लोकाभिमुख अशा प्रमाणभाषेची निर्मिती होईल अशी भाबडी आशा बाळगण्यात अर्थ नाही. आता सर्वसामान्य लोकांनीच लोकांसाठी लोकांची प्रमाणभाषा बनवण्याची गरज आहे. विकिपीडियाप्रमाणे सर्वसामान्य मराठमोळ्या लोकांना माहिती तंत्रज्ञानाचा सामूहिक सहभागी वापर करून, आपली लोकाभिमुख अशी (समांतर) प्रमाणभाषा व ज्ञानभाषा बनवणे व रूढ करून दाखवणे शक्य आहे माहिती तंत्रज्ञानामध्ये भाषेविषयी आता एक नवीनच गोष्ट घडते आहे आणि ती आपण नीट समजून घेतली पाहिजे. मज्जाशास्त्राचा अभ्यास जसा पुढे गेला तसं आपल्या लक्षात आलं, की माणसाच्या मेंदूमध्ये भाषेसंदर्भात दोन केंद्रं असतात एक भाषा आकलनाचं केंद्र आणि दुसरं भाषा व्यक्त करण्याचं केंद्र सर्व मानवांच्या मेंदूमध्ये भाषिक बुद्धिमत्तेची हीच दोन केंद्रं असतात. म्हणजे ज्या भाषा मनुष्य निर्माण करतो त्यांच्या उगमाच्या व विकासाच्यामागे हीच दोन केंद्रं आहेत हे लक्षात येईल. ह्या दोन केंद्रांचा अभ्यास हा आता खूप वेगळ्या दिशेने चालू आहे. आणि तो असा आहे, की सर्व भाषाभगिनींमध्ये व्याकरणदृष्ट्या साम्यस्थळं काय आहेत? ह्याच दोन केंद्रांनी आकलन होण्याचं व व्यक्त करण्याचं सर्व काम होत असेल, तर मग त्यांच्या मदतीने तयार झालेल्या भाषांमध्ये बरंचसं मूलभूत साम्य असायला पाहिजे, ते शोधणं आणि त्याचा भाषांतराचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उपयोग करणं ही आता संशोधनाची दिशा आहे. मग त्याचा उपयोग करून आम्ही काय करणार आहोत ? तर टेलीफोन कंपन्या अजून दहा-वीस वर्षांच्या आत अशी एक तांत्रिक व स्वयंचलित सेवा देतील, की वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक त्या सेवेच्या माध्यमातून आपापल्या भाषांमध्ये बोलू शकतील व ते इतरांनाही त्यांच्या त्यांच्या भाषांमध्ये त्याच वेळी आपोआप भाषांतरित होऊन ऐकू येऊ शकेल. ह्याला 'रिअल टाइम व्हॉइस / लँग्वेज ट्रान्सलेशन टेक्नॉलॉजी' असं संबोधलं जातं. माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आपोआप आणि प्रचंड वेगानं सध्या होत असलेल्या संगणक किंवा मोबाइल फोनवरील लिखित मजकुराच्या लिप्यंतराच्या (transliteration) आणि भाषांतराच्या (translation ) फार