पान:निवडक अंतर्नाद.pdf/३८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तंत्रज्ञानाचा विकास चालू आहे. शेवटी या सगळ्या विषयाविषयी ज्यांनी खूप पूर्वी दिग्दर्शन करून ठेवलं, अशा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतराव चव्हाण यांच्या कोपरगावला केलेल्या भाषणातला एक उतारा उद्धृत करतो. ७ सप्टेंबर १९६७ला ते असं म्हणतात : "मी इंग्रजी हटाववाला नसून, 'हिंदी पाहिजे' म्हणणारा आहे. पण त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छितो, की आमच्या देशातले उच्च शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. आम्हांला समाजाच्या खालच्या थरापर्यंत शिक्षण पोचवायचे असेल, तर ते परक्या भाषेतून तेथपर्यंत जाणार कसे? आज किती लोकांना इंग्रजी येते? म्हणजे वर्तमानपत्रातील मथळे वाचण्यापुरते नव्हे, नव्या विषयाचा अभ्यास करून त्या ज्ञानाचा वापर करण्याइतके इंग्रजी किती लोकांना येते? चार टक्के लोकांनाही नाही. म्हणजे देशातले ९६ टक्के लोक ज्ञानाला पारखे राहिले आहेत असा याचा अर्थ होतो, हे काय शास्त्र आहे? आम्ही म्हणतो, की देशामध्ये आम्हांला लोकशाहीची वाढ करायची आहे. आम्हांला सामान्य माणसाला मोठे करायचे आहे पण अशाने सामान्य माणूस मोठा होणार कसा? त्याची सुरुवातीची सगळी शक्ती जर परकीय भाषा शिकण्यात निघून गेली तर तो पुढे काय करणार? उच्च शिक्षण मातृभाषेतून दिले पाहिजे याला एक दुसरेही कारण आहे क्रांती होऊन, सामाजिक उलथापालथ होऊन, एक नवीन तऱ्हेचे जीवन बनले असे हिंदुस्थानात फारसे कधी घडलेले नाही. याचे खरे कारण असे आहे, की सामान्य माणसापर्यंत महत्त्वाचा विचार किंवा ज्ञान आम्ही कधी जाऊच दिले नाही. ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक झाल्याशिवाय समाजाचे जीवन समर्थ होत नाही, उन्नत होत नाही, विकसित होत नाही. ज्ञानभाषा एक आणि लोकभाषा दुसरी अशी हिंदुस्थानच्या जीवनाची परंपरागत कहाणी आहे. लोकभाषा अशा तऱ्हेने दुर्लक्षित राहिल्यावर लोक शहाणे होणार तरी कसे? आता स्वातंत्र्यानंतर जेव्हा आम्हांला जनजीवन विकसित करायचे आहे असे आम्ही म्हणतो, तेव्हाही लोकभाषा ज्ञानभाषा होणार नसेल, तर ज्ञानभाषा हा ज्यांचा मक्ता होता त्यांचेच संस्कार आणि त्यांचेच साम्राज्य सांस्कृतिक जीवनामध्ये निर्माण होईल. ते होऊ देता कामा नये असे माझे स्वतःचे खंबीर मत आहे.” मा. यशवंतरावांचे हे विचार आमच्या नाकर्तेपणामुळे आज तब्बल ४५ वर्षांनंतरही किती समर्पक, प्रासंगिक आणि मार्गदर्शक आहेत हे वेगळे सांगण्याची काय गरज आहे? जाताजाता एक सांगेन, की आमचे जे भाषा विषयातले तज्ज्ञ आहेत किंवा साहित्यातले काही तज्ज्ञ आहेत, ते तंत्रज्ञानाचा भारी तिरस्कार करतात. पण