पान:निवडक अंतर्नाद.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खाऊन आल्यावर, मिठाचं पाणी पाजून उलट्या करायला लावून मी तिला वाचवलं होतं, तेही आठवतं. शेरू नावाचा मी पाळलेला कुत्रा विष खाऊन मेलेला उंदिर खाऊन आल्यावर त्याच्या शेवटच्या क्षणांत व्हायोलंट झाला. कुणी त्याच्या जवळपास जायला धजत नसताना, मी जवळ गेल्यावर त्याही अवस्थेत पडल्या पडल्या प्रेमाने शेपटी आपटत व अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत प्रेमाचं आर्जवी हसू डोळ्यांत आणून तो माझ्याकडे पाहत होता. त्याला तसंच टाकून अभ्यासाला मी मित्रांकडे निघून गेलो व संध्याकाळी परत आलो तर तो गेलेला होता. त्याला तसंच टाकून गेल्याबद्दलच्या तीव्र पश्चात्तापाची व दु:खाची ती संध्याकाळ अजूनही आठवते. मिठाचं पाणी पाजून त्या मांजरीसारखं आपण त्यालाही वाचवू शकलो असतो, हे खूप नंतर कधीतरी लक्षात येऊन, ते आपल्या लक्षात तेव्हा का आलं नाही, यासाठी अगदी आजपर्यंत मी हळहळत असतो. नगरवालांकडच्या टिपू व डॉली या खतरनाक अल्सेशियन कुत्र्यांच्या जोडीशीही अशीच माझी घट्ट मैत्री यांच्या आसपासही जायला माणसं घाबरतात. पण मी त्यांच्या पाठीवर बसून, त्यांचे कान उपटून त्यांना 'घोडा घोडा' करायला लावी. एरवी सदोदित चवताळणारे हे मुके जीव माझे हे लाड मात्र निमूटपणे पुरवत. पोपट पाळणं, त्याला बोलायला शिकवणं, त्याचा पिंजरा धुणं, त्याला आंघोळ घालणं, त्याच्यासाठी खायला हिरव्या मिरच्या आणणं, आपल्याला खायला मिळालेली अर्धी फलं अर्धी खाऊन बाकी त्याला देणं, आईने हळदी-कुंकवाला जाऊन आणलेली बोराची लूट त्याला देणं, बांबूला तिरकी कमची सुतळीने बांधून, बाथरुमच्या टिनांवर चढून त्या आकोड्यांनी चिंचा तोडणं, त्या पोपटाला खायला देणं, यात्रेतून त्यांच्यासाठी पिंजरा आणणं, या पोपटांच्या बाबतीतल्या माझ्या आठवणी. कंठवाला पोपट, अगढ़ी लहान पिल्लू असे अनेक पोपटही मी तेव्हा पाळलेत. त्यांना खाऊ घालताना किंवा लोभ करताना किंवा चिडवताना अनेकदा बोठंडी फाडून घेतलीत. पुढे आठवी-नववीत 'फळे मधुर खावया' ही कविता मराठीच्या सरांनी अतिशय जीव लावून शिकवल्यानंतर कधीतरी माझं हे पोपट पाळणं आपोआपच सुटलं. नगरवालांचा गोठा, त्यातल्या गाई- म्हशी, वासरं व दर दिवाळीच्या दिवशी गोठ्यात दिवा लावून येण्यासाठी आईचं पणती भरून देणं, हेही आठवतं. आज स्वतःची गाय व गोठा असताना आई दिवाळीच्या दिवशी गोठ्यात दिवा ठेवून यायला पणती देते, तेव्हाही दर वर्षी वणीच्या दिवाळीची तशी संध्याकाळ आठवत असते. पकडता येतील ते व पाळता येतील तितके सगळे प्राणी मी या काळात पाळलेत. हिरवेगार मोठे नाकतोडेही मी पकडून पाळायचो. यवतमाळला पोस्टल ग्राउंडच्या गवतावर हे मोठमोठे नाकतोडे सापडायचे, म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथून येताना ते आणणं, मग त्यांच्यासाठी 'बुक ब्राँड'च्या डब्यात गवत वगैरे ठेवून ते पाळणं हे आठवतं. एकदा आणताना त्यातला एक मध्येच मेला म्हणून करंजीजवळच्या टेकडीजवळ बसच्या खिडकीतून बाहेर फेकला, आता त्या जागी सवयीमुळे उजवा हात नमस्कारासाठी ३८ निवडक अंतर्नाद दोन डोळ्यांच्यामध्ये जातो हेही सगळं या हिरव्या, सुंदर नाकतोड्यांच्या आठवणी म्हणून आठवतं. यवतमाळच्या पोरांबरोबर वावरताना भटकणाऱ्या बकऱ्याही आम्ही पकडायचो व त्यांचं दूध काढून प्यायचो. वणीला बाबांच्या अभ्यासिकेत चिमणी आत आली की दारं- खिडक्या लावून, नॅपकिनचा बोळा करून तिच्या अंगावर फेकून तिला उडवून उडवून दमवणं व शेवटी पूर्ण दमली की पकडून तिला लाल, निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या शाईनं रंगवणं, हाही एक खेळ असायचा. आपण पकडून सोडल्यावर आपला वास त्या चिमणीला लागतो, म्हणून इतर चिमण्या तिला टोचून टोचून मारून टाकतात, असं आईनं कधीतरी समजावून सांगितल्यावर हा खेळ पुढे आपोआपच बंद झाला. माझ्या भावविश्वाच्या अनेक विणी या प्राण्यांनीही विणल्या आहेत, असं आता हे सर्व लिहिताना लक्षात येतं आहे. नदीतून पकडून आणून बादलीतून मी विहिरीत सोडलेल्या मासोळ्या त्यानंतर केवढ्यातरी मोठ्या झाल्या होत्या व त्यांची प्रजाही पूर्ण विहीर भरून वाढली होती. फिश पाँड घेण्याचं जमत नसल्यामुळे काचेच्या जारमध्ये पाळलेल्या या नदीतल्या मासोळ्या जगल्या मात्र कधीच नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसांत सुट्टीत आलेल्या मामेभावांबरोबर रोज सकाळी नदीवर जाणं व मासोळ्या पकडत बसणं, हा तेव्हा उद्योग असायचा. बाहेर अंगणात झोपलो असताना सकाळी डोळे उघडल्याबरोबर पहिला विचार पाळलेल्या मासोळ्यांचा येऊन उघड्या दारातून डायनिंग टेबलवर काचेच्या जारमध्ये त्या दिसल्या, की प्रचंड आनंदाची लहर व एक्साईटमेंट मनात यायची. सुट्टी संपली, पावसाळी ढग वातावरणात आले, की मामेभाऊही परत जायचे व मी पुन्हा एकटा व्हायचो. दोन-तीन दिवस उदास व रडवेला राहायचो. फिश पाँड घरी असावा ही माझी लहानपणीची इच्छा काही ना काही कारणांनी मागे पडत जाऊन, शेवटी आता दोन वर्षांपूर्वी जिन्याखाली आठ फूट बाय आठ फुटाचा मोठा काचेचा फिश टँकच तयार करण्याने पूर्ण झाली. टायगर शार्कपासून सगळे मासे मी यात पाळले. सुरुवातीला लहानपणासारखीच एक्साईटमेंट या टँकमुळे आली. वेळ मिळेल तेव्हा समोर बसून या माशांचे खेळ मी तासन्तास पाही. नंतर नंतर हे मागे पडत जाऊन नकळत इतर शोभेच्या निर्जीव वस्तूंसारखंच या फिश पाँडचं अस्तित्व मनात तयार झालं. काही दिवसांपूर्वी हॉलमध्ये असाच बसलो असताना हलणारे मासे पाहून, 'अरे, इथे काहीतरी जिवंत अस्तित्व आपल्या बाजूला, आपल्या सोबतीला आहे,' अशी काहीतरी जाणीव आत लकाकून गेली, व तेव्हाच या जिवंतपणाची ही गमावलेली संवेदनशीलता पुन्हा जाणवली. वसंत ऋतूमध्ये कोकिळा यायल्या लागल्या की त्यांच्याच सारखा आवाज काढून त्यांना ओरडायला लावून लावून चिडवून सोडणं (जे कधीमधी मूड आला की मी आजही करतो), ओसरीपाशी अंगणात येणारा भारद्वाज पक्षी, बाबांनी शिकवलं म्हणून त्याला नमस्कार करणं, सुतार पक्ष्याचं टकटक करत झाडं