आजच्या डिजिटल युगातले युवा आता डिजिटल तंत्रज्ञान वापरूनच त्यांचे बहुतेक सर्व दैनंदिन व्यवहार करणार आहेत. भाषा कुठलीही असो, भाषिक व्यवहारांसाठी तंत्रज्ञानाची अपरिहार्यता त्यामुळे नाकारून कशी चालेल? अशा परिस्थितीत आमच्या भाषेला खरं वैभव हे तिला तंत्रज्ञानाची भक्कम जोड दिल्यामुळेच प्राप्त होणार आहे. यासंदर्भात एक मार्मिक आख्यायिका सांगून हा लेख तूर्तास संपवतो. पॅरिस शहरामध्ये भरणाऱ्या एका जागतिक ट्रेड फेअरच्या निमित्ताने आर्किटेक्ट गुस्ताव आयफेलने 'आयफेल टॉवर' बांधायचं ठरवलं. त्यामुळे पॅरिस शहरातले सुमारे ३०० अभिजन त्याच्यावर भारी नाराज झाले. पॅरिस या आमच्या रम्य सांस्कृतिक नगरीत मध्येच कुठे हा असा लोखंडी राक्षसी सांगाडा बांधताय तुम्ही, अशी टीका ते आयफेलवर करायचे, त्याच्या बांधकामाला विरोध करायचे. ट्रेड फेअर जवळ जवळ येऊ लागली. आता काहीही करून हा मनोरा पूर्ण बांधून होणं आवश्यक होतं. कारण तो मनोरा हे ट्रेड फेअरचं प्रतीक होतं. पॅरिस जसं सांस्कृतिक क्षेत्रात संपन्न शहर आहे तसंच ते अभियांत्रिकीतही अग्रेसर आहे हे आयफेल जगाला दाखवू इच्छित होता. गाय दि मोपासा ( Guy de Maupassant) नावाचा प्रसिद्ध फ्रेंच लघुकथाकार गुस्ताव आयफेलच्या मनोऱ्याचा कट्टर विरोधक होता, तो आयफेल टॉवर या कल्पनेच्या इतकं विरोधी लेखन प्रसिद्ध करीत असे की आयफेल कधी त्याला उत्तर देण्याचं धाडस करत नसे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आयफेलच्या प्रयत्नाअंती आयफेल टॉवर वेळेत उभा राहिला. आयफेल टॉवरच्या सर्वांत वरच्या मजल्यावर एक कॉफी बारही बांधण्यात आला. ट्रेड फेअर आटोपल्यावर मात्र गाय दि मोपासा रोज आयफेल टॉवर चढून जायचा असं म्हणतात. आजच्यासारखी लिफ्टची सुविधा त्यावेळी नव्हती. तरीही तो चढून जायचा म्हणे. तिथं बारमध्ये कॉफी पीत बसायचा आणि तिथे बसून आयफेल टॉवरच्या विरोधी लेखन करायचा आणि ते 'आयफेल टॉवरवरून अशा मथळ्याखाली वृत्तपत्रात प्रकाशित व्हायचं. पॅरिसमधले लोक ते मोठ्या चवीने वाचायचे. शेवटी लोकांनी एकदा मोपासाला विचारलं, "तू रोज आयफेल टॉवर चढून जातोस खरा, पण तिथे जाऊन त्याच्यावरच टीकास्त्र सोडणारं लेखन करतोस, हे विसंगत नाही का?" त्यावर मोपासा उत्तरला, "काय करणार? आता अख्ख्या पॅरीस नगरीत आयफेल टॉवरचं शिखर ही एकमेव अशी जागा शिल्लक राहिली आहे की जिथून मला न आवडणारा आयफेल टॉवर • अजिबात दिसत नाही आणि माझी रम्य पॅरिस नगरीच फक्त दिसते!” तंत्रज्ञानाचा तिरस्कार करणाऱ्या मराठीप्रेमींना एवढंच सांगायचंय की यापुढे मराठीच्या रम्य नगरीचं सम्यक दर्शनही तुम्हाला प्रगत माहिती तंत्रज्ञानाच्या उंचच उंच आयफेल टॉवरवरूनच दिसणार आहे ! (दिवाळी २०१३) निवडक अंतर्नाद ३८